
माडखोल धरण दुरुस्तीचे काम नव्याने मंजूर करा
माडखोल धरण दुरुस्तीचे
काम नव्याने मंजूर करा
संजय लाड ः लघू पाटबंधारेकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ ः लघू पाटबंधारे विभागाच्या माडखोल धरणाच्या डावा आणि उजवा कालवा दुरुस्ती व पुनर्रचना नवीन काम मंजूर करून करण्यात यावे, अशी मागणी माडखोलचे माजी सरपंच संजय लाड यांनी कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांच्याकडे केली.
माडखोल धरणाच्या कालव्याच्या कामाबाबत श्री. लाड यांच्यासह जॅकी डिसोजा, विशाल राऊळ, रोहित गोताड, संतोष राऊळ आदींनी निवेदनाव्दारे श्रीमंगले यांचे लक्ष वेधले. त्यांनी दिलेल्या निवेदनात माडखोल धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या दुरुस्तीची कामे गेली दोन वर्षे सुरू असून, डाव्या कालव्याचे काम उपलब्ध निधीतून प्रशासकाच्या निगराणीत सुरू आहे. तर उजव्या कालव्याचे कामही लवकरच सुरु होणार आहे; मात्र ही कामे पूर्ण झाली तरी धरण क्षेत्रातील सर्व लाभार्थ्यांना पाण्याचा लाभ मिळणे कठीण आहे. कारण डाव्या कालव्याच्या उर्वरित कामाच्या तीन किलोमिटरची पाईपलाईन मोडकळीस आली असून, उजव्या कालव्याची तीच स्थिती आहे. हे काम पूर्ण करताना नवीन काम मंजूर करून करण्यात यावे. जेणेकरून शासनाच्या सर्वेप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेल्या सर्व चेंबरला पाणी पोहोचून शेतकऱ्यांना दिलासा मिळावा.
माडखोल धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्याच्या कामात १९९५-९६ च्या दरम्यान इंडो जर्मन पाईपलाईनचे काम झाले होते. त्यावेळी जो धरण पाईपलाईनचा प्लॅन तसेच त्यामध्ये नमूद सर्व चेंबर आणि मेन व्हॉल असतील, त्या सगळ्याची तपासणी नव्याने करण्यात यावी. तसेच धरणाच्या पाण्याचा साठा पाहून आवश्यक अशा नवीन ठिकाणाच्या क्षेत्राची पाहणी करून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी नव्याने आराखडा तयार करण्यात यावा व त्याला मंजुरी घ्यावी. जुनी पाईपलाईन तशीच ठेवून काम केल्यास सर्व चेंबरपर्यंत पाणी पोहोचणे कठीण आहे. शासनाच्या सर्व्हेप्रमाणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत असलेल्या सर्व चेंबरला पाणी पोहोचवून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे. कोणीही लाभार्थी शेतकरी पाण्यापासून वंचित राहू नये. उजया व डावा कालव्यासाठी संपूर्ण नवीन पाईप लाईन झाल्यास कमीत कमी पाच वर्षे तरी शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळू शकते. वारंवार दुरुस्तीचे काम करून शासनाचा पैसा वाया जाऊ नये, याची काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.
..................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57482 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..