
पत्नीचा खून केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त
पत्नीचा खून केल्याच्या
आरोपातून निर्दोष मुक्त
चिंदरमधील घटनाः परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये त्रुटी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १२ः चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपातून पती अमित दत्तात्रय मुळे (रा. चिंदर ता. मालवण) याची अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
या घटनेच्या दाखल फिर्यादीनुसार, चिंदर-सडेवाडी येथील आरोपी अमित मुळे याचा प्रेमविवाह २०१० मध्ये पूर्वाश्रमीची दर्शना घाडीगांवकर ( अनुराधा अमित मुळे) हिच्याशी झाला होता. लग्नानंतर वर्षभराने उभयंता नोकरीसाठी भांडूप मुंबई येथे गेले. कालांतराने त्यांच्यामध्ये कटुता आली. अमित हा अनुराधा यांच्यावर चारित्र्यावरुन संशय घेऊ लागला. तो अनुराधाला मारझोड करत असे. त्यामुळे अनुराधा कंटाळली होती. याबाबत तिने आई व कुटुंबियांना अनेकदा फोनही केले होते. त्यानंतर घटनेपूर्वी सहा महिने अगोदर अमित हा अनुराधाला १५ दिवसांसाठी गावी जाऊया असे सांगून चिंदर येथे कायमस्वरूपी घेऊन आला. त्यानंतर किरण कांबळी यांच्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये अमित कामाला राहिला होता. २६ सप्टेंबर २०१९ ला दुपारी १.३० वाजण्याच्या दरम्यान अनुराधा ही घराच्या पडवीमध्ये कपडे धुवत असताना अमितने तिचा गळा आवळून ठार मारले. घटनेनंतर १.४५ च्या सुमारास अमित हा त्याची वहिनी सानिका मुळे हिच्या घरी घाबरलेल्या अवस्थेत आला व त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर भावाच्या वहिनीच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे नेण्यात आले व तेथे तिला मृत घोषीत करण्यात आले. त्यानंतर अनुराधाचा भाऊ मनोहर घाडीगांवकर याने आचरा पोलिसांत आरोपीने चारित्र्याचा संशय घेत, वारंवार मारहाण करून खून केल्याबाबत फिर्याद दाखल केली होती. सुनावणीत सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, वैद्यकीय पुराव्यामधील विसंगती, परिस्थितीजन्य पुराव्यामधील त्रुटी आदीमुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57528 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..