
पान पाच मेनपोलीस उपनिरीक्षकाकडून बुट मारण्याचा प्रयत्न
पोलीस उपनिरीक्षकाकडून बुट मारण्याचा प्रयत्न
वैभववाडीत आरोप ः भष्ट्राचार प्रकरणी तपासादरम्यान प्रकार
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १२ ः पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने कथित जलसंधारण भष्ट्राचार प्रकरणातील फिर्यादी अरूण हत्ती यांना बुटाने मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार वैभववाडी पोलीस स्थानकात घडला. या संपुर्ण प्रकाराचे सीसीटिव्ही फुटेज श्री. हत्तीनी यांनी पत्रकारांना दाखविले असून पोलीस उपनिरीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वैभववाडी तालुक्यातील ऐनारी, कुंभवडे आणि करूळ डोणा या तीन लघु प्रकल्पांमध्ये भष्ट्राचार झाल्याची तक्रार कोल्हापुर येथील अरूण हत्ती यांनी २०१७ मध्ये दिली होती. त्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षकांनी केला; परंतु त्या तपासावर फिर्यादी श्री. हत्ती यांनी असमाधान व्यक्त करीत या प्रकरणाचा तपास पुन्हा करावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. न्यायालयाने या प्रकरणाचा तपास नव्याने करावा, अशा सुचना वैभववाडी पोलीसांना दिल्या आहेत. त्यानुसार या प्रकरणाचा तपास वैभववाडी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई करीत आहेत.
यासंदर्भात श्री. हत्ती यांनी आज येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत आपली बाजु मांडली. तत्पुर्वी त्यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात घडलेला आणि सीसीटिव्ही रेकाडॅ झालेला प्रकार पत्रकारांना दाखविला. ते म्हणाले, "तपास कुठपर्यत आला आहे आणि तपासात सहकार्य करण्यासाठी मी ३१ मार्च २०२२ ला वैभववाडी पोलीस स्थानकात गेलो होतो. पोलीस निरीक्षक अतुल जाधव आणि पोलीस अधीक्षक विनोद कांबळे यांची बैठक सुरू होती. त्यामुळे श्री. जाधव यांनी आपल्या पोलीस उपनिरीक्षक श्री. देसाई यांच्याकडे जाण्यास सांगितले. त्यानुसार आपण श्री. देसाई यांच्याकडे गेलो असता त्यांनी आपल्याला कोणतीही माहीती देण्यास नकार दिला. तपासासंदर्भात आपण कुणालाही भेटत नाही आणि कुणीही आपल्याला भेटलेले चालत नाही, असे सांगितले. त्यानंतर आपण उठुन पोलीस निरीक्षक श्री. जाधव यांच्या दालनात जाऊन त्यांना श्री. देसाई यांनी आपल्याला माहीती देण्यास असमर्थता दर्शविली असल्याचे सांगितले. याचवेळी श्री. जाधव यांनी श्री. देसाई यांना आपल्या दालनात बोलावुन घेतले. तेथे चर्चा सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक श्री. देसाई यांनी आपल्या पायातील बुट घेवुन आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला. तेथील पोलीसांना त्यांना अडविले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झालेला आहे. या प्रकारासंदर्भात आपण त्यांच्याविरोधात वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आहे. पोलीस उपनिरीक्षकांनी माझ्यावर दबाव टाकण्यासाठीच हा सर्व प्रकार केलेला आहे. पोलीस वर्दीचा दुरूपयोग त्यांच्याकडुन झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आपण पोलीस अधीक्षक, मानवधिकार आयोगाकडे केली आहे."
-------------------
कोट
"वरिष्ठांनी अहवाल दिल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षकांना नोटीस पाठविलेली आहे. त्यांच्याकडुन खुलासा प्राप्त होताच वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील."
- अतुल जाधव, पोलीस निरीक्षक, वैभववाडी
------------------
कोट
"या प्रकरणाचा तपास मी करीत होतो. तपास करताना तपासाची माहिती किंवा कागदपत्रे कुणालाही दाखविता येत नाही; परंतु श्री. हत्ती यांच्याकडुन तपासाची माहिती मागितली जात होती. आपण ती न दिल्यामुळे त्यांनी आपल्याविरोधात तक्रार दिली आहे. त्याबाबत आपण योग्य तो खुलासा वरिष्ठाकडे करणार आहे."
- प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक, वैभववाडी
-----------------
चौकट
तपास काढला
तालुक्यातील तीन धरणांच्या कथित भष्ट्राचार प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई हे करीत होते; परंतु या प्रकरणानंतर आता हा तपास त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. हा तपास आता पोलीस उपनिरीक्षक सुरज पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57530 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..