
टुडे १ सं पट्टा
लक्झरी बसचे
पार्किंग धोकादायक
सावंतवाडीः नियोजित पत्रादेवी-झाराप महामार्गावरील झाराप (झिरो पॉईंट) परिसरात असलेल्या हॉटेलजवळ थांबविण्यात येणाऱ्या लक्झरी बस अपघातास निमंत्रण ठरत आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. येत्या आठ दिवसात संबंधित व्यावसायिक चालकांवर निर्बंध न आणल्यास उपोषणाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा भाजपचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रफिक इस्माईल शेख यांनी दिला आहे. झाराप झिरो पॉईंट येथे गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस उलट्या दिशेने येत हॉटेलकडे थांबतात. अशा धोकादायक बसेसमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित बस चालकाला विचारणा केली असता शिवीगाळ करून हुज्जत व अरेरावीची भाषा वापरली. येत्या चार दिवसांत कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे दाद मागणार आहे.
..................
वेंगुर्लेत उद्या
शिवसेनेची बैठक
वेंगुर्लेः येथील तालुका शिवसेना पक्षाची आज (ता. १२) होणारी मासिक बैठक शनिवारी (ता. १४) सकाळी ११ वाजता साईमंगल कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यात २६ ते २९ मे कालावधीत राबविण्यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौऱ्यात या अभियानाची यशस्वीता साधण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. तसेच आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुथनिहाय आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.
................
आरोग्य शिबिरास
वेंगुर्लेत प्रतिसाद
वेंगुर्लेः वैश्य समाज वेंगुर्ले, बी. एन. वालावलकर मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने येथील वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचा १७० रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिराचे उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे, मच्छीमार नेते वसंत तांडेल, सुहास गवंडळकर, पंकज शिरसाट, रवींद्र शिरसाट, डॉ. वजराटकर, डॉ. पवार, डॉ. राव, डॉ. रोहन नागरे, डॉ. स्वप्नील निकम, डॉ. विश्वंभर देवकर, डॉ. प्रचिता गुप्ता, डॉ. लोचन मालंडकर, डॉ. पल्लव मकानी, डॉ. मल्हार मुरंजन आदी उपस्थित होते.
...............
पारपोलीत आजपासून
वाढदिन सोहळा
सावंतवाडीः पारपोली गावचे ग्रामदैवत श्री देवी पावणाई-रवळनाथ वाढदिवसानिमित्त १३ व १४ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त मंदिरात उद्या ता. (१३) सायंकाळी ७ वाजता ठाणे डोंबिवली येथील बुवा मयूर दळवी व मळेवाड येथील बुवा राकेश नाईक यांच्यात डबलबारी भजन सामना होणार आहे. १४ ला सकाळी पूजा व अभिषेक, ९ धार्मिक कार्यक्रम, सायंकाळी ओटी भरणे व नवस फेडणे, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने, रात्री ९ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांचा सन्मान, १०.३० वाजता पालखी सोहळा व त्यानंतर माऊली दशावतार मंडळ, इन्सुली यांचा नाट्यप्रयोग होणार आहे.
.................
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57532 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..