
भोंगेप्रकरणी गुहागर तालुकावासीयांचे सहकार्य
भोंगेप्रकरणी तालुकावासीयांचे सहकार्य
पोलिस निरीक्षक; गुहागरवासीयांचे आभार मानले
गुहागर, ता. १३ः राज्यात भोंगे आणि हनुमान चालिसावरून वातावरण ढवळून निघाले; मात्र गुहागरमध्ये सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वधर्मिय मंडळींनी सहकार्य केले. कुठेही कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोचेल, असे किंचितही वातावरण निर्माण झाले नाही. त्याबद्दल गुहागर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक बी. के. जाधव यांनी तालुकावासीयांचे आभार मानले आहेत.
श्री. जाधव यांनी सांगितले, तालुक्यात २५ मशिदींवर भोंगे होते; मात्र तेथील व्यवस्थापनाने सहकार्य केले. पहाटे होणारी अजान आता लाऊडस्पीकरवरून होत नाही. दिवसा होणाऱ्या अजानचा आवाजही कमी ठेवण्यात आला आहे. तालुक्यात काही ठिकाणी मंदिर विशेषत: हनुमान मंदिर आणि मशिदीमधील अंतर कमी आहे. अशा ठिकाणी हनुमान चालिसा पठण होईल, अशी शक्यता होती. त्यासाठी आम्ही संबंधितांना भेटलो. संवाद साधला. त्यांनीदेखील समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य करणार नाही, असे स्वखुशीने सांगितले. राजकीय पक्ष आंदोलनात सहभागी होतील, अशी शक्यता लक्षात घेऊन सर्वपक्षीय कार्यकर्ते, तालुक्यातील प्रमुख मंडळींजवळ चर्चा केली. त्यांनीदेखील सहकार्याचीच भूमिका घेतली. त्यामुळे गुहागर तालुक्याची शांत, संयमी अशी ओळख आहे ती तालुकावासीयांनी सार्थ ठरवली आहे. याबद्दल तालुकावासीयांना धन्यवाद. यापुढेही दोन समाजात तेढ निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेला अडचण होईल असे कृत्य कोणाकडून घडू नये, अशी अपेक्षा जाधव यांनी व्यक्त केली
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57576 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..