
कशेडी घाटातील मदतकेंद्राचे होणार खवटीत स्थलांतर
-rat12p21.jpg
21292
खेडः सद्यःस्थितीतील कशेडी घाटातील पोलिस मदतकेंद्र.
-------------
कशेडी घाटातील मदतकेंद्राचे होणार खवटीत स्थलांतर
मुंबई गोवा चौपदरी मार्ग ः चौकीसाठी जागेचा शोध सुरू
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ ः तळकोकणात मुंबई- गोवा महामार्गावरून रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात प्रवेश करताना प्रवाशांच्या मदतीसाठी असलेले पोलिस मदतकेंद्र लक्ष वेधून घेते; मात्र चौपदरी राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला झाल्यानंतर या कशेडी पोलिस मदतकेंद्राचे स्थलांतर होणार आहे.
महामार्गावर प्रवास करणाऱ्या खासगी मालवाहू, प्रवासी वाहने, अवजड वाहने व प्रवासी यांच्यासाठी आपत्कालीन परिस्थितीत कशेडी घाटात असलेल्या पोलिस मदतकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी नेहमीच तत्पर असल्याचे दिसून येते; परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर या चौकीचे स्थलांतर करावे लागणार आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. महामार्गावरील वाढलेली वाहतूक लक्षात घेऊन या ठिकाणी रिक्त पद भरून पुरेसे पोलिस कर्मचारी आगामी काळात देण्याची गरज आहे.
गेल्या काही वर्षांत महामार्गावरील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महामार्गावरून धावणाऱ्या वाढत्या वाहनांच्या संख्येने अपघाताची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. वाढती वाहतूक, कोरोनाची पार्श्वभूमी आदी कारणांमुळे कशेडी घाटात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपस्थित कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. कशेडी पोलिस मदतकेंद्रात एका तुकडीला सलग २४ तास सेवा बजावावी लागते, तर उर्वरित कर्मचारी या दरम्यान विश्रांती घेतात. मदतकेंद्राची इमारत चांगल्या स्थितीत असून या ठिकाणी पाणी, वीज, प्रसाधनगृह आदी व्यवस्था पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. पोलिस पथकाकडे एक पेट्रोलिंग जीप, एक इंटरसेप्टर गाडी आहे; मात्र अपघातग्रस्त वाहने उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन क्रेन बंद अवस्थेत आहेत. यामुळे महामार्गावर अपघात झाल्यानंतर खासगी क्रेन येईपर्यंत अनेकदा वाहतूक पूर्णतः ठप्प होण्याचे प्रसंग उद्भवतात.
..
चौकट
दोन स्वतंत्र बोगदे तयार होणार
महामार्गाच्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामात सर्वात अवघड तीव्र नागमोडी वळणे असलेल्या या कशेडी घाटाला पर्याय म्हणून येण्या-जाण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात येत आहेत. पर्यायी बोगद्यांच्या कामानंतर या घाटातील मुख्य वाहतूक बंद होणार असल्याने पोलिस मदतकेंद्र घाटाच्या पायथ्याशी खवटी येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.
-------------------
चौकट
मदतकेंद्रात अपुरे पोलिस बळ
कशेडी घाटातील पोलिस मदतकेंद्रासाठी एकूण ४२ पदे मंजूर आहेत; मात्र सद्यःस्थितीत या पोलिस मदतकेंद्रात केवळ १२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये एक अधिकारी, ७ सहाय्यक पोलिस निरीक्षक/पोलिस उपनिरीक्षक, ३ पोलिस नाईक/ शिपाई व १ चालकांचा समावेश आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57577 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..