
घरांसाठी माजी सैनिकांचे ३३ वर्षे हेलपाटे
घरांसाठी माजी सैनिकांचे ३३ वर्षे हेलपाटे
प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष ; माजी सैनिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी, ता. १३ः देशसेवेसाठी जीवाची बाजी लावत अनेक युद्धांना सामोरे जाणारे सैनिक आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर आता हक्काच्या घरासाठी गेली ३३ वर्षे झगडत आहेत. माजी सैनिकांची प्रशासनाकडून हेळसांड सुरू असून, उतारत्या वयातही त्यांना हक्काची घरे मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. जो मानसन्मान सैन्यात कार्यरत असताना मिळत होता तो सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळत नाही, अशी खंत आणि नाराजी माजी सैनिक शंकर मिलके यांनी व्यक्त केली.
माजी सैनिक गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सर्व पदाधिकारी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. माजी सैनिकांच्या घरांचा प्रश्न सुटावा यासाठी प्रशासन सकारात्मक आहे; मात्र गेली ३३ वर्षे हा प्रश्न मार्गी लागत नाही, ही दुर्दैवी बाब आहे असे मिलके म्हणाले.
दरवेळी बघतो, पाठपुरावा करतो, अशीच उत्तरे प्रशासनाकडून माजी सैनिकांना दिली जातात. आता आम्ही वयाची सत्तरी पार केलेली माजी सैनिक आहोत, नियमानुसारच भूखंड द्यावा, अशीच मागणी आहे. आमची मात्र कोणी दखल घेत नाही. जोपर्यंत सैनिक सीमेवर लढत असतो त्याचे कौतुक केले जाते; मात्र तो निवृत्त होऊन घरी आला की, त्याचा तितकाच सन्मान केला जातो की नाही, याचा विचार शासनाने केला पाहिजे, ही खंत उपस्थित सर्व माजी सैनिकांनी व्यक्त केली. नवीन जिल्हाधिकारी आले की, त्यांची वेगळी धोरणे, वेगळे नियम आम्ही आणि किती वर्षे हक्काच्या घरांची वाट पाहायची, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
जवळपास २० माजी सैनिक आजही घरांच्या प्रतीक्षेत आहेत. आम्ही १९६२ पासून १९७७ पर्यंत सुमारे १५ वर्षे आर्मीमध्ये देशसेवा केली. पंजाब येथे खेमकरन या ठिकाणी घनघोर युद्ध झाले. त्या युद्धाच्या आठवणी आजही आमच्या मनात ताज्या आहेत. अशा अनेक आठवणी घेऊन आम्ही अभिमानाने जगत असताना प्रशासनाकडून आमचा भूखंडचा प्रश्न मार्गी लागत नाही. हे दुर्दैवी आहे.
- शंकर मिलके, माजी सैनिक
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57594 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..