
दाभोळ ः व्हीआयपी सूटमध्ये कुत्र्याची जोडी खातेय एसीची गार हवा
फोटो ओळी
-rat12p38.jpg ः
२१३७१
दापोली ः एसीची गार हवा खात बेडवर बसलेला कुत्रा.
व्हीआयपी सूटमध्ये
कुत्र्याच्या जोडीला एसीची हवा
दापोलीत विश्रामगृहातील प्रकार; सूट घेणारी व्यक्ती एसी सुरू ठेऊन फिरायला
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १२ ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दापोली येथील शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवून चक्क एका कुत्र्याची जोडी सूटमधील बेडवर आराम करताना पाहून या ठिकाणी आलेल्या पत्रकारांना आज दुपारी आश्चर्याचा धक्काच बसला. या कुत्र्याच्या जोडीला या सूटमध्ये ठेवून कुलूप लावून त्यांचे मालक बाहेर फिरायला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराने शासकीय मालमत्तेचा कसा दुरुपयोग केला जातो व '' समर्थाघरचे श्वान त्यासी देती सर्वही मान'', ही उक्ती किती सार्थ आहे, हे समोर आले आहे.
आज दुपारी काही पत्रकार दापोली येथील शासकीय विश्रामगृह येथे गेले असता त्यांना या विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमध्ये कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पत्रकार या कक्षाजवळ गेले असता या कक्षाला बाहेरून कुलूप असल्याचे दिसले तर या सूटमधील एसीही सुरूच असल्याचे एसीच्या आवाजावरून समजले. पत्रकारांनी या कक्षाच्या खिडकीतून आत पाहिले असता त्यांना ज्या बेडवर महत्त्वाच्या व्यक्ती आराम करतात त्याच बेडवर कुत्रा बसून आराम करत असल्याचे दिसले.
पत्रकारांनी या संदर्भात विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्याकडे हा व्हीआयपी सूट कुणाला दिला आहे, अशी विचारणा केली असता या सूटचे बुकिंग तहसीलदारांच्या पत्रानुसार करण्यात आले असून ८ ते ११ मे पर्यंत सूटचे बुकिंग करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. आलेल्या अधिकाऱ्यांची नोंद विश्रामगृहाच्या नोंदवहीत करण्यात आली आहे का, अशी विचारणा केली असता सूट सोडताना ही नोंद केली जात असल्याची माहिती या कर्मचाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा सूट नक्की कोणाला दिला गेला आहे, याची माहिती मिळू शकली नाही.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधला असता या अधिकाऱ्यांचे बुकिंग ११ मे पर्यंतच होते. आम्ही त्यांना हा सूट सोडण्यासंदर्भात सांगितले होते; मात्र त्यांनी बुधवारी (ता. ११) हा सूट सोडला नाही.
राज्यात एकीकडे विजेची टंचाई असताना शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमध्ये कुत्र्यांना एसीत ठेवून स्वत: मात्र बाहेर फिरायला जाणाऱ्या अधिकाऱ्याच्या वर्तनाची चर्चा सुरू आहे.
-------
कोट
सूटमध्ये आलेले अधिकारी कुत्रे घेऊन येणार आहेत हे मला माहीत नव्हते. आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पटेल यांनी हे अधिकारी कुत्रे घेऊन आले असल्याची माहिती दिली.
--शरद पवार, उपविभागीय अधिकारी, दापोली
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57596 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..