
मालवण शहराचे स्वच्छतेत तीन तेरा
समस्या गंभीर; मुख्याधिकारी सुशेगाद
राजन वराडकरांची टिका; मालवण शहराचे स्वच्छतेत तीन तेरा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः शहरात स्वच्छता, पथदिवे, गटार, नालेसफाई यांसारख्या समस्या गंभीर बनत चालल्या असताना पालिकेचे मुख्याधिकारी सध्या सुशेगाद असल्याचे दिसून येत आहे. त्यांना जनतेच्या हिताचे काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे सध्या पालिकेची अवस्था आंधळ दळतंय आणि.... अशी झाली आहे. मुख्याधिकारी केवळ आपल्या ठेकेदारांचे हितसंबंध जोपासण्यातच मग्न असल्याची टीका पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी आज येथे केली.
येथील मिरा कान्हा रसोई हॉटेल येथे पत्रकार परिषद झाली. श्री. वराडकर म्हणाले, ‘‘ शहरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. ठेकेदाराने करारात नमूद केल्याप्रमाणे दररोज घराघरात जावून कचरा उचलायचा आहे. प्रत्यक्षात असे होते का? असा प्रश्न आहे. शहरातील काही भागात आठ आठ दिवस कचरा उचलण्यासाठीच गाडीच जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांनी डंपिंग कॉर्नर तयार केले. दररोज जर कचरा उचलला गेला तर रस्त्यावर अन्य ठिकाणी कचरा टाकला जाणार नाही; मात्र कचरा नियमित उचलला जात नसल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे; मात्र ही परिस्थिती बघायला मुख्याधिकार्यांना वेळ नाही. या कामाचा ठेका घेतलेला ठेकेदार केवळ बिल घेण्यासाठीच येथे येतो. करारात नमूद केल्यानुसार पंधरा माणसे देणे आवश्यक असताना केवळ सात ते आठ माणसेच काम करत आहेत. ठेकेदाराने कराराचा भंग केला असतानाही त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नाही. पालिका प्रशासनाने ज्याप्रमाणे घरपट्टी वसुली केली त्याप्रमाणे शहरातील नागरिकांना मुलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम पालिकेचे नाही का?’’
शहरातील बंद पथदिव्यांबाबत नागरिकांसह नगरसेवकांनी पालिकेच्या तक्रार नोंद वहीत तक्रारी नोंदविलेल्या आहेत; मात्र पथदिव्यांच्या दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेतलेले नाही. संबंधित ठेकेदारानेही याकडे दुर्लक्ष केले आहे. शहरातील अनेक भागात हायमास्ट तसेच पथदिवे दिवस-रात्र सुरू असतात. याकडेही मुख्याधिकाऱ्यांना बघण्यास वेळ नाही. रॉकगार्डनसह स्मशानभूमीच्या देखभाल दुरूस्तीसाठी महिनाकाठी एक लाख रुपयांचा खर्च केला जातो. यापूर्वीच्या ठेकेदाराकडून चांगले काम होत होते; मात्र सध्याचा ठेकेदार ही कामे करतो आहे का? अनेक नागरिकांनी, पर्यटकांनी अस्वच्छतेचे व्हिडीओ सोशल मिडीयावरून व्हायरल केले आहेत. हे सर्व पाहता मुख्याधिकाऱ्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का की अन्य कोणते कारण आहे असा प्रश्नही श्री. वराडकर यांनी उपस्थित केला आहे.
---------------
चौकट
दुकानात पाणी घुसण्याची शक्यता
पावसाळ्यापूर्वी गटार, नालेसफाई ही कामे होत होती; मात्र आता मे महिना संपत आला तरी या कामांचा पत्ताच नाही. पावसाळा जवळ आल्याने या कामांना प्रत्यक्षात सुरवात व्हायला हवी होती; मात्र अद्यापही ही कामे सुरू न झाल्याने नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्या दुकानात पावसाचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
---------------
चौकट
अनेक प्रश्न अनुत्तरीत
तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने २५ लाख रुपये खर्च करून कपाटे खरेदी केली. यातील बरीच कपाटे ही वापराविना पडून आहेत. हा जनतेच्या पैशांचा अपव्यय नाही का? आत्ताच्या मुख्याधिकाऱ्यांनीही ऑनलाईन पद्धतीने खरेदी केलेले डस्बीन शहरात ठेवण्यात आले खरे; पण त्यातील कचरा कोणी उचलायचा? या सर्व प्रश्नांची उत्तरे मुख्याधिकारी देतील काय? प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांची ही जबाबदारी नाही का? आलेला निधी खर्च करणे एवढेच त्यांचे काम आहे का? असा प्रश्नही श्री. वराडकर यांनी उपस्थित केला आहे.
------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57630 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..