
मालवणात महावितरणचा झटका
मालवणात महावितरणचा झटका
लाखोंची हानी; उच्चदाब पुरवठ्यामुळे उपकरणे जळाली
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १२ ः शहरातील भरड येथील रोहित्रामधून आज सकाळी अचानक अति उच्चदाबाच्या वीज पुरवठ्यामुळे अनेक नागरिकांचे फ्रीज, इन्व्हर्टर, सीसीटीव्ही, वीज मीटर, पंखे तसेच अन्य इलेक्ट्रिक साहित्य जळाले. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शहरातील भरड भागात असलेल्या विद्युत रोहित्रांमध्ये दोन दिवसांपूर्वी बिघाड झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा बिघाड दूर करत वीजपुरवठा पूर्ववत केला; मात्र आज सकाळी नऊच्या दरम्यान या विद्युत रोहित्रांमधून अति उच्चदाबाने झालेल्या वीजपुरवठ्याचा फटका भरड भागासह बाजारपेठेतील अनेक नागरिकांना बसला. यात नागरिकांचे पंखे, फ्रीज, ट्यूबलाईट, इन्व्हर्टर, सीसीटीव्ही, टीव्ही संच जळाले. मोठमोठ्याने पंखे फिरू लागल्याने काही नागरिकांनी वीज मीटर बंद केले; मात्र काहींना याचा अंदाज न आल्याने त्यांचे इलेक्ट्रॉनिकचे साहित्य जळाले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याचा जास्त फटका भरड भागासह बाजारपेठेतील नागरिक, तसेच व्यापाऱ्यांना बसला. नागरिकांनी महावितरणशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी वायरमनने तांत्रिक बिघाडामुळे अति उच्च दाबाचा पुरवठा झाला असल्याची शक्यता वर्तविली; मात्र नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या संदर्भात महावितरणचे अभियंता गणेश साखरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. शहरात यापूर्वीही अति उच्च दाबाच्या पुरवठ्यामुळे इलेक्ट्रॉनिक साहित्य जळाल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र याबाबतची तक्रार करूनही नागरिकांना नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यामुळे तक्रार देऊन फायदा काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57664 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..