अपरांतावर नितांत प्रेम करणारे कवी काटदरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपरांतावर नितांत प्रेम करणारे कवी काटदरे
अपरांतावर नितांत प्रेम करणारे कवी काटदरे

अपरांतावर नितांत प्रेम करणारे कवी काटदरे

sakal_logo
By

इये साहित्याचिये नगरी

21477
कवी माधव केशव काटदरे
-----------------
अपरांतावर नितांत प्रेम करणारे कवी काटदरे

अपरांतावर नितांत प्रेम करणारे इथला दैदिप्यमान इतिहास, इथल्या वृक्षवल्ली गडकोट, अमर्याद जलधी आपल्या काव्यातून अक्षरांकित केले ते कवी माधव केशव काटदरे!

काटदऱ्यांचे मूळगाव गुहागर तालुक्यातील शीर. माधवांचा जन्म त्यांच्या आजोळी ३ डिसेंबरला कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर इथे झाला. मलकापूर हे विशाळगड जहागिरीचे पंतप्रतिनिधी यांच्या राजधानीचे गाव. माधव काही दिवस मलकापूरच्या प्राथमिक शाळेत शिकले. पंतप्रतिनिधींच्या वाड्यात रामायणावरील आधारित काही चित्रे रंगवली होती. ती बघून माधवांनाही चित्रकलेची आवड निर्माण झाली. पुढे शीर गावातच पंतोजींच्या शाळेत तिसरीपर्यंत शिकले. नंतर शिक्षणासाठी गुहागर येथे आले. पाचवीच्या वर्गात शिकत असताना बालवयातच त्यांचा प्रथम विवाह झाला व इंग्रजी शिक्षणासाठी रत्नागिरी येथे गेले. या काळात त्यांचा आधुनिक कवितेशी परिचय झाला. आपणही अशी कविता लिहावी, ही प्रेरणा मनात निर्माण झाली.
१९११ ला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊन माधव नोकरीसाठी मुंबर्इला गेले. काही काळ शाळेत शिक्षक म्हणून व नंतर कस्टम्स खात्यात नोकरीला लागले. १९१५ला अल्पशा आजाराने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. याच काळात त्यांचा पहिला कवितासंग्रह ''धुरवावरील फुले'' हा प्रकाशित झाला. अव्वल इंग्रजी अंमल असल्याने त्या वेळी ऐतिहासिक कविता लिहिल्या जात नव्हत्या; मात्र पहिले महायुद्ध सुरू झाले. खुद्द इंग्लंडवर हल्ले सुरू झाले आणि भारतातून सैन्यभरती सुरू झाली. भारतीय सैनिकांना प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इंग्रजांची भूमिका बदलली. याचा लाभ घेऊन आपण ऐतिहासिक कविता लेखन करावे, असा निश्‍चय करून माधवांनी ऐतिहासिक काव्य लिहायला प्रारंभ केला.
माधव इतिहासाचे साक्षेपी अभ्यासक होते. कोकण हा त्यांचा अभिमानाचा आणि जिव्हाळ्याचा विषय होता. कविपंचक लिहिणारे ग. त्र्यं. माडखोलकर हेही मूळ कोकणातील! त्यांनी माधवांना ''सरखेल आंग्रे यांच्या कार्यावर काव्यलेखन करा'', असे सांगितले आणि माधवांनी निश्‍चय केला, या विषयावर महाकाव्य लिहिण्याचा. कुठल्याही महाकाव्याचा प्रारंभ मंगलाचरणाने होतो. माधवांच्या प्रतिभेला ही अपरान्तभूमी साद घालू लागली. माधवांनी मंगलाचरण म्हणून कविता लिहिली.
सह्याद्रीच्या तळीशोभते हिरवे तळकोंकण
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन!
झुळझूळ गाणे मंजुळवाणे गात वाहति झरे
शिलोच्चयातूनि झुरूझुरू जेथे गंगाजळ पाझरे,
माधवांची ही कविता मराठी काव्यविश्‍वातील लखलखत्या हिऱ्यासारखी आहे. माधवांनी आंग्रे यांच्यावर काही कविता लिहिल्या. दुर्दैवाने त्यांना रक्तदाबाचा विकार बळावला आणि हे महाकाव्य अपुरे राहिले; मात्र त्यातील काही कविता विशेषतः ''आंग्रेकालीन विजयदुर्ग उर्फ घेरिया'', ''शाहूराजांचा उमराव'', या कविता अभ्यासकांना आनंद देण्याऱ्या आहेत.
माधवांच्या एतिहासिक कवितेत ''शिवकालीन रायगड'', ''पानपतचा सूड'', ''तारापूरचा संग्राम'', ''गोकलखां'' या कविता अविस्मरणीय आहेत. माधवांनी रवींद्रनाथांच्या अनेक कविता भाषांतरित केल्या. वेदांची अनेक सुक्ते रूपांतरित केली. एफ. डी. हेमन्सची गाजलेली ''कॅसाबियांका'' ही कविता ''छोटा जलवीर'' म्हणून मराठी साज लेवून आणली. माधवांची निसर्गकविता म्हणजे अपरान्तभूमीला अर्पण केलेली काव्यपुष्पेच! ''मोरऱ्यांची मोहना'', ''गोमेटे कांटली'', या कविता कोकणचा निसर्ग आपल्या डोळ्यांसमोर साकारतात.
माधवांचा उत्तर आयुष्यात चिपळूणला निवास होता. चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचनमंदिराचे काही काळ अध्यक्ष होते. लोटिस्मा त्यांच्या स्मृत्यर्थ आदराने प्रतिवर्षी ''कवी माधव पुरस्कार'' देते. १९९२ ला माधवांची जन्मशताब्दी चिपळूणकरांनी अत्यंत उत्साहाने साजरी केली. त्या निमित्त कोमसापचे पहिले साहित्य संमेलन चिपळूणला झाले. माधवांच्या ''हिरवे तळकोंकण'' कवितेच्या कांही पंक्ती सह्याद्रीच्या काळ्या दगडावर कोरून केलेले शब्दशिल्प चिपळूणकरांनी आदराने जतन केले आहे. ३ सप्टेंबर १९५८ला माधवांची लेखणी त्यांच्या चिरविश्रांतीने थांबली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57766 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top