
यंदाही माडखोलला पुराचा धोका
21519
माडखोल ः नदीला गतवर्षी आलेला पूर. (संग्रहित छायाचित्र)
माडखोलला यंदाही पुराचा धोका
गाळ कायम; मंजूरी मिळूनही कामाला दिरंगाई
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः माडखोल नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत शासनस्तरावरून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही केवळ जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे हे काम रखडले आहे. आता मेचा पंधरवडा उलटल्यामुळे हे काम आता शक्य नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळेच यावर्षीसुद्धा माडखोल धवडकीवासीयांना पुराचा सामना करावा लागणार असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
माडखोल गावातून वाहणाऱ्या तेरेखोल नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीपात्र रुंदावत आहे. धवडकी परिसरात नदीपात्राचे दोन प्रवाह निर्माण झाले आहेत. परिणामी अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निर्माण होऊन परिसरातील दुकानदार व्यावसायिक तसेच ग्रामस्थांना पुराचा फटका सहन करावा लागतो. गतवर्षी आलेल्या पुरात येथील ग्रामस्थांना मोठी हानी सहन करावी लागली होती. हीच स्थिती तेरेखोल नदीकाठी असलेल्या सर्वच गावातील ग्रामस्थांची होती. कधी नाही एवढी भयंकर पूरस्थिती अनेकांनी अनुभवली होती. या पुरस्थितीनंतर राज्याने गंभीर दखल घेण्यात आली होती. संपुर्ण कोकणातील नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या.
माडखोल येथील ग्रामस्थांकडून दरवर्षी या भागातील गाळ काढण्याची मागणी करण्यात येते; मात्र आतापर्यंत त्यांचे प्रशासनाने काहीच ऐकले नाही; मात्र यावर्षी शासनाकडूनच हिरवा कंदील मिळाल्यानंतर तेथील ग्रामस्थांच्या व पुरग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. केवळ आशा निर्माण करुन याबाबत अद्याप काहीच हालचाली नसल्याने यावर्षी तरी हे काम होण्याची चिन्हे दिसत नाही.
अलिकडेच पाटबंधारे विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नदीपात्राच्या भागाचा सर्व्हे करुन तसा अहवाल त्यांना सादर केला होता. त्यामुळे एकुणच गाळ काढण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने आशा निर्माण झाली होती. हा अहवाल जाऊनही अद्याप कुठलीच प्रक्रीया याठिकाणी सुरू नाही. अलिकडेच ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर यासाठी उपोषणही छेडले होते. थातुर मातुर उत्तरानंतर हे उपोषण उठले होते. सद्यस्थितीत मेचा पंधरवडा उलटला. आता पायथ्याजवळ आल्याने हे काम यापुढे हाती घेतल्यास ते पूर्ण होणे कठीण आहे. कारण मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने तो आठ-पंधरा दिवसात काढून पूर्ण होणार नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
विलवडेत काही प्रमाणात यश
दुसरीकडे विलवडे गावातील नदीपात्रातील काही प्रमाणात गाळ काढण्यात यश आल्याचे महसुलचे म्हणणे आहे. यासाठी आवश्यक ती शासकीय प्रक्रिया वेळेत झाल्याने ते शक्य झाल्याचे महसुलचे म्हणणे आहे. त्यामुळे माडखोल नदीपात्रातील गाळ काढण्याबाबत प्रश्न निर्माण झाला असून यावर्षीही तेथील ग्रामस्थांना पुराचा सामना करावा लागणार आहे.
माडखोल नदीपात्रातील गाळाबाबात पाटबंधारे विभागाकडून झालेल्या सर्व्हे अहवालावर जिल्हाधिकारी पातळीवर निर्णय होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत याबाबत ठराव घेऊन कामाची टेंडर प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल; मात्र याबाबत सर्व निर्णय जिल्हा पातळीवरच होतील.
- मनोज मुसळे, नायब तहसीलदार, सावंतवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57799 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..