
सिंधुदुर्गात 1 जूनपासून मासेमारी बंदीचे आदेश
सिंधुदुर्गात १ जूनपासून
मासेमारी बंदीचे आदेश
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जूनपासून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छीमारांची जीवित व वित्त यांचे रक्षण करणयाच्या हेतूने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमद्वारे प्राप्त अधिकारांचा वापर करून १ जून ते ३१ जुलै राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारी नौंकास पावसाळी मासेमारी बंदी घातली आहे. या कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब, वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी बंदी लागू केली आहे. ही पावसाळी मासेमारी बंदी यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापुढे ) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्राच्या खोल समुद्रातील मसेमारीबाबतचे धोरण, मार्गदर्शक सूचना, आदेश लागू राहतील. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात ( सागरी किनाऱ्यापासून १२ सागरी मैलापर्यंत) यांत्रिक मासेमारी नौकांस पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास, केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल. कलम १७ मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडुन कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही. बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिद्ध आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57858 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..