
सिंधुदुर्गात २४ मे पर्यत मनाई आदेश
सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ मेपर्यंत
प्रशासनाकडून मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात २४ मेपर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. जिल्ह्यात विविध धार्मिक सण साजरे होत आहेत तसेच राज्यात सध्या विविध ठिकाणी सांप्रदायिक घटना घडत असून त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यात आगामी होणाऱ्या ७६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका व आरक्षणाच्या मुद्यावरून एखादी घटना, कार्यक्रमातून तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सामाजिक व वैयक्तिक कारणासाठी, मागण्यांसाठी सध्या जिल्ह्यात आंदोलने, निदर्शन होत असून आगामी काळात जिल्ह्यात अचानकपणे उपोषणे, मोर्चा, निदर्शन, रास्तारोको वगैरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना प्राप्त असलेल्या शक्तीचा वापर करून महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार १० मे रात्री बारा वाजल्यापासून ते २४ मे रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्ह्याच्या संपूर्ण भूभागात मनाई आदेश लागू केला आहे.
जि. प. कर्मचारी महासंघाची उद्या सभा
कणकवलीः जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता.१५) दुपारी चारला येथील हॉटेल नीलम कंट्री साईड येथे सभेचे आयोजन केले आहे. जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ संलग्न सर्व संघटनांचे पदाधिकारी तसेच प्रातिनिधीक स्वरुपात काही कंत्राटी कर्मचाऱ्यांनीही उपस्थित रहावे. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू होण्याच्या मागणीबाबत माहिती देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय आंदोलनाच्या माध्यमातून मंजूर व प्रलंबित मागण्यांबाबत आढावा व राज्य, राष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक कामांचा आढावा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग यांनी म्हटले आहे.
जिल्हा नियोजनची २० रोजी सभा
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा नियोजन समितीची सभा २० मेस सकाळी ११ वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये ही सभा आयोजित केल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी कळविले आहे.
वेंगुर्ले-कॅम्प येथे आज नाटक
वेंगुर्ले ः कॅम्प-भटवाडी येथील श्री गणपती मंदिराचा वर्धापनदिन सोहळा १४ मेस होणार आहे. यानिमित्त धार्मिक कार्यक्रम व रात्री ८ वाजता सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा ’शापमुक्त’ हा नाट्यप्रयोग होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57873 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..