
भातशेतीच्या मशागतींना वेग
भातशेतीच्या मशागतींना वेग
पेण : काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन उन्हाचा पारा वाढला आहे. दोन दिवसांपासून तर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पेण तालुक्यातील भातशेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागातील शेतकरी या कामांमध्ये व्यग्र झाले आहेत. राज्यात तीन वर्षांपासून सतत मुसळधार पाऊस, चक्रीवादळ, तोक्ते वादळ, वादळ वाऱ्यासह पाऊस, कोरोना संसर्ग या सर्व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी राजा पूर्णता होरपळून गेला आहे. या वर्षी मात्र सर्व गोष्टींना बाजूला सारून तालुक्यातील शेतकरी नव्या उमेदीने शेती कामात लागले आहेत. हवामान खात्याने राज्यात लवकरच पाऊस असल्याचे सांगितल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीचे नियोजन करत आहेत. शेतीसाठी लागणारा रासायनिक खताच्या किमती गगनाला भिडले आहे. शेती साहित्य, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशकांसह शेतात काम करणाऱ्या मजुरांचेही दर वाढले आहे. मात्र, भाताच्या उत्पादनात हमीभाव मिळत आहे.
--
`बियाणे खरेदीवेळी काळजी घ्यावी`
अलिबाग : खरीप हंगामाला सुरुवात होणार असल्याने विविध कंपन्यांचे बियाणे कृषी सेवा केंद्रावर विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. आपली फसवणूक आणि नुकसान होऊ नये, यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीला प्राधान्य द्यावे. बनावट, भेसळयुक्त बियाणे खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करावी. पावती व बियाण्यांचा संपूर्ण तपशील (जसे पीक, बाण, संपूर्ण लॉट नंबर, बियाणे कंपनीचे नाव, किंमत, खरेदीदाराचे संपूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याचे नाव इत्यादी) नमूद करावे. रोख किंवा उधारीची पावती घ्यावी. खरेदी केलेल्या बियाण्यांचे वेष्टन, पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. खरेदी केलेले बियाणे त्या हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्यांची पाकिटे सील बंद, मोहर बंद असल्याची खात्री करावी. बियाणे पाकिटावरची अंतिम मुदत पाहून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी प्रयत्न
माणगाव : समाजसुधारक विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे राष्ट्रीय आणि सामाजिक कार्य समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विष्णुबुवा ब्रह्मचारी सामाजिक केंद्राकडून विविध सामाजिक, शैक्षणिक व आध्यात्मिक उपक्रम राबवले जातात. संस्कृत भाषेचा प्रचार-प्रसार आणि संस्कृत भाषा वृद्धीसाठी केंद्राकडून माणगाव येथील अशोकदादा साबळे विद्यालयात ७ ते १५ मे या कालावधीत दररोज सायंकाळी ५.४५ ते ७ वाजेपर्यंत संस्कृत संभाषण वर्गाचे घेतले
जात आहे. या वर्गाला मुले, मुली व पालक उत्तम प्रतिसाद देत असून दररोज अभ्यास घेतला जात आहे. या वर्गाला शिक्षिका स्वाती चक्रदेव यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सुरेश गोखले, नितीन बामगुडे, प्रतिभा पोळेकर, रोहिदास घरत, नगरसेविका नंदिनी बामगुडे, नेहा केकाणे, दिलीप मोने,राहुल तळकर, उत्तम पाटील, जंगम काका यांचे सहकार्य लाभले आहे. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थी-पालकांना संस्कृत भाषेचे अध्ययन करायला मिळत असल्याने त्यांनी केंद्राचे आभार मानले आहे.
--
संत महात्म्यांची गगनगिरी मठात मांदियाळी
खोपोली : खोपोलीतील पूज्य गगनगिरी मठातील गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलश स्थापित करण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नाणीज धर्मपिठाचे पीठाधीश आचार्य नरेंद्र महाराज यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातून संत महात्म्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. संत महात्म्यांची मांदियाळी शुक्रवारी असणार आहे. गगनगिरी मठ व्यवस्थापन समिती आणि समितीचे प्रमुख आशीष महाराज यांच्या नेतृत्वाखाली गगनगिरी महाराज भक्त गण यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे. शुक्रवारी पहाटे ४.३० वाजता शाही मंगलस्नान, काकड आरती, धार्मिक पूजा अर्चा होणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवर संतांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दुपारी १२ ते १ च्या दरम्यान गगनगिरी महाराज पर्णकुटीवर सुवर्ण कलशाची स्थापना होणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57876 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..