
रत्नागिरीत 33 मुलांकडून वाहतूक कायद्याचे उल्लंघन
३३ मुलांकडून कायद्याचे उल्लंघन
पालकांचे दुर्लक्ष; वाहतूक विभागाकडून १ लाख ६५ हजाराचा दंड वसूल
रत्नागिरी, ता. १३ ः अठरा वर्षाखालील मुलांकडे वाहन चालवण्याबाबत पालकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अशा मुलांनी वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे. वाहन चालवलेल्या ३३ मुलांनी कायद्याचे उल्लंघन करून वाहन चालवल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून १ लाख ६५ हजाराचा दंड वसूल केला आहे.
वाहन ही कुटुंबाची गरज बनली असल्याने प्रत्येकाच्या घरात वाहन आहेत. त्यामुळे बहुधा दहावीची परीक्षा दिल्यानंतर मुले सर्रास वाहन चालवतात. वास्तविक अठरा वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्यांनी वाहन चालवणे कायद्याने गुन्हा आहे; मात्र, तरीही अल्पवयीन मुलांकडून सर्रास कायद्याचे उल्लंघन होताना दिसते. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन दिल्यानंतर पालकांवर गुन्हा दाखल केला जातो; परंतु वाहतूक पोलिसांकडून सहानुभूती दर्शवली जात असल्याने पालकांवर गुन्हा दाखल न करता केवळ दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
अठरापेक्षा वय कमी असले तरी मुले धुम स्टाईल वाहन चालवतात. त्यामुळे अनेकदा अपघातात झाले आहेत. यात दुसऱ्याचा नाहक बळी जातो किंवा त्या मुलाला जीव गमवावा लागतो. इतकेच नव्हे, तर गंभीर दुखापतीत अवयवही निकामी होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनाने कायद्यात सुधारणा करून अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन दिल्यास पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. कायद्याचा बडगा उगारण्यापूर्वी वाहतूक पोलिसांकडून पालक व मुलांनाही समज दिली जात आहे.
चौकट
...तर होऊ शकते पालकांना तुरुंगवास
अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवताना गुन्हा घडल्यास वाहनमालक पालकांना २५ हजार रुपयांचा दंड व ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पालकांनी मुलं कितीही लाडाची असली तरी मुलांच्या हातात वाहन देण्यापूर्वी विचार जरूर करावा. भविष्यात अपघात होऊन जीवितहानी किंवा शारीरिक नुकसानाची समज मुलांना द्यावी.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57921 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..