
आमदार राणेंनी स्टंटबाजीपेक्षा भाजी मार्केटचा वाद मिटवावा
21617
सुशांत नाईक
आमदार राणेंनी स्टंटबाजीपेक्षा
भाजी मार्केटचा वाद मिटवावा
नाईक : कणकवलीची अपूर्ण कामे पूर्ण करा
कणकवली, ता.१३ : शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी विक्रेत्यांचे विस्थापन करण्याची स्टंटबाजी करण्यापेक्षा आमदार नीतेश राणे यांनी आधी भाजी मार्केटचा वाद मिटवावा. अपूर्ण स्थितीतील भाजी मार्केट पूर्ण करून तेथे भाजी विकेत्यांची व्यवस्था करावी, असे आवाहन नगरपंचायतीचे विरोधीपक्ष गटनेते सुशांत नाईक यांनी केले. शहरात घडणाऱ्या घडामोडींवर नाईक यांनी बोट ठेवत प्रसिद्धी पत्रकाद्वारे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
नाईक म्हणाले, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे राणेंच्याच भाजप पक्षात आहेत. यात राजन तेली हे भाजी मार्केटची उभारणी करत आहेत; मात्र त्यांच्यात आणि नगराध्यक्ष नलावडे यांच्यात वाद असल्याने भाजी मार्केट इमारतीचा प्रश्न रखडला आहे. त्यामुळे राणे यांनी नलावडे आणि तेली यांना एकत्र बसवून भाजी मार्केटचा वाद मिटवावा. हा वाद मिटला तर शहरातील सर्व भाजी विक्रेत्यांची व्यवस्था नगरपंचायतीच्या नव्या भाजी मार्केटमध्ये होऊ शकते. तसेच सर्व विक्रेते त्या इमारतीमध्ये गेले तर शहरात वाहतूक कोंडीचाही प्रश्न निर्माण होणार नाही.
नाईक म्हणाले, शहर बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांनी दुकाने मांडू नयेत, असे आवाहन आमदार राणे यांनी केले होते; मात्र भाजी विक्रेत्यांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. गेले दोन दिवस बाजारात पुन्हा भाजी विक्रेत्यांची दुकाने जैसे थे राहिली. अखेर नगरपंचायतीला कारवाई करून भाजी विक्रेत्यांना हटवावे लागले. यावरून राणेंना आपल्या शब्दाचे वजन कळले असेल. ते म्हणाले, आमदार राणेंना भाजीविक्रेत्यांसदर्भात नगरपंचायतीत बैठक घ्यावी लागते, यावरूनच नगराध्यक्ष व सत्ताधारी हे कचरा टेंडर, ठेकेदारी व बिल्डिंगमध्ये गुंतले असल्याचे स्पष्ट होते. नगरपंचायतीचे सत्ताधारी अकार्यक्षम ठरल्याने आमदारांना भाजीविक्रेत्यांसाठी नगरपंचायतीत येऊन बैठक घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57930 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..