
रक्तसंकलन जिल्ह्यात; विक्री कोल्हापूरात?
21747ः संग्रहीत
...
रक्तसंकलन जिल्ह्यात; विक्री कोल्हापूरात?
रत्नागिरीत वारंवार शिबिरे; राजेश नार्वेकरांची तक्रार, शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून खंडन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ : रक्ताचा काळाबाजार करणारी एक टोळी सक्रिय झाल्याची जोरदार चर्चा आहे. या टोळीशी संबंधित काम करणारे खासगी रक्तपेढीतील माजी कर्मचारी असल्याचेही बोलले जात आहे. कोल्हापूर येथील एका खासगी रक्तपेढीच्या माध्यमातून रत्नागिरी वारंवार रक्तदान शिबिराचे आयोजन केली जातात. त्यामुळे याबाबत अनेकांना संशय असून कोल्हापूरमध्ये रक्ताची एक बॅग २ हजार ८०० रुपये पर्यंत विकली जात असल्याची तक्रार रत्नागिरी जिल्हा थॅलेसिमिया सन्मवयक राजेश नार्वेकर यांनी केली आहे. मात्र, आमच्यापर्यंत असा कोणताच प्रकार आलेला नाही, पुरावा मिळाल्यास कारवाई करू, असे जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
कोल्हापूर येथील एक रक्तपेढी रत्नागिरी जिल्ह्यात वारंवार रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. आजपर्यंत रत्नागिरीतून १५० ते २०० दाते रक्तदान करून त्या रक्ताच्या पिशव्या कोल्हापूरला नेल्या जातात, असा संशय आहे. रत्नागिरीतून रक्त घ्यायचे आणि ते २८०० रुपयांना एक पिशवी या प्रमाणे कोल्हापुरात विकायचे, असा व्यवसाय सुरू असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्हा थॅलेसिमिया सन्मवयक राजेश नार्वेकर यांनी याबाबतची तक्रार केली. मात्र, कोणतीही रक्तपेढी कोणत्याही जिल्ह्यात जाऊन रक्तदान शिबिर घेऊ शकते, असे उत्तर त्यांना देण्यात आले. मात्र, वारंवार असे रक्तदान शिबिराचे आयोजन एकाच ठिकाणी परजिल्ह्यातील रक्तपेढी घेऊ शकत नसल्याने नार्वेकर यांनी सांगत या विरोधात आवाज उठवला आहे.
..
चौकट
अन्नऔषध प्रशासनाकडे तक्रार
यापूर्वी सलग तीन ते चार वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले. आता पाचव्यांदा अशा प्रकारच्या रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याने हे शिबिर कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा राजेश नार्वेकर यांनी दिला आहे. या विरोधात कायदेशीर कार्यवाहीसाठी नार्वेकर यांनी एसबीडीसी तसेच जिल्हा रुग्णालय आणि अन्नऔषध प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे.
------------
कोट
आमच्यापर्यंत असा काही विषय आलेला नाही. उलट अन्य ठिकाणी रक्तदान शिबिर घेतल्यानंतर रक्ताच्या बॅगा स्टोअरेजसाठी आपल्याकडे आणल्या जातात. तरीही असा प्रकार घडत असले तर पुराव्यानिशी द्यावा, त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.
-सौ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
..
एक नजर..
कोल्हापूरातील खासगी रक्तपेढीच्या माध्यमातून शिबिरे
रक्ताची एक बॅग २, ८०० रुपये पर्यंत जाते विकली
जिल्हा थॅलेसिमिया सन्मवयक नार्वेकर यांची तक्रार
१५० ते २०० दाते; रक्ताच्या पिशव्या कोल्हापूरला नेतात
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57955 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..