कोकणी भाषेच्या विकासासाठी मदत करू ः सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणी भाषेच्या विकासासाठी मदत करू ः सावंत
कोकणी भाषेच्या विकासासाठी मदत करू ः सावंत

कोकणी भाषेच्या विकासासाठी मदत करू ः सावंत

sakal_logo
By

21789
मालवण-धुरीवाडा- येथे अधिवेशनाचे उद्‍घाटन करताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत. मंत्री गोविंद गावडे, दामोदर मावजो, आमदार वैभव नाईक, परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे, रुजारिओ पिंटो आदी. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)


कोकणी भाषेच्या विकासासाठी मदत करू

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मालवणात कोकणी परिषदेच्या अधिवेशनाचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ ः कोकणी अधिवेशनात युवकांची संख्या कमी दिसत आहे. त्यामुळे युवकांना या अधिवेशनाकडे आकर्षित केले पाहिजे. कोकणीतून बाल साहित्य निर्माण झाले पाहिजे. तरच कोकणी भाषा बालकांमध्ये रुजू शकेल. कोकणी अस्मितेची पिढी त्यातूनच निर्माण होईल. गोवा हे कोकणी राज्य आहे. त्यामुळे कोकणी भाषेच्या विकासासाठी टाकण्यात येणाऱ्या प्रत्येक पावलाला सरकारची मदत असेल, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केले.
धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या प्रांगणात आयोजित अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या ३२ व्या अधिवेशनाचे उद्‍घाटन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. या वेळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, आमदार वैभव नाईक, परिषदेच्या अध्यक्षा उषा राणे, रुजारिओ पिंटो, परिषदेचे नूतन अध्यक्ष अरुण उभयकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, गौरीश वेर्णेकर आदी उपस्थित होते.
सावंत म्हणाले, ‘‘कोकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य बुलंद करणाऱ्या मालवण शहरात साजरे होतेय हे पाहून आनंद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण सदोदित येते. छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती. गोव्याच्या इतिहासात छत्रपती महाराजांना मोठे महत्त्व आहे. गोव्याची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी, गोवा मुक्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न विसरता येणार नाहीत. छत्रपती संभाजी महाराजांनाही माझा मानाचा मुजरा. कोकणीच्या अस्तित्वाचा हुंकार दर एकट्याच्या मनात शणै गोंयबाब यांनी रुजवला. कोकणी माणसाचे खच्चीकरण झाले, तरी तो पुढे जात राहिला आहे. विकासाकडे कोकणी समाज झेपावण्यात साहित्यिकांचा मोठा वाटा आहे. किनारी भागात कोकणी भाषा व संस्कृती फुलली. या भागात कोकणी भाषा, संस्कृती, अन्नसंस्कृती एकसारखेच आहे. त्यामुळे पूर्ण किनारी भाग हा कोकणी आहे. महाराष्ट्रातील रायगड ते केरळमधील कासारगोडपर्यंत अशा विस्तारित प्रदेशात कोकणी बोलणारे लोक वास्तव्यास आहेत. म्हणूनच त्याला ‘कोकणपट्टा’ असे म्हणतात. मासे हा मुख्य अन्न घटक समान आहे. भाषा ही सदोदित प्रवाही असते. कोकणीही सर्वांना सामावून घेते. मालवण, कारवार, केरळ आणि गोव्यातील विविध कोकणी भाषा वेगवेगळ्या भासत असल्या, तरी त्या भाषा एकच आहेत. कोकणी वाचणारा, लिहिणारा, बोलणारा यांच्यात आपलेपणा निर्माण करण्याची ताकद त्या भाषेत आहे. मालवणात बोलल्या जाणाऱ्या कोकणीला कदाचित मराठीची बोलीभाषा समजले जात असेल; पण गोव्यातील, कर्नाटक व केरळमधील कोकणी ही स्वतंत्र भाषा आहे. कोकणी गोव्याची राजभाषा आहे. याशिवाय राज्य घटनेच्या आठव्या परिशिष्टातही तिला स्थान आहे, हे विसरता कामा नये. आता गुगल भाषांतरात कोकणीला स्थान मिळाल्याने ही भाषा जागतिक झाली आहे. पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षण कोकणीतून मिळण्याची आता सोय निर्माण झाली आहे. डॉक्टरेटही कोकणीतून करता येईल. माजी मुख्यमंत्री (स्व) मनोहर पर्रीकर यांनी अर्थसंकल्प कोकणीतून सादर केला होता. विधानसभेचे कामकाज कोकणीतून तत्कालीन सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी चालविले. मीही सभापती असताना तसेच केले. माय भाषेतून अर्थसंकल्प मांडला आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रादेशिक भाषांवर भर दिला आहे. संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रादेशिक भाषा टिकल्या पाहिजेत. कोकणी-मालवणी टिकली पाहिजे. तरच या प्रदेशाची संस्कृती टिकेल. न्यायालयाची भाषा प्रादेशिक भाषा असावी, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. सर्वसामान्य माणसाला न्यायालयीन कामकाज समजावे, अशी त्यांची अपेक्षा आहे. गोवा सरकार गोवा मराठी अकादमी, गोवा कोकणी अकादमी, दाल्गाद कोकणी अकादमी आणि कोकणी भाषा मंडळाला हवी ती मदत सातत्याने देत आले आहे, यापुढेही ती दिली जाईल.’’
दरम्यान, साहित्य, चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार झाला. उषा राणे यांनी प्रास्ताविक केले. सुजाता शेलटकर यांनी सूत्रसंचालन केले.

अशी अधिवेशने गरजेची
आमदार नाईक म्हणाले, ‘‘मालवणला ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. बॅ. नाथ पै यांनी गोवा, कोकण, बेळगाव हे सर्व एकत्र राहावे, यासाठी चळवळ उभी केली. त्याच बॅ. पै यांची ही भूमी आहे. देशातील विविध प्रांतातील साहित्यिकांनी आपल्या भाषेत लिहिलेले साहित्य अमर झाले. त्यामुळे कोकणीतील साहित्यही अमर होईल. हे साहित्य आपण टिकविले पाहिजे, यासाठी अशी अधिवेशने व्हायला हवीत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागूनच गोवा आहे. आमचे सगळे सोयरे, व्यवसाय गोव्यात आहेत. केवळ आमचा पक्ष तिथे नाही. प्रमोद सावंत मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे तिथे तुम्हाला जी गरज लागेल, तिथे आमचे सहकार्य राहील.’’

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58174 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top