दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याला आग
दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याला आग

दाभोळ-दापोली पोलिस ठाण्याला आग

sakal_logo
By

-rat14p12.jpg
21727
दापोली : दापोली पोलिस ठाण्याच्या इमारतीला लागलेल्या आगीची छायाचित्रे.

दापोली पोलिस ठाण्याला आग

शॉर्टसर्किटचा अंदाज; कागदपत्रे, संगणकाचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १४ ः इंग्रजांच्या काळापासूनचा वारसा असलेल्या दापोली पोलिस ठाण्याच्या इमारतीला आज सकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात पोलिस ठाण्यातील कागदपत्रांचे तसेच संगणकांचे नुकसान झाले आहे.
शनिवारी (ता. १४) दापोली पोलिस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत असलेले कर्मचारी गोरे, धनाजी देवकुळे, शंकर चव्हाण यांना पोलिस निरीक्षक यांच्या दालनाबाहेर असलेल्या विजेच्या मीटरजवळ आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिस वसाहतीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना आग लागल्याची माहिती दिली. वसाहतीतील कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांनी घरातून मिळेल त्या भांड्याने पाणी आणून आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांनी दापोली नगरपंचातीमध्ये अग्निशमन बंब पाठवण्यासाठी दूरध्वनी केला; मात्र अग्निशमन बंब ‘सुवर्ण पालवी’ कृषी महोत्सवाच्या कृषी प्रदर्शनाच्या ठिकाणी असल्याचे सांगण्यात आले. कर्मचारी तेथे गेले, मात्र बंबाचा वाहनचालक जागेवर उपलब्ध नव्हता. त्याला शोधून अग्निशमन बंब पोलिस ठाण्याजवळ आणण्यात आला व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पोलिस ठाण्याच्या इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच शहरातील नागरिकांनीही तेथे धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी, तसेच इमारतीमधील कपाटे, कागदपत्रे बाहेर काढण्यास मदत केली. या आगीत पोलिस निरीक्षकांच्या कक्षाबाहेरील रायटर कक्षातील सर्व कागदपत्रे व संगणक जाळून खाक झाले. या आगीत इमारतीमधील मुख्य भाग वाचला असून, रेकॉर्ड रूममधील सर्व बंदुका, कागदपत्रे, दारूगोळा वेळीच बाहेर काढण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.
दरम्यान, खेड नगरपालिकेचाही अग्निशमन बंबदेखील दापोलीत येऊन दाखल झाला व त्यांनीदेखील कुलिंग करून ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये फर्निचर, वातानुकूलित यंत्रणा, दस्तऐवज, पोलिस निरीक्षक यांची केबिन, रायटर कक्ष, गोपनीय व पासपोर्ट कक्ष यांचे नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच दापोलीतच असलेले जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलिस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी ठाण्याला भेट दिली.
---------
चौकट
नवीन इमारतीसाठी पाठपुरावा : डॉ. गर्ग
या आगीत पोलिस ठाण्यातील ‘सीसीटीएनएस’ यंत्रणा बंद पडली आहे. पोलिस ठाण्याचे कामकाज पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या शहीद शशांक शिंदे सभागृहातून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांनी दिली. दापोली पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी निधी मंजूर झाला असून, या इमारतीच्या बांधकामासाठी पाठपुरावा करणार असल्याचेही डॉ. गर्ग यांनी सांगितले.
-----------------
चौकट
अंमलदार गोरे, ढोलेंचे प्रसंगावधान
अंमलदार धोंडू पांडुरंग गोरे आणि कोमल ढोले यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. त्यामुळे या दोघांवर कौतुकाचा वर्षावर होत आहे. गोरे यांनी आग लागल्याचे समजताच सर्वांना सावध करून आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अन्यथा आग पोलिस ठाण्यातील शस्त्रसाठा असलेल्या खोलीला लागली असती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58182 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top