
इंधनाचे दर वाढले; कल ई-वाहनांकडे
फोटोः 21827
..
इंधन दर वाढले; कल ई-वाहनांकडे
१०३ ई-वाहनांची आरटीओंकडे नोंद; इंधन दरवाढीला पर्याय, चार्जिंग पॉईंटची गरज
राजेश शेळके ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ ः इंधनाच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे वाहने वापरणे आर्थिकदृष्ट्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे. पर्याय म्हणून वाहनधारकांचा आता ई-वाहने किंवा सीएनजी वाहने खरेदीकडे कल वाढल्याचे दिसू लागले आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात २० शोरूममधून १०३ ई-वाहनांची खरेदी झाल्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे. यामध्ये ९३ दुचाकी तर १० चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
वाहने ही आता प्रत्येक कुटुंबाची गरज बनली आहे. एकेकाळी क्वचित एखाद्या प्रतिष्ठिताच्या घरामध्ये वाहन दिसत होते. घरात वाहन असणे मोठ्या प्रतिष्ठेचे मानले जात होते; परंतु आता प्रत्येक कुटुंबामध्ये दुचाकी आहेच, आता चारचाकी दिसू लागली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. जिल्ह्यात एकूण वाहनांची संख्या सव्वाचार लाखाच्यावर गेली आहे; मात्र रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा इंधनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यामध्ये सलग १३ दिवस इंधन दरवाढ होत होती. एक लिटर पेट्रोल जवळजवळ १२२ रुपयांपर्यंत तर डिझेल सुमारे १०० रुपये लिटर झाले आहे. इंधन दरवाढीमुळे महागाईचा भडका उडाला आहे. त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडल्याने आता इंधनावरील वाहने आर्थिकदृष्ट्या न परवडणारी झाली आहेत. वाहनधारक त्याला पर्याय शोधत आहे.
जिल्ह्यात ई-वाहनांनी जोरदार मुहूर्त साधला आहे तर सीएनजी वाहनांची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यात ई-वाहनाचे २० विक्रेते आहेत. गुढीपाडवा, दसरा आणि अक्षय तृतीया तसेच दिवाळी पाडवा, अशा साडेतीन मुहूर्तापैकी एक असेलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर यंदा इलेक्ट्रिकल १०३ वाहनांची खरेदी झाल्याची नोंद आरटीओ कार्यालयाकडे झाली आहे. यात ९३ दुचाकी, १० चारचाकी वाहनांचा समावेश आहे. वाहनधारक आता ई-वाहनांना पसंती देताना दिसत आहे; मात्र त्यासाठी चार्जिंग पॉईंटची उपलब्धता आवश्यक आहे.
---------------
महाग होणाऱ्या इंधन आणि सीएनजीसाठी लागणाऱ्या रांग लावायला नको, म्हणून वाहनधारक आता ई-वाहनांकडे वळले आहेत. एकदा चार्जिंग केल्यानंतर इलेक्ट्रिक वाहने ७० ते ८० कि.मी. धावतात. त्यामुळे ही वाहने परवडणारी असल्याने त्याला मागणी वाढत आहे.
- शशिकांत ताम्हणकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
--------------
* जिल्ह्यात एकूण वाहने ः सव्वाचार लाख
* ई-दुचाकींची खरेदीः ९३
*चारचाकी ई-वाहनांची खरेदीः १०
* सीएनजी वाहनांचीही वाढती मागणी
* अक्षय तृतीयाचा साधला मुहूर्त
..
एक लिटर पेट्रोलः १२२ रुपये
डिझेलः सुमारे १०० रुपये लिटर
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58216 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..