
कणकवली : बिबट्या कातडे जप्त
21840
दारूम : येथे बिबट्याच्या कातडीसह दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे पथक.
दारुमजवळ बिबट्याचे
८ लाखांचे कातडे जप्त
तस्करी प्रकरणी दोघे तरुण ताब्यात
कणकवली, ता. १४ : बिबट्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडले. कासार्डे-विजयदुर्ग मार्गावरील दारूम येथे ही दुपारी तीनला कारवाई करण्यात आली. या प्रकरणी आठ लाखांचे बिबट्याचे कातडे पोलिसांनी जप्त केले.
बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्रीला आणले जाणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार सकाळपासूनच कासार्डे विजयदुर्ग मार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी पथके तैनात होती. दुपारी तीनच्या सुमारास दारूमतून दुचाकीवरून दोन संशयित येत असल्याचे पोलिसांना आढळले. दारूम-माळवाडी येथे संशयितांना थांबवून पोलिसांनी तपासणी केली असता, त्यांच्याकडील एका मोठ्या पिशवीमध्ये बिबट्याचे कातडे आढळले. त्याची किंमत आठ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, घटनास्थळी पंचनामा करून दुचाकी आणि बिबट्याच्या कातडीसह दोघा संशयितांना ताब्यात घेतले. दोघांना सायंकाळी उशिरा कणकवली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले. अपर पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी कारवाई केली. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, कॉन्स्टेबल सुधीर सावंत, अनिल धुरी, कृष्णा केसरकर, पोलिस नाईक किरण देसाई, संकेत खाडये, अमित तेली सहभागी झाले. आज ताब्यात घेण्यात आलेल्या त्या दोघांना उद्या (ता.१५) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58254 Txt Sindhudurg1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..