
खेळाच्या विस्तारासाठी महाराज बनले खेळाडू
21854
सावंतवाडी ः येथील जिमखाना मैदान.
--
पाऊलखुणा ः भाग - ६८
(लोगो ९ मे रोजी प्रसिद्ध टुडे एकवरून घ्यावा)
---
खेळाच्या विस्तारासाठी महाराज बनले खेळाडू
लिड
बापूसाहेब महाराजांनी शिक्षणासह क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले. बरेच नवे खेळ येथे रूजवण्यासाठी पुढाकार घेतला. ते स्वतः खेळाडू होते. सर्वसामान्यांसोबत त्यांच्यातलेच एक होवून ते खेळायचे. व्यायामाला प्रोत्साहन देण्याचे त्यांचे धोरण होते. त्यांनी सावंतवाडी संस्थानात क्रीडा चळवळ रूजवली.
-----------------------
सावंतवाडी संस्थानात त्या काळात क्रीडा क्षेत्राला फारसे महत्त्व नव्हते. काही ठरावीक खेळ तेथे खेळले जायचे. तेही विशिष्ट वर्गापुरते मर्यादीत होते. व्यायामाचे महत्त्वही फारसे लोकांपर्यंत पोहोचले नव्हते. बापूसाहेब महाराजांनी १९२६ मध्ये मैदानी व मर्दानी खेळांच्या आयोजनाचा प्रयोग सर्वांत आधी केला. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात त्यापूर्वीची स्थिती बरीचशी स्पष्ट होते. त्यांनी या खेळांच्या उद्घाटनावेळी सांगितले होते की, ‘पूर्वी शौर्य आणि धैर्य प्रकट करायला भरपूर वाव होता; मात्र आता तशी स्थिती राहिली नाही. प्रत्येकाच्या आत कर्तृत्व शक्ती आणि रग लपलेली असते. तिला वाव द्यायची गरज असते. नेहमीच्या व्यवहारांपेक्षा विशेष काही तरी करून दाखवण्याची धमक प्रत्येकात अदृष्यरूपाने असते. ती बाहेर न काढल्यास अथवा तिला योग्य वाव न दिल्यास ती भलत्याच मार्गाने बाहेर येण्याची भीती असते. याला दुवर्तन म्हटले जाते. मर्दानी खेळ अशा कर्तृत्व शक्तीला वाव देण्याचे उत्तम माध्यम आहे. यासाठी खेळ आवश्यक आहे.’
बापूसाहेब महाराजांना शिक्षणादरम्यानच खेळाचे महत्त्व समजले होते. याचाही उल्लेख त्यांनी या भाषणात केला होता. ते म्हणाले होते की, विलायतेत आमच्या शिक्षण संस्थेत खेळांचे बाळकडूच मला मिळाले होते. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी वगैरे खेळात मी भाग घेत असे. सावंतवाडी संस्थानात लोकांमध्ये हळूहळू शरीरहानी होताना दिसत आहे. खेळ हा यावरचा उपाय आहे. महाराजांनी खेळाला दिलेल्या प्रोत्साहनाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. त्या काळात क्रिकेट विशेष लोकप्रिय होते. ऑक्टोबर, नोव्हेबरनंतर क्रिकेटचे सामने भरवले जायचे. विद्यार्थ्यांमध्ये, शाळांमध्ये हे सामने असायचे. याशिवाय संस्थानाबाहेरील बेळगाव हायस्कूल सोबत येथे सामना होत असे, यासाठी सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर कसून सरावही व्हायचा. हे सरावाचे सामने बघायलाही त्या काळात गर्दी होत असे. या सगळ्या मागे महाराजांचे प्रोत्साहन असायचे.
सावंतवाडीतील सर्वांत जुना क्रिकेट संघ म्हणजे ‘सावंतवाडी यंग क्रिकेटीयर्स क्लब’ अर्थात ‘एसवायसी’ होय. १९१७ मध्ये स्थापन झालेला हा क्लब पुढे बंद पडला होता. महाराजांच्या काळात म्हणजे याचे पुनरूर्जीवन करण्यात आले. या संघातून स्वतः बापूसाहेब महाराज यांच्यासह जगन्नाथ वाळके, डॉ. माने, लक्ष्मणराव तिरोडकर, राजगुरु, पै मास्तर असे खेळाडू असायचे. मुंबई, कराची, बेळगाव, कोल्हापूर, रत्नागिरी, मालवण आणि गोव्यांच्या संघांसोबतही त्यांचे सामने व्हायचे. बाहेरचे संघ आल्यावर जिमखाना मैदानाच्या पॅव्हेलियन बाहेर लोकांना बसण्यासाठी मंडप असायचा. शिवाय राजेसाहेबांसाठी एक आणि बाहेरच्या खेळाडूंसाठी दुसरा असे दोन तंबु उभारले जायचे. त्याकाळात क्रिकेट सामने बघायला ३ हजारापर्यंत जनसमुदाय असायचा. आताही इतके प्रेक्षक जमण्याचा प्रसंग जिमखाना मैदानावर दुर्मिळच म्हणावा लागेल. त्यावरून त्या काळात महाराजांनी क्रिकेटची क्रेज किती प्रमाणात निर्माण केली होती याचा अंदाज येतो. बापूसाहेब महाराज अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होते. त्या काळात प्रत्येक खेळाडूची खासीयत प्रेक्षकांना माहिती असायची. अमीरशहा राजगुरूंचा दणकेबाज खेळ, वाळके यांचा लेक हुक्स, घाडगे यांचा ऑफ साईड खेळ, पै मास्तर यांचे यष्टीरक्षण, गजानन नेरूरकर यांची हातभर वळणारी फिरकी गोलंदाजी लोकांच्या नजरेत भरत असे.
महाराजांनी शालेय क्रीडा महोत्सव सुरू करण्याचे धोरण ठरवल्याने मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्राचा प्रसार झाला. त्या काळात अनेक नवे खेळ संस्थानात खेळले जावू लागले. यातून खेळाडूही निर्माण झाले. त्या काळात अत्यंत उच्च प्रतीचा टेनिस खेळ खेळला जायचा. १९२१ ते १९४० या दरम्यान सावंतवाडीत टेनिसची क्रेझ होती. डिसेंबर ते मे या कालावधीत याचे सामने भरवले जायचे. यात अर्थातच बापूसाहेब महाराज यांची प्रेरणा असायची. महाराज स्वतः पट्टीचे टेनिस खेळाडू होते. त्यांची टेनिसमधील सर्व्हीस वैशिष्ट्यपूर्ण असायची. त्याकाळातील वकील मंगेशराव रांगणेकर यांनी केलेल्या सर्व्हीसचा चेंडू परतवणे कठीण असायचे. डॉ. माने हे जोरदार ड्राईव्ह मारण्यात पटाईत होते. इतरही अनेक खेळाडू तेव्हा होते. वेंगुर्लेतील अनेकजण येथे खेळायला यायचे. हॉकीही काही काळ येथे खेळला गेला. बापूसाहेब महाराजांनीच याची सुरूवात केली. पोलिस खात्यातील अनेक तरुण यात सहभागी व्हायचे; पण २-३ वर्षांनी हा खेळ बंद पडला. कबड्डीही त्या काळात लोकप्रिय झाला. बॅडमिंटनलाही चांगले दिवस आले.
रग्बी फुटबॉल हा विदेशातील खेळ महाराजांनी येथे आणला. स्वतः महाराज हा खेळ खेळायचे. रग्बी फुटबॉल हा दांडगाईचा खेळ. एकमेकांना पकडून, हिसकावून, पाडून खेळण्याचा हा खेळ. यात सावंतवाडीतील अनेक प्रतिष्ठीत सहभागी व्हायचे. त्या काळात हा खेळ खेळताना बाहेर महाराजांची नोकरमंडळी मोठ-मोठे हांडे भरून पाणी तापवत असे. कारण खेळ आटोपल्यानंतर आंघोळीची सोय करावी लागायची. विशेषः पावसाळ्यात हा खेळ खेळला जायचा. त्या काळात महाराजांनी कित्तेकांना या खेळासाठी युनिफॉर्म शिवून दिले होते. जास्त पाऊस असल्यास महाराज आपल्या मोटारीतून खेळाडूंना घरी पोहोचवायचे.
या संदर्भात डिचोलीतील स. द. शिरोडकर यांनी एक आठवण लिहून ठेवली आहे. रग्बी फुटबॉलमध्ये एकमेकांच्या हातून चेंडु हिसकावून घ्यायचा असतो. महाराजांच्या हातात चेंडू आल्याबरोबरच ते तो घेऊन पळू लागले; पण महाराजांच्या अंगाला हात लावायचा कसा? असा प्रश्न विरोधी बाजूच्या खेळाडूंना पडला. ते चांगले पाच-दहा फुटाचे अंतर ठेवून त्यांच्यासोबत पळू लागले. हा प्रकार लक्षात येताच महाराजांनी तेथे थांबत चेंडू खाली टाकला आणि म्हणाले, “अशा तऱ्हेने खेळायचे असेल तर मी खेळायलाच येणार नाही. असा खेळ कसा होईल? माझ्या हातून चेंडू काढून घेणार नसाल तर मी चालत जावूनही गोल करेन, त्याला काय अर्थ आहे. मी तुमच्यातलाच एक आहे. तुम्ही इतर खेळाडूंशी जशी दंगामस्ती करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात, तसे माझ्या बाबतीत कराल तरच खेळात गोडी आहे.’’ त्यांच्या या सुचनेनंतर हा खेळ बहरत गेला.
खेळात ते किती तन्मय होत त्या बद्दलही एक किस्सा आहे. रग्बी फुटबॉलच्या मैदानाजवळच चिखलाचे एक डबके होते. एकदा महाराज आणि त्यांच्या सहकारी खेळाडूंनी मोठ्या कौशल्याने चेंडू गोल जवळ आणला; पण इतक्यात दुसऱ्या टिमच्या खेळाडूंनी चेंडू दूर उडवला. महाराज या डबक्या जवळच होते. चेंडू डबक्या पलिकडे गेला असता तर तो आऊट होवून पुन्हा खेळ सुरू होणार होता. दुसरा खेळाडू असता तर त्याने डबक्यात पडण्याच्या भितीने चेंडू जावू दिला असता; पण महाराजांनी धावत जात चेंडू अडवून आत उडवला आणि गोल केला; पण तोल जावून ते डबक्यात पडले. ते पूर्ण चिखलाने माखले; मात्र खिलाडू वृत्ती आणि आपल्या टीमसाठी केलेल्या गोलचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते. ब्रिज आणि बॅडमिंटन याच्या प्रसारासाठीही त्यांनी प्रयत्न केले. हे सामने महाराजांच्या बॅडमिंटन हॉलमध्ये व्हायचे. त्या काळात संस्थानचे मोठ-मोठे अधिकारी आणि सर्वसामान्य प्रजाजन एकाच टेबलवर बसून या खेळांमध्ये सहभागी व्हायचे. यात महाराजही सहभागी असायचे. एकूणच महाराजांनी सगळ्या प्रकारच्या खेळांना प्रोत्साहन दिले. स्वतः त्यात सहभागी झाले. त्यांनी दिलेल्या राजाश्रयामुळे त्या काळात अनेक नामवंत खेळाडू निर्माण झाले.
---------------
चौकट
असे होते विचार
क्रीडा, व्यायाम याबाबत बापूसाहेब महाराजांचे विचार समजून घेण्यासाठी त्यांच्या काही भाषणांचा संदर्भ देता येईल. १ ते ३ मार्च १९२६ दरम्यान संस्थानामधील शालेय विद्यार्थ्यांच्या देशी खेळांचा महोत्सव महाराजांनी घेतला होता. त्याच्या समारोपादिवशी त्यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘‘विद्यार्थी असेपर्यंत खेळात लक्ष द्यायचे आणि नंतर स्वस्थ बसायचे हे मला मान्य नाही. मर्दूमकीची सवय आजन्म कायम टिकली पाहीजे.’’ मालवणच्या कै. रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या १९२४ मध्ये झालेल्या बक्षीस वितरणावेळी त्यांनी केलेल्या भाषणात सांगितले होते की, ‘‘मी विलायतेत शिक्षण घेतले. तेथील आणि आपल्याकडील विद्यार्थ्यांची तुलना केली तर एक मुख्य फरक दिसतात. तिकडचे विद्यार्थी परिक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत खेळ खेळतात; पण आपल्याकडे पहिले सहा महिने विद्यार्थी पुस्तकाला हातही लावत नाहीत. परीक्षा जवळ आली की, रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात. याचा प्रकृतीवर परिणाम होतो. सुरूवातीपासून अभ्यास आणि त्याच्या जोडीला खेळ, व्यायाम केल्यास अभ्यास आणि शरीर दोन्हीही चांगले राहील.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58303 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..