
रत्नागिरी-इंजिन बिघाडल्याने कोकणकन्या चालवली विजेवर
- rat15p25.jpg-
22009
रत्नागिरी ः कोकण रेल्वे मार्गावर निवसर-आडवली दरम्यान बंद पडलेली कोकणकन्या एक्स्प्रेस.
इंजिन बिघडल्याने ‘कोकणकन्या’ चालली विजेवर
तीन तास खोळंबा; निवसर-आडवलीमधील प्रकार, चार गाड्या उशिराने
रत्नागिरी, ता. १५ ः कोकण रेल्वे मार्गावर निवसर-आडवली दरम्यान कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सुमारे तीन तास खोळंबा झाला होता. अखेर कोकणकन्याचे डिझेल इंजिन काढून विजेवरील इंजिन जोडून गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. मुख्य ट्रॅकवरच हा प्रकार घडल्यामुळे चार गाड्यांचा खोळंबा झाला.
रविवारी (ता. १५) पहाटेच्या सुमारास रत्नागिरीतून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेस मडगावच्या दिशेने रवाना झाली. पावणेसहा वाजण्याच्या सुमारास विलवडे ते निवसर स्थानकादरम्यान गाडीचे डिझेल इंजिन बिघडले. अचानक गाडी उभी राहिली. एकच ट्रॅक असल्यामुळे अन्य कोणत्या गाडीला बाजू देण्याचा प्रश्नच नव्हता. मोबाईलला रेंज नसल्यामुळे प्रवासीही गडबडले. कोकण रेल्वे मार्गावरील आधुनिक संपर्क यंत्रणेच्या माध्यमातून गाडीचे इंजिन खराब झाल्याची माहिती रत्नागिरी रेल्वेस्थानकापर्यंत पोचली. सुमारे तासाभरानंतर रत्नागिरी स्थानकातून दुसऱ्या गाडीचे इंजिन पाठवून, अडकून पडलेली कोकणकन्या निवसर स्थानकात माघारी आणली गेली. इंजिनाची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत निवसर स्थानकातच गाडी थांबवून ठेवण्यात आली होती. हा प्रकार घडल्यानंतर या मार्गावरुन धावणाऱ्या दिवा-सावंतवाडी, नेत्रावती, मंगला एक्स्प्रेस व आणखीन एक एक्स्प्रेस अशा चार गाड्या त्या-त्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रचंड गर्दी आहे. या परिस्थितीमध्ये कोकणकन्यासह अन्य गाड्यांना झालेल्या विलंबामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. कोकणकन्या एक्स्प्रेस तीन तास निवसर स्थानकातच थांबून होत. साडेआठ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरून धावणाऱ्या एका मालगाडीचे इलेक्ट्रिक इंजिन काढून ते कोकणकन्या एक्स्प्रेसला जोडण्यात आले. त्यानंतर कोकणकन्या मडगावच्या दिशेने रवाना झाली.
-----------
चौकट
मुहूर्त लांबला, पण...
कोकण रेल्वेमार्ग मार्गावरील दहा गाड्या १ मे नंतर विद्युत इंजिन जोडून सोडण्यात येणार होत्या. परंतु तांत्रिक कारणांमुळे हा मुहूर्त लांबणीवर टाकण्यात आला होता. कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे हा मार्ग विजेवरील गाड्या धावण्यासाठी सज्ज आहे. या मार्गावरुन पॅसेंजर गाड्यांना विद्युत इंजिन जोडून चालवल्या जात आहेत. मात्र, आज कोकणकन्या इंजिनमधील बिघाडामुळे निवसर ते मडगावपर्यंतचा प्रवास विजेवरील लोकोद्वारे झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58508 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..