ग्रामपंचायत जबाबदारी आणखी व्यापक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामपंचायत जबाबदारी आणखी व्यापक
ग्रामपंचायत जबाबदारी आणखी व्यापक

ग्रामपंचायत जबाबदारी आणखी व्यापक

sakal_logo
By

L22191
........................
ग्रामपंचायत जबाबदारी आणखी व्यापक
नवी उदि्दष्टेः पर्यावरण रक्षणाबरोबरच गरिबी हटवण्याचे आव्हान
विनोद दळवी : सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः रस्ते, पाणी, दिवाबत्ती या सुविधा पुरविण्यापुरते मर्यादित कार्यक्षेत्र आता ग्रामपंचायतचे राहिलेले नाही. या जोडीने पर्यावरण रक्षण व गरिबी हटवण्याचे कामही करावे लागणार आहे. २०३० पर्यंत जगातील सर्व लोकांना शांतता व समृद्धी देण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने कंबर कसली आहे. त्याला पोषक काम ग्रामपंचायतला करायचे आहे. भारताने यासाठी धोरण निश्चित करीत कार्यपद्धती ठरविली आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतची कर्तव्य आणि जबाबदारी आता वाढत आहे. ‘आयकॉनीक व्हिलेज’ होण्याची स्पर्धा आता प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये झाली पाहिजे.
जगातून गरिबीचे उच्चाटन करणे, पृथ्वीचे रक्षण करणे व २०३० पर्यंत जगातील सर्व लोकसंख्येला शांतता व समृद्धी प्राप्त करून देण्याचा उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ ला १७ ध्येये निश्चित केली आहेत. भारत या करारावर स्वाक्षरी करणारा प्रमुख देश आहे. भारतात ही ध्येये साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांचे योगदान महत्वाचे आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या व ग्रामपंचायती विकास आराखडे तसेच विविध विकास योजना व लोकसहभागाच्या माध्यमातून या १७ ध्येयांची पूर्तता करण्यासाठी या ध्येयांचे स्थानिकीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्राने ९ संकल्पना निश्चित केल्या असून विषयाधारीत भूमिका स्वीकारण्याबाबत निश्चित केले आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रत्येक ग्रामपंचायतने ९ पैकी किमान एक संकल्पना निवडून पुढील वर्षभर त्यावर कम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त तीन संकल्पना ग्रामपंचायती निवडून त्यावर वर्षभरात काम करू शकतात. निवडलेल्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये विविध योजना, उपक्रम हाती घेणे, त्याला व्यापक प्रचार-प्रसिद्धी देणे, जास्तीत जास्त लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेणे व इतर अनुषंगिक बाबींचे नियोजन ग्रामपंचायतिना करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
दरवर्षी २४ एप्रिल हा दिवस देश पातळीवर पंचायती राज दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी यावर्षी ग्रामसभा आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले होते. या ग्रामसभेत देण्यात आलेल्या ९ ध्येये यापैकी किमान एका ध्येय्याची निवड करून त्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले होते.
केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानमध्ये सुधारणा केली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून शाश्वत विकासाच्या ध्येयांची पंचायतराज यंत्रणेमार्फत प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने २०१५ ला निश्चित केलेल्या १७ पैकी ९ ध्येये केंद्राने घेतली आहेत. या ९ पैकी किमान एक ते जास्तीत जास्त तीन ध्येये घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतीला काम करायचे आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या १७ पैकी ९ ध्येयांची निवड केंद्राने केली आहे. यामध्ये गरिबीमुक्त आणि उपजीविका (रोजगार) वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव, पायाभूत सुविधा युक्त स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव हे ९ विषय घेण्यात आले आहेत. यावर्षीपासून या ९ ध्येयांवर काम केले जाणार आहे.
ग्रामीण विकासात ग्रामपंचायतची महत्वाची भूमिका राहिली आहे. आपला देश सर्वाधिक खेड्यात व्यापलेला आहे. अलीकडे खेड्यांची वाटचाल शहराकडे किंवा मोठ्या लोकसंख्येच्या गावाच्या दिशेने वेगाने होताना दिसत आहे. कारण लोकसंख्या वाढत आहे. त्याचबरोबर दळणवळणाच्या सुविधा गावोगावी पोहोचल्या आहेत. विकसित तंत्रज्ञान सुद्धा गावोगावी पोहोचत आहे. परिणामी ग्रामीण विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. रस्ते, पाणी, वीज, दिवाबत्ती या सुविधा पुरवितानाच आता जागतिक बरोबरी करणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतवर आलेली आहे. अर्थात यासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही. मूलभूत सुविधा आता पुरवील्या जात आहेत. त्याचबरोबर शासनाच्या असलेल्या सर्व योजनांची एकत्रित सांगड घालून गावातील गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. गावाला निरोगी बनविण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. यासाठी गावातील नागरिकांची मोट बांधणे गरजेचे असणार आहे.
------------

चौकट
सिंधुदुर्गात अन्य ध्येयावर प्रयत्नांची गरज
देशाने निवडलेल्या ९ ध्येयांपैकी अनेक ध्येये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायत क्षेत्रात राबविली जात आहेत. सामाजिक शांतता, लिंग समभाव हे जिल्ह्यातील असंख्य गावांत दिसून येतात. स्वच्छतेत तर सिंधुदुर्ग कायमच वर्चस्व राखून आहे. त्यामुळे ही ध्येये पूर्ण करण्यासाठी वेगळी मेहनत घेण्याची गरज नाही; मात्र अन्य ध्येये आहेत त्यासाठी मात्र विशेष काम करावे लागणार आहे.
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58654 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top