पर्यटकांच्या गर्दीने मालवण गजबजले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटकांच्या गर्दीने मालवण गजबजले
पर्यटकांच्या गर्दीने मालवण गजबजले

पर्यटकांच्या गर्दीने मालवण गजबजले

sakal_logo
By

swt175.jpg
22406
मालवणः पर्यटन हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांमुळे शहरात ठिकठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
swt176.jpg
22407
मालवणः समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी.
swt177.jpg
L22408
मालवणः पर्यटक गर्दीमुळे किनाऱ्यावरच गाड्या पार्क करत आहेत. (छायाचित्रे ः प्रशांत हिंदळेकर)

मालवण गजबजले
उन्हाळी पर्यटन हंगामः अरुंद रस्ते, वाहतुक कोंडीचा अडसर, जोरदार वाऱ्यामुळे स्कूबा,स्नॉर्कलिंग मात्र बंद
प्रशांत हिंदळेकर ः सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १७ः पर्यटन हंगामाच्या अंतिम टप्प्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांमुळे मालवण गजबजून गेले आहे. समुद्रातील वाऱ्याचा जोर वाढल्याने स्कूबा, स्नॉर्कलिंग बंद असले तरी अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद पर्यटकांकडून लुटला जात आहे. अरूंद रस्ते, पोलिसांची कमतरता यामुळे शहरात विविध ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याने याचा फटका पर्यटकांसोबत सर्वसामान्यांनाही बसत आहे. त्यामुळे त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे.
पावसाळा जवळ आल्याने पर्यटन हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. गेल्या महिनाभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने तालुक्यात पर्यटक दाखल झाले. त्यामुळे पर्यटन व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील तारकर्ली, देवबाग, वायरी भुतनाथ परिसरातील वॉटरस्पोर्टस्, किल्ले सिंधुदुर्ग, बंदर जेटी, चिवला बीचसह तळाशील, आचरा परिसरातही पर्यटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. सागरी पर्यटनाबरोबर ग्रामीण, कृषी पर्यटनाचाही आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुणेसह पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे.
पर्यटन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असताना मोठ्या संख्येने पर्यटक शहरात दाखल झाले आहेत. काळेथर-तारकर्ली येथील पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद ठेवली आहे. यात वायरी दत्तमंदिर परिसरातून असलेल्या पर्यायी मार्गाचा वापर वाहनचालकांकडून करण्यात येत होता; मात्र हा रस्ता अरूंद असल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. तारकर्ली, देवबागकडे जाण्यासाठी पर्यटकांना देवली मार्गाचा वापर करावा लागत आहे. यात मार्गाची माहिती नसल्याने या मार्गावर ठिकठिकाणी मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
येथील पोलिस ठाण्यात कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे. शिवाय सध्या पर्यटनाचा आनंद लुटण्यास मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आवश्यक त्या ठिकाणी पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे अशक्य बनले आहे. परिणामी वायरी नाका, बसस्थानक, फोवकांडा पिंपळ यासह मुख्य बाजारपेठेत सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह पर्यटकांचेही हाल होत आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक नाक्यावर पोलिस कर्मचारी किंवा गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी केली आहे.
कोकणी मेव्याचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर चाकरमानीही मोठ्या संख्येने तालुक्यात दाखल झाले आहेत; मात्र रानमेव्यातील करवंद, अननस, जांभ यासह अन्य फळांची आवकच म्हणावी तशी झालेली नाही. शिवाय यावर्षी जांभळेही गायब असल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्यांची या फळांचा आस्वाद घेता न आल्याने निराशा झाली आहे.

चौकट
हापूस स्वस्त
हापूस आंब्याला डझनामागे सुरवातीला चांगला भाव मिळत होता. त्यामुळे व्यावसायिकांची चांगली उलाढाल झाली; मात्र हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस आंब्याची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. आज स्थानिक बाजारपेठेत १०० रुपयापर्यत डझन दराने हापूस आंब्याची विक्री होत असल्याचे दिसून आले. ग्राहकांकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता.

चौकट
मासळीची आवक
सलग आलेल्या सुट्यांमुळे येथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसायासह अन्य छोटे, मोठे व्यवसायही तेजीत असल्याचे चित्र किनारपट्टी भागात पहावयास मिळत आहे. सुरमई, बांगडा, पापलेट, कोळंबी यासारख्या मासळीची चांगली आवक असल्याने पर्यटकांकडून या मासळीचा आस्वाद लुटला जात आहे. सायंकाळी उशिरापर्यत दुपारच्या जेवणावळीसाठी पर्यटकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58958 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top