
गाळ वाहतुकीसाठी घंटागाड्यांचा वापर
गाळ वाहतुकीसाठी घंटागाड्यांचा वापर
मुकादम यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार; गैरवापरावर आक्षेप
चिपळूण, ता. १८ ः पालिकेच्या घंटागाड्यांचा गाळ वाहतुकीसाठी वापर होत आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी रस्त्याच्या बाजूला भराव चालू आहे, हा प्रकार चुकीचा असून, यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. तरी हा गैरवापर बंद करावा. याला कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, २०२०-२१ मध्ये शहरातील कचऱ्याची वाहतूक करून विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छता अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सुमारे दहा गाड्या खरेदी केल्या आहेत. या वाहनांमुळे शहरातील घंटागाडीद्वारे जमा होणारा व शहरात इतर ठिकाणी साचलेला कचरा उचलण्यासाठीचे नियोजन केले गेले. अत्यावश्यक बाब म्हणून या गाड्या खरेदी करण्यात आल्या. या गाड्या नव्याने खरेदी केलेल्या असल्या तरी दरवर्षी लाखो रुपये या वाहनांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी खर्च होतात. पालिकेच्या वाहनांची सुरक्षितता व मालमत्तेचे रक्षण करणे ही प्रशासन प्रमुखाची जबाबदारी व कर्तव्य आहे. असे असताना काही दिवसांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विकास आराखड्यातील नियोजित रस्त्यावर भरावाचे काम सुरू केले. या कामासाठी कचरागाड्यांतून गाळाची वाहतूक करण्यात आली. ही बाब गंभीर असून पालिकेचे आर्थिक नुकसान होणारी आहे.
..
चौकट
कायदेशीर प्रक्रिया न करता
या रस्त्याच्या भरावाचे काम सुरू करण्यात आले. त्या रस्त्याच्या एका टोकाला बांधकाम व्यावसायिकांच्या अनेक इमारतीचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून, या इमारतीमध्ये काही प्रमाणात रहिवासी वापर सुरू झालेला आहे. या बांधकाम व्यावसायिकांच्या सेवेसाठी रस्त्याची उंची वाढवण्याच्या हेतूने कोणताही कायदेशीर प्रक्रिया न करता प्रशासनाकडून भरावाचे काम सुरू करण्यात आले आहे. बेकायदेशीर कामासाठी नदीपात्रातील गाळ, माती, वाळू वाहतुकीसाठी कचरा गाड्यांचा वापर करण्यात येत असल्याची तक्रार मुकादम यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59369 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..