
नाते मुंबईशी
22822
एस.टी.
22782
प्रसाद कुलकर्णी
नाते मुंबईशी
लिड
सिंधुदुर्ग आणि मुंबईचे एक वेगळे नाते आहे. सिंधुदुर्गाचा वारसा आठवताना हे नातेही समजून घ्यायला हवे. आता तर मुंबईशी असलेले नाते सर्वश्रृत आहे; पण कित्येक पिढ्या हा जपलेला वारसा कसा होता, हे समजून घेणेही महत्त्वाचे आहे. यात मुंबईकर चाकरमानी आणि सिंधुदुर्गातला रहिवासी यांचे ऋणानुबंधही तितकेच संवेदनशील आहेत. काही वर्षांपूर्वी हा वारसा, ऋणानुबंध कसे होते, हे सांगण्याचा प्रयत्न...
- प्रसाद कुलकर्णी
--------------
मे महिना आला की, मला हमखास कोकणातले दिवस आठवतात. माझे बालपण कोकणात गेले. कणकवली आणि आजूबाजूच्या परिसरात. माझे वडील पोस्टमास्तर होते आणि त्यामुळे पोस्टाला लागूनच आमच्या क्वार्टर्स असायच्या. वडील घरात कमी आणि रात्री उशिरापर्यंत पोस्टातच जास्त असायचे. त्यावेळी संपर्काची आणि दळणवळणाची साधने अतिशय मर्यादित होती. मोबाईल कोसो मैल दूर होते. ‘फोन’ नावाचा पोस्टातला काळा डब्बा झटापट करत मुंबईशी संवाद साधायचे काम करायचा. ‘ट्रंककॉल’ नावाचे एक कंटाळवाणे प्रकरण त्यावेळी अस्तित्वात होते. सायंकाळी पाचला कणकवलीहून मुंबईचा फोन बुक केला, तर रात्री नऊला लाईन मिळायची आणि त्या लाईनवरून एवढ्या मोठ्याने बोलावे लागायचे की वाटायचे, फोनवरून बोलण्यापेक्षा थेट बोलले तर हा आवाज मुंबईला पोहोचेल.
गावाहून मर्तीकाचे (निधन वृत्ताचे) पत्र मुंबईला सुतक संपल्यावर नातलगांच्या हातात पडायचे आणि मुंबईच्या मुलाला मुलगा झाल्याचे वर्तमान गावच्या आज्याशी पोहोचेपर्यंत आजा स्वत:च इतिहासाचा भाग बनून गेलेला असायचा. त्याशिवाय ‘तार’ नावाची एक अद्भुतिकाही होती. ‘कट्टकड्कट्ट’ या सांकेतिक भाषेत बाबा रात्री-बेरात्री तारा घेत आणि पाठवत बसत. लग्नाच्या शुभसंदेशापासून निधनाच्या निरोपापर्यंत तार हे ‘स्वस्त आणि मस्त’ असे बिनशब्दांचे माध्यम होते; पण एकंदरीत तारेची सलगी शुभसंदेशाऐवजी दुर्घटना, निधन अशा गोष्टींशी जास्त होती. त्यामुळे तार आली आहे, एवढे नुसते पोस्टमनने सांगितले, तरी ती वाचण्याआधीच घरात रडारड सुरू व्हायची.
गावात पेपर नसायचा. मुंबईहून येणारा ‘ब्लॅक अॅण्ड व्हाईट’ चार पानी पेपर रात्री किंवा दुसऱ्या दिवशी हातात पडायचा. कधीतरी फिल्मफेअर किंवा ‘इंडिया टुडे’सारखी मासिके हाती पडायची. नट्नट्यांच्या शिळोप्याच्या गोष्टी चविष्ट्पणे चर्चिल्या जायच्या. टीव्ही वगैरेंचा तर तेव्हा मागमूसही नव्हता. गावच्या ‘टुरींग टाकी’मध्ये (‘टॉकीज’ या शब्दाचा गावठी उच्चार) हिंदी सिनेमे बघून अगदी भारून जायला व्हायचे. गरिबीची आणि आयुष्यातल्या तमाम दु:खांची तीन तास मस्त भूल पडायची. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र वगैरे मंडळी परमेश्वराचे पृथ्वीतलावरले अवतार वाटायचे आणि अमिताभ बच्चन ‘सुपरमॅन’ भासायचा.
आताच्यासारखी कॉलेज बक्कळ झालेली नव्हती. एसएससीचे सेंटर पूर्ण पन्नास मैलाच्या परिघात फक्त कणकवलीला होते. कधी रविवारी एसएम हायस्कूलवरून बाबा फिरायला घेऊन गेले, तर नॉस्टॅलजिक होऊन सांगायचे, ‘बघ पप्या, मीही याच शाळेत शिकलो. मधू आणि मी एकाच वर्गात होतो. (मधू म्हणजे मधु मंगेश कर्णिक). मधू माझा अगदी खास मित्र. तो तेव्हापासूनच प्रेमळ आणि माणसे जोडणारा होता.’
मे महिन्यात आम्ही गावाहून मुंबईला जात असू. मुंबई त्यावेळी विलायते एवढी दूर होती. मधू दंडवते प्रत्येक निवडणुकीत कोकण रेल्वेचे स्वप्न दाखवायचे आणि कोकणी माणूस भरघोस मतांनी त्यांना निवडून आणायचा. लवकरच रेल्वे येईल आणि आपण त्या रेल्वेने विलायतेला अर्थात मुंबईला जाऊ, अशी स्वप्ने बघत मुंबईला जाण्यासाठी एसटीत बसायचा. वळणावळणाच्या रस्त्याने, घाट चढत आणि उतरत एसटीची लाल बस चौदा-पंधरा तास घेत मुंबईला पोहोचायची. मध्ये कधी तिचा पाटाबिटा तुटला तर चौवीस तासांची निश्चिंती असायची. मुंबईत त्यावेळी गिरणी धंदा जोरात चालू होता. कोकणातला घरटी किमान एक माणूस मुंबईत असायचा. गावाला आलेले हे चाकरमानी परतीच्या प्रवासाला बायकापोरांसकट निघताना मटण-भात, घावने असा भरभक्कम ऐवज पोटलीत बांधून घ्यायचे. लांजा किंवा संगमेश्वरला गाडी जेवायला थांबली की, आडवा हात मारायचे. मग पुढे मोठे मोठे घाट सुरू झाले की, बायकापोरांच्या बकाबक उलट्या सुरू व्हायच्या आणि संपूर्ण एसटी त्या जीवघेण्या वासाने भरून जायची. मग महाड येईपर्यंत त्या नुसत्या वासाने मला उलटी व्हायची. पुढे पुढे हा नॉशिया मनात एवढा भिनला होता की, एसटीची लाल बस नुसती बघितली तरी मला उलटी येणार, असे वाटायचे.
मुंबई तेव्हा आताच्यासारखी टम्म फुगली नव्हती आणि तिचा देह पनवेलपर्यंत पसरला नव्हता. पनवेल हे मुंबईच्या सीमेवरचे एक गाव होते. सकाळी पहिला चहा पनवेलात झाला की, मुंबई जवळ आल्याची चाहूल लागायची. मग आम्ही सज्ज होऊन खिडकीतून मुंबई डोळ्यात साठवत राहायचो. परळच्या एसटी डेपोत उतरेपर्यंत ''महाराष्ट्र माझा आणि मी महाराष्ट्राचा'' असायचा; पण तिथून बाहेर पडल्यावर आपण अपरिचित जगात आलोय, याची जाणीव व्हायची. वेगळी भाषा, भिन्न वेष, विचित्र माणसे, गर्दी, धावपळ, सारे अल्लादीनच्या गोष्टीसारखे अद्भुत.
--
...अन् सरळ कणकवलीला निघतो
किती वर्षे झालीत आता आठवत नाही; पण एक दिवस कणकवलीहून आलेली माझी एसटी कणकवलीला परत गेलीच नाही. मी मुंबईत राहिलो तो कायमचाच. राहिलो खरा, पण जीव इथे रमला नाही. ना मुंबई मला कधी आपली वाटली, ना मुंबईने मला कधी आपले म्हटले. दररोज थोडाथोडा घुसमटत राहिलो. कोकणच्या आठवणींवर दिवस ढकलत राहिलो. अजूनही मे महिना आला की, मला ते कणकवलीचे दिवस आठवतात. ते पोष्ट... रात्री दहा-दहा वाजेपर्यंत कामात गुंगून गेलेले बाबा... तो टेलिफोनचा काळा डब्बा... ते एसेम हायस्कूल... तो चौक... ते धुरळा उडवणारे रस्ते... ती वास भरलेली एसटी.....! मग मी सरळ कोकणकन्याचे तिकीट काढतो आणि कणकवलीला जायला निघतो.