
सिंधुदुर्गाची वाचन संस्कृती
22903
संजय शिंदे
--
50940
सिंधुदुर्गाची वाचन संस्कृती
लिड
कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ आणि ग्रंथालयांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे साधन या दृष्टीने ग्रंथांचे फार मोठे महत्व आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठी वाचन परंपरा आहे. ही परंपरा खूप वर्षांपासूनची आहे. याच वारशाविषयी...
- संजय काशिनाथ शिंदे, ग्रंथपाल नगर वाचन मंदिर, मालवण
---------------------
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक साहित्यिक जन्माला आले. त्यामध्ये प्रामुख्याने जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, ह. मो. मराठे या साहित्यिकांची नावे घेता येतील. त्यांचा महाराष्ट्रभर स्वत: चा असा एक वाचक वर्ग आहे. सिंधुदुर्ग जिल्हयात शंभरी पार केलेली ग्रंथालये आहेत. त्यामध्ये श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी, नगर वाचनालय वेंगुर्ले, नगर वाचन मंदिर मालवण, रामेश्वर वाचन मंदिर आचग मालवण, र. ग. खटखटे वाचनालय शिरोडा, रा. ब. अनंत शिवाजी देसाई वाचनालय कुडाळ या ग्रंथालयांचा समावेश आहे. ही ग्रंथालय गेली १०० वर्षे आणि त्याहीपेक्षा जास्त काळ वाचन संस्कृतीचा वारसा जपत आहेत.
सावंतवाडी संस्थानामध्ये वाचन संस्कृती विस्ताराचे कार्य अनेक वर्षांपूर्वी सुरू झाले. बापूसाहेब महाराज यांच्या काळात शैक्षणिक विकासासाठी बरेच कार्य केले गेले. याचाच भाग म्हणून त्या काळात वाचनालय संस्कृती रूजवली गेली. शिक्षण प्रसार झाल्यावर त्यात सातत्य राखण्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्याचे धोरण ठरवण्यात आले. यासाठी फिरत्या वाचनालयांची योजना अमलात आणली गेली. संस्थानात अशी दहा वाचनालये सुरू केली.
श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी हे वाचनालय संस्थानकालिन वाचनालय आहे. या वाचनालयाची स्थापना १८ एप्रिल १८५२ मध्ये झाली. सुरूवातीला हे वाचनालय तेथील शाळा क्रमांक १ च्या सभागृहात चालायचे. १८८५ मध्ये तत्कालीन पोलिटीकल एजंन्टने आपल्या राहण्याचा बंगला या वाचनालयासाठी मोकळा करून दिला. सुरूवातीला याचे नाव नेटीव्ह जनरल लायब्ररी असे होते. १९३५ मध्ये बापूसाहेब महाराजांच्या कारकीर्दीत याचे नाव बदलून श्रीराम वाचन मंदिर ठेवले गेले. त्यांनी या ग्रंथालयाच्या विस्तारात महत्त्वाची भूमिका बजावली. सावंतवाडीच नाही तर जिल्ह्याच्या इतर भागातही वाचनालय संस्कृती या काळात वाढत गेली.
पूर्वीच्या काळी टि. व्ही, मोबाईल, इंटरनेट इ. साधने उपलब्ध नसल्याने वाचन संस्कृती जोमाने वाढत होती. जुन्या पिढीला वाचनाचे महत्व होते. त्यामुळे नेहमीची वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके आणि ग्रंथ इ.चे वाचन मोठ्या प्रमाणात करण्यात येत होते. त्यामुळे साहाजिकच सिंधुदुर्गाच्या वैचारिक जडणघडणीमध्ये या सकस वाचन संस्कृतीचा मोलाचा वाटा होता.
जिल्ह्यातील जुन्या सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून संस्कृती वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असत. वाचक मेळावे, ग्रंथप्रदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद आदी उपक्रमांमुळे वाचकांचा कल ग्रंथालयांकडे जास्त प्रमाणात होता. अनेक संशोधक, प्रबंधक, साहित्यिक, शिक्षक, राजकारणी, विद्यार्थी वर्ग हा ग्रंथालयांमधील साहित्यावर अवलंबून होता. आजही वाचनालय संस्कृती जिल्ह्यात जोपासली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59492 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..