निसर्गाला जोडलेली समृध्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निसर्गाला जोडलेली समृध्दी
निसर्गाला जोडलेली समृध्दी

निसर्गाला जोडलेली समृध्दी

sakal_logo
By

22817
बांदा ः निसर्गरम्य सिंधुदुर्ग.


निसर्गाला जोडलेली समृद्धी

लीड
सिंधुदुर्ग जिल्हा सर्वार्थाने संपन्न आणि समृद्ध आहे. या प्रांताची ताकद इथल्या वैभवशाली इतिहास, परंपरा, समृद्ध लोकजीवन अशा कितीतरी गोष्टीमुळे आहे. आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने राजकीय सिमारेषांबाबत अनेक स्थित्यंतरे पाहिली असली तरी येथे निसर्गावर आधारीत संपन्नता शेकडो वर्षांपासून राहिली आहे. त्या काळात या प्रांताचे अर्थकारण, येथील रचना, व्यापार, शेती आदी क्षेत्राचा विचार करणे गरजेचे आहे.
------------------------
सह्याद्रीच्या कुशीत असलेला दक्षिण कोकणातील हा भाग कायमच निसर्गावर आधारीत अर्थव्यवस्थेवर चालणारा राहिला आहे. संस्थान काळही याला अपवाद नाही. जलमार्गाने होणारा व्यापार हेही त्या काळातील बलस्थान होते. त्या काळात पिकवली जाणारी काही पिके आज नामशेष झाली आहे. वन्यप्राण्यांच्या क्षेत्रातही अनेक प्राणी आज अतिदुर्मिळ किंवा नष्ट झाले आहेत; पण हा संपन्न वारसा आजही सिंधुदुर्गासाठी अभिमानास्पद आहे. ब्रिटिशांनी प्रसिद्ध केलेले गॅझेटियर आणि १९११ मध्ये प्रसिद्ध ‘सावंतवाडी संस्थानचा इतिहास’ या संदर्भ पुस्तकामधून या प्रांताच्या संपन्नतेचे वर्णन आढळते. यानुसार या प्रांतात पाच मोठ्या नद्या वाहतात. यातील चार पश्‍चिम वाहीनी तर एक पूर्व वाहिनी आहे. कर्ली, तेरेखोल, गड, तिलारी आणि हिरण्यकेशी उर्फ घटप्रभा अशा या नद्या होय. आजही त्या तितक्याच क्षमतेने वाहत आहेत. सह्याद्रीच्या रांगांमध्ये अनेक गडकिल्ले होते. त्या काळात ते सत्तेची महत्त्वाची केंद्र होते. या भागात १३५ इंच इतक्या सरासरीने पाऊस पडायचा. आंबोलीसह घाटमाथ्यावर हे प्रमाण ३०० इंचापर्यंत होते. नद्या आणि विहीरी हे त्या काळातील पाणी व्यवस्थेचे माध्यम होते. त्या काळात हिवताप हा लोकांसाठी आरोग्याच्या क्षेत्रात डोकेदुखी ठरला होता. सह्याद्रीच्या रांगांमध्ये झाडी असलेल्या भागात याचा उपद्रव सर्वांत जास्त होता. त्या पाठोपाठ आमांश आणि अतिसार हे पावसाळ्यात होणारे आजार अनेक गावांसाठी अडचणीचे ठरायचे. याशिवाय देवी, गोवर, पटकी या आजाराने जर्जर झालेल्यांची संख्याही मोठी असायची.
या प्रांतांत कृषी क्षेत्रामध्ये प्रामुख्याने धान्य उत्पादनाचे प्रमाण जास्त होते. यात भात, नाचणी, वरी, हरीक, बरक इत्यादी धान्ये कुळीथ, मुग, उडीत, पावटे, तुरी, चवळी आदी कडधान्ये याचे उत्पन्न घेतले जात असे. नारळ, सुपारी, काजू, कॉफी, आंबे, फणस, अननस, केळी, पपनस, साखर लिंबू, लिंबू, म्हावळूंग ही फळे प्रामुख्याने बागायतीत पिकवली जायची. तिळ, मध, विड्याची पाने, कात, ताग, खरडा, मिरची, आले, मिरी, चिंच, हळद, ऊस, कांदे याचे उत्पन्नही इथे घेतले जात असे. यातील काही पिके आता सिंधुदुर्गात आढळत नाहीत. बांबूपासून उत्पन्न घेणाऱ्यांची संख्याही मोठी होती.
येथील पर्यावरण क्षेत्राच्या संपन्नतेचाही वारसाही मोठा होता. बहुसंख्य ठिकाणी दाट जंगले होती. त्यात पट्टेरी वाघ, राणडुक्कर, अस्वल, तरस, गवा, कोल्हा, सांबर याच्या जोडीने चित्ताही असल्याचे उल्लेख सावंतवाडी संस्थानचा इतिहास या संदर्भ ग्रंथात आढळतात. खनिज क्षेत्राची चाहुलही पूर्वीपासून लागल्याचे दिसते. त्या काळात लोखंडाचा अंश असलेले दगड काही भागात आढळत असल्याचे उल्लेख आहेत. मॅगॅनिजच्या खाणींचाही उल्लेख आढळतो. रामघाटावर (तिलारी परिसर) सोने निघण्यासारखी माती असल्याचे संदर्भ दिले गेले आहेत. आकेरीत मिळणारा काळा दगड त्या काळातही मुर्ती कामासाठी प्रसिद्ध होता. सोनवडे आणि सोनुर्ली येथे मिळणाऱ्या दगडाची त्या काळात भांडी बनवली जायची. अभ्रकाच्या खाणी कडावल आणि पांग्रड येथील डोंगरात होत्या. वालावलमधील कुपीच्या डोंगरात मिळणारा वैशिष्टपूर्ण मिळणारा दगड नक्षी कामासाठी उपयोगी यायचा.
सावंतवाडी संस्थानच्या १९११ मध्ये केलेल्या खानेसुमारी (लोकसंख्या मोजणी) प्रमाणे इथली लोकसंख्या २१७२४० इतकी होती. यातील बहुसंख्य वस्ती हिंदूंची होती. त्या खालोखाल मुस्लिम, ख्रिश्‍चन आणि जैन धर्मियांचा समावेश होता. हिंदू धर्मामध्ये वेगवेगळ्या तब्बल ५९ जाती होत्या. या सर्व समाजात चालीरिती, पोषाख, खाणेपिणे याच्या पद्धतीमध्ये बराच फरक होता. एकूण लोकसंख्येच्या तीन चतुर्थांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती होता. शेतीच्या खालोखाल व्यापार, कलाकौशल्य, नोकरी, सागरी संपत्तीशी संबंधित व्यवसाय आदी उत्पन्नाची साधणे होती. त्या काळात सावंतवाडीत लाकडी खेळण्यांचे कारखानेही होते. सावंतवाडी शहरात कौले, विटा तयार करणारी फॅक्टरी असल्याचे उल्लेखही आढळतात.
व्यापार प्रामुख्याने वेंगुर्ले, आरोंदा या बंदरातून व्हायचा. मालवणकडील भागातूनही जलवाहतूक चालायची. जलमार्गाने बहुतेक माल मुंबईतून यायचा यात तांदूळ, विलायती व देशी कापड, केरोसीन, लवंग, जायफळ, वेलदोडे आदी मसाल्याचे पदार्थ तांब्यापितळेची भांडी, लोखंडी हत्यारे, सुया, टाचण्या, स्टेशनरी, सुकामेवा, चहा, साबण, हरभरे, वाटाणे आदी कडधान्ये आदीची आवक होत असे. देशावरून रस्ता मार्गाने कोकणात माल येत असे. यासाठी फोंडा, घोडगे, हनुमंत किंवा रांगणा, पारपोली, तळकट, मांगेली, रामघाट ही घाटमार्ग होते. यातील फोंडा आणि पारपोली हे अधिक चांगले घाटमार्ग होते. रामघाटातूनही वर्दळ बरीच असायची. देशावरून घाट उतरून आंबेमोहर तांदुळ, गहू, ज्वारी, बाजरी, तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, तिळाचे तेल, तंबाखू, गांजा, कांदे, देशी कापड आदी कोकणात येत असे. या प्रांतातून मात्र नारळ, सुपारी, ताग, मिरी, कॉफी, काजू, आंबे, आमसूल, तिळ आदी विक्रीसाठी बाहेर जात असे. कला कौशल्याच्या वस्तूही विक्रीला बाहेर जायच्या. त्या काळात सावंतवाडी संस्थानामध्ये दरवर्षी सरासरी साडेपाच लाख रूपयांचा माल यायचा आणि ५० हजाराचा माल संस्थानाबाहेर निर्यात व्हायचा. कसाल, घोटगे, नेरूर (दुकानवाड), आंबोली, तळकट, भेडशी, मळेवाडी (आजगाव), आरोस, आरोंदा, सातार्डा येथे टोलनाके होते. याठिकाणी जकात जमा केली जायची. एकुणच येथील अर्थकारण प्रामुख्याने निसर्गावर आधारीतच होते. त्या काळातही मुंबईशी असलेले नाते घट्ट होते.
--
चौकट
अशी होती लोकसंख्या
(सावंतवाडी संस्थानने १९११ मध्ये केलेल्या मोजणीनुसार धर्मनिहाय असलेली लोकसंख्या)
* हिंदू - २०,५३५१
* मुसलमान -५,६३३
* ख्रिश्‍चन - ५,८१५
* जैन - ४३९
* पारशी - २