
साहित्याची मुळे खोलवर रुतलेला प्रांत
२२७८६
गोविंद काजरेकर
22888
साहित्याची मुळे खोलवर रुतलेला प्रांत
लीड
वारसा ही म्हटली तर सांस्कृतिक गोष्ट असते. एक प्रकारची जपणूक असते. आजवरच्या इतिहासात माणसाला जपावीशी वाटलेली प्रत्येक गोष्ट त्याने जपलेली आहे. यातूनच परंपरेचा वेल वाढल्याचा दिसतो. प्रत्येक पिढी नव्या पायवाटा शोधत असते. त्यात परंपरेचे अंश अबाधित असतात. साहित्याची मुळेही त्या त्या प्रदेशाच्या मातीत खोलवर रुतलेली असतात. नवपिढीला तो वारसा जपत नव्या वाटा शोधता येतात.
- गोविंद काजरेकर (सावंतवाडी)
---------------------------
कोणत्याही प्रदेशाला कला आणि संस्कृतीचा वारसा असतो, तसा तो सिंधुदुर्गालाही लाभला आहे. आधी होऊन गेलेल्या ज्ञानवंतांच्या, महंतांच्या, कलावंतांच्या विचारांचा, कलेचा प्रभाव तो तो समाज जपत राहतो. ही संस्कृतीची बलशाली प्रमाणके असतात. ही प्रमाणके संस्कृतीला आकार देतात. तसे नव्या पिढ्यांना जगण्याचे बळ देतात. आजवर सिंधुदुर्गाने जपलेला सांस्कृतिक आणि वाययीन वारसा पाहिल्यास इतिहासाच्या फलकावर त्याची सुचिन्हे खूप आधी उमटलेली दिसतात. ही भूमी संत सोहिरोबा, संत टेंब्ये स्वामी, भालचंद्र महाराज यांची तपोभूमी आहे, साक्षात्काराची भूमी आहे. या भूमीत त्यांनी अध्यात्माची अक्षरेही गिरविली. मोक्षासाठीचे तत्त्वज्ञान जगाला देऊन त्यांनी समाजाला उपकृत केले आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवसुत यांचे पाय या भूमीला लागले. म्हटल्या तर या सामान्य घटना होत्या; मात्र त्याचे दीर्घकालीन पडसाद येथे उमटत राहिलेले दिसतात. पुढे अप्पासाहेब पटवर्धन, नाथ पै यांनी या भूमीत गांधीवाद रुजवला. वि. स. खांडेकरांना काही काळासाठी का होईना, ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्यासाठी याच भूमीची निवड करावीशी वाटली.
विठ्ठल कृष्ण नेरूरकर, दा. र. दळवी यांनी या प्रदेशाचे, माणसांच्या आतले कढ मालवणी बोलीतून शब्दबद्ध केले. चिं. त्र्यं. खानोलकर, जयवंत दळवी, आ. ना. पेडणेकर, मधु मंगेश कर्णिक, विद्याधर भागवत, हरिहर आठलेकर, मनोहर कदम आदी लेखकांनी कथा-कादंबरीचा पैस रुंदावत नेला. खानोलकर, गुरुनाथ धुरी, वसंत सावंत, ना. शि. परब, आ. द. राणे, आ. सो. शेवरे आदी कवींनी आधुनिक काळाच्या हाका ऐकत कवितेचा ध्वज फडकावत ठेवला. ल. मो. बांदेकर यांनी आपल्या पौराणिक नाटकांनी मानवी नात्यांची गुंतागुंत उलगडून दाखविली. शिवाय लोकधारेचा, लोकसाहित्याचा एक खळाळता प्रवाह लोकजीवनाला सतत चैतन्यदायी प्रेरणा देत आला आहे. या साऱ्याचा वारसा जपणारी नवी पिढी आपल्या प्रतिभाबळाने लिहीत आहेत. नाही म्हटले तरी आजच्या साऱ्या लिहित्या लेखकांच्या पाठीवर वरील कोणत्या ना कोणत्या व्यक्तीच्या विचारांचा, कल्पनाविश्वाचा, संस्कारांचा अदृश्य हात फिरता राहिलेला आहे.
आजच्या सिंधुदुर्गाच्या साहित्य परंपरेमध्ये इथल्या भूमीचे, निसर्गाचे, संस्कृतीचे अनेक संदर्भ साक्षात होताना दिसतात. ते तिपेडी आहेत. इथल्या मातीत उगवलेले अगोचराचे, गूढ शक्तींचे प्रत्यय, निसर्ग आणि संस्कृतीचा वारसा आणि समाजाला एका सूत्रात बांधून ठेवण्यासाठीची समानतेची, एकोप्याची जाणीव ही तीन सूत्रे आजच्या सिंधुदुर्गातील साहित्यात सहजी प्रत्ययाला येतात. महंतांच्या विचारातून आलेली आध्यात्माची संदर्भसूत्रता वसंत सावंत, ना. शि. परब यांच्या कवितेने मुरवून घेतलेली दिसते. इथल्या माणसांचे दारिद्र्य, वेडाचार, इथल्या विघातक प्रथा, माणसाची कलहवृत्ती, देव आणि भूताखेतांचे संदर्भ व उल्लेख केलेल्या अनेक कथा-कादंबरीकारांनी रेखाटल्या आहेत. जीवनातील सारे अभाव हे सामाजिक विषमतेच्या आघातातून आले आहेत, याची जाणीव आ. सो. शेवरे, सिद्धार्थ तांबे, उत्तम पवार यांच्या कवितेने करून देण्याचे प्रयत्न केले. या तीन संदर्भसूत्रांनी मागील पिढ्यांचा वारसा जपणाऱ्या सिंधुदुर्गातील साहित्याचा मागोवा घेता येईल.
आजच्या मराठी कादंबरीत लक्षणीय ठरावे, असे कादंबरी लेखन प्रवीण बांदेकरांनी केले आहे. कादंबरीच्या नव्या वाटा चोखाळताना बांदेकरांनी परंपरेशी आपली नाळ तोडली नाही. त्यांनी लोकधारेतून आलेले कथाबंध आपल्या साहित्याची संदर्भसूत्रता वृद्धिंगत करण्यासाठी योजले आहेत. शिवाय इथल्या परंपरा मोडून माणसांना देशोधडीला लावणाऱ्या व्यवस्थेचा समाचार हा लेखक घेताना दिसतो. यामागे जशी गांधीवादी संस्काराची प्रेरकता आहे, तशी आपल्या भूमीचा वारसा जपण्याची वृत्ती असलेली दिसते. नव्या काळाच्या आक्रमकतेला आपल्या संस्कृतीची बलशाली प्रमाणके थोपवू शकतात, हा आशावाद त्यांनी आपल्या ‘चाळेगत’, ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबऱ्यांतून व्यक्त केला आहे. राजकीय व्यवस्थेतून आलेली अराजकता, भ्रममूलक विचारविश्व, अघोरी हिंसा यांचा निषेध बांदेकरांनी आपल्या ‘इंडियन अॅनिमल फार्म’ या कादंबरीत केला आहे. समाजवादी विचारधारेचे अनेक अंश बांदेकरांच्या लेखनात सापडत राहतात.
उषा परब, वृंदा कांबळी यांनीही कादंबरी लेखन केले आहे. उषा परब यांची ‘कुसवा’ ही कादंबरी कोकणातल्या परंपरांचे आणि दारुण वास्तवाचे चित्र रेखाटते. मातृत्व हे कितीही महन्मंगल असले, तरी त्यातून उद्भवणाऱ्या दु:खाने अनेकदा स्त्रीच्या अस्तित्वाची निरर्थकता अधिक गहिरेपणाकडे प्रस्थान करीत असते. किंबहुना तिच्या वाट्याला येणारा अवकाश आणि भोवतालची माणसे तिची अनेकांगी कोंडी करीत जातात, तेव्हा तिचे दु:ख हे अवघ्या स्त्रित्वालाच विटंबित करीत जाते. हे वास्तव त्यांनी कादंबरीत नेमकेपणे मांडले आहे. जयवंत दळवी यांच्या कादंबरीतील पात्र, घटना-प्रसंगांसारखे चित्रण येथेही घडताना दिसते. मात्र, कादंबरीचे आशयसूत्र स्वतंत्र असलेले दिसते. वृंदा कांबळी यांनी अतर्क्य, प्राक्तनरंग, कुरवंडी इत्यादी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आजच्या स्त्रीच्या वाट्याला येणारी अनेक संकटे, अस्तित्त्वाचे प्रश्न त्यांनी मांडले आहेत. कल्पना मलये यांनी अलीकडे ‘कारटो’ ही संपूर्ण मालवणी बोलीतील बालकादंबरी लिहून नवा मानदंड निर्माण केला आहे.
सिंधुदुर्गातल्या कवितेची मुळे ‘सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, निसर्गनिर्मित वनदेवीचे केवळ नंदनवन’, असे म्हणणाऱ्या कवी गोविंद यांच्या कवितेपर्यंत भिडलेली दिसतात. वसंत सावंत यांनी ही परंपरा खूप सशक्त केली. तिला अध्यात्माचे गहिरे रंग दिले. याच धारेचा वारसा सांगत कवी दादा मडकईकर यांनी मालवणी बोलीतून लेखन केले. तर प्रबोधनाची परंपरा जोपासणाऱ्या कवींमध्ये प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, अजय कांडर, अनिल धाकू कांबळी, गोविंद काजरेकर, शरयू आसोलकर, मोहन कुंभार, उषा परब, हर्षवर्धिनी जाधव, श्वेतल परब यांनी मोलाची भर घातली आहे. आधुनिक काळाने, कुटिल राजकीय नीतीने, बाजारवादाने समाजासमोर उभ्या केलेल्या आव्हानांचे संदर्भ असलेली अर्थवाहक कविता या कवींनी लिहिली आहे. आधीच्या समाजवादाच्या बळकट संस्कारांनी प्रभावित झालेली ही पिढी सामाजिक विचारधारांचे कोसळणे अनुभवत असताना व्यथित होते. कधी राजकीय, धार्मिक व्यवस्था माणसांवर चाल करून येते, तर कधी जंगली श्वापदे आक्रमकपणे नासधूस करीत जातात. या विळख्यात सापडून हतबल झालेल्या माणसांचे मानस हे कवी शब्दबद्ध करताना दिसतात. या कवींची कविता जात, धर्म, पंथ यांच्या मानसिकतेत अडकत नाही. तर अखिल मानवाच्या सौहार्दपूर्ण, सुखमय, निरामय जीवनाचा आग्रह धरते.
आंबेडकरी विचारधारेचा वारसा सांगत सिंधुदुर्गात अनेक कवी लिहिते राहिले आहेत. आ. सो. शेवरे यांनी ‘गांधारीची फुले’, ‘दफनवेणा’, आणि ‘झीरो बॅलन्स...’ असे कवितासंग्रह लिहून इथल्या समतावादी कवितेची पायाभरणी केली. त्यामुळे याच बांधिलकीने प्रेरित होऊन सिद्धार्थ तांबे, उत्तम पवार, अरुण नाईक, अनिल जाधव, सिद्धार्थ विष्णू तांबे, विठ्ठल कदम, सुनील कांबळे, राजेश कदम, सरिता पवार, कल्पना मलये, मधुकर मातोंडकर, मंगेश जाधव, मनीषा जाधव, सफरअली इसप आदींनी सामाजिक समतेचा आग्रह धरणारी कविता लिहिली. कधी व्यवस्थेचा निषेध करीत, कधी नकार देत, तर कधी व्यवस्थेशी दावा मांडत हे कवी व्यक्त होताना दिसतात. समाजाने नाकारलेल्या माणसांची ही कविता आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा या कवितेला आहे. त्यामुळे ही कविता स्वभावत: मानवतावादी जाणिवांचा प्रवास रेखाटते. आंबेडकरी विचारधारा अनुसरणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांच्या वर्तनातील विसंगती, विभूतिपूजकता ही कविता उघड करते. आजच्या गोंधळलेल्या समाजाला आंबेडकरवाद हाच कसा पर्याय असू शकतो, याचे सूचन ही कविता करते. म्हणूनच प्रबोधनाबरोबर परिवर्तनाचा आग्रह या कवितेने धरलेला दिसतो.
मालवणी बोलीतील साहित्याचा वारसा जपणारे अनेक कवी आज लिहिते आहेत. वि. कृ. नेरूरकर यांनी मालवणी माणसाचा हुंकार मालवणी बोलीतून पहिल्यांदा उमटवला. ही परंपरा पुढे अनेक कवींनी सशक्त केली. चंद्रकांत खोत, दा. र. दळवी, महेश केळुसकर, दादा मडकईकर, नामदेव गवळी, अविनाश बापट, सई लळीत, रुजारिओ पिंटो, ना. शि. परब, सुनंदा कांबळे, कल्पना बांदेकर, प्रकाश तेंडोलकर, महेश वालावलकर आदी कवींनी मालवणी बोलीतील कविता लिहिली आहे. ‘झिनझिनाट’ या मालवणी कविता संग्रहाने महेश केळूसकर हे सर्वदूर पोहोचले. दादा मडकाईकर यांनी ‘चान्याची फुला’ हा मालवणी कविता संग्रह लिहिला. भोवतालचा निसर्ग आणि सण-उत्सवातून प्रतीत होणारा लोकस्वभाव त्यांच्या कवितेत मार्मिकपणे आला आहे. सई लळित यांनी स्त्रीसुलभ भावभावनांतून भोवतालच्या लोकमानसाचा वेढा घेतला आहे. या कवींची कविता गीतात्म स्वरूपाची कविता आहे. मात्र, नामदेव गवळी यांच्या बोलीतील कवितेत कोकणी माणसाच्या जीवनाचे, दारिद्र्याचे, हतबलतेचे चित्र खूपच प्रभावीपणे आले आहे. मालवणी बोलीचा इतका समर्थ, अर्थबहुल वापर अन्य कवींनी अभावानेच केलेला दिसतो. बोलीतील विनोदाचा बाज दूर करून मालवणी बोलीतील कवितेला गंभीरतेचे परिमाण गवळी यांच्या कवितेने दिले.
थंडयेन कुडकुडलो, भर जात्रेत पटार हरलो
इड्येक म्हाग, चायची पन पत नाय
पदयेन शॅत तोडला, आपल्यापासून कपाळार चौकचार
संसारबिवसार चाकरी कारापली
झीरोबजेट तेतूर लाखाचे रेट
पावला पावला सपनाची रका रका जाली
दादग्यान जाम कामायल्यान सोऱ्यामटक्यात
बंगलो गाडी पंचायतीची पदा घरा इली
आमची पेजेवयली नेटसेटगिरी शेपाचशात
मास्तरकीची अब्रू घेऊन गेली (भातालाय)
शिक्षण, राजकारण, समाजव्यवस्था यातील विदारक वास्तव ही कविता रेखाटते. मालवणी नाटकांचा गंगाराम गवाणकर यांनी दिलेला वारसा तितक्या सक्षमपणे पुढे चाललेला दिसत नाही. सिद्धार्थ तांबे यांनी ‘जाता नाही जात’ हे नाटक लिहून सामाजिक वर्तनातील विसंगतीवर नेमके बोट ठेवले आहे. उषा परब यांची ‘फुलपाखरू-एक किटक’ ही एकांकिका लक्षणीय ठरली. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली यांनी आणि कुडाळ येथील बाबा वर्दम थिएटरमधील कलाकारांनी नाट्यचळवळ चालवण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. बाबा वर्दमच्या कलाकारांनी अलीकडे ‘बिलिमारो’ नावाचा दीर्घांक लिहून सादर केला. त्याला मोठे यश मिळाल्याचे दिसते. पुढील काळात या नव्या कलाकारांकडून मोठ्या कारकिर्दीची अपेक्षा करता येईल. मात्र, अलीकडील पिढीत नाट्यक्षेत्रात लक्षणीय नाटककार दिसत नाहीत, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. सिंधुदुर्गातील साहित्याने मागील पिढीचा वारसा जपत मराठीच्या मुख्य धारेला बळकट करण्याचे प्रयत्न नक्कीच केले आहेत, असे म्हणता येईल. साहित्य आणि संस्कृतीचा हा प्रवाह अबाधित ठेवण्यासाठी आणि हा वारसा पुढे अधिक सशक्त करण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी सक्रिय होणे गरजेचे आहे.