
चाकरमान्यांसाठी परतीचा प्रवास खडतर
कणकवली - उन्हाळी सुट्टीसाठी गावाकडे आलेले चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला लागले आहेत. नियमित धावणाऱ्या आणि जादा गाड्यांना आरक्षण कोटा फुल्ल झाल्याने प्रवाशांना आता पॅसेंजर गाडीवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीला कमालीची गर्दी वाढली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर यंदा नियमित गाड्यांबरोबर जादा गाड्या सोडण्यात आल्या; मात्र प्रतिवर्षाप्रमाणे त्याही फुल्ल झाल्या. त्यामुळे प्रवाशांना सध्या आरक्षण मिळत नाही. प्रतीक्षा यादी ४०० पर्यंत आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीच्या तिकीटही मिळत नाहीत. तत्काळ तिकीटचा कोटा काही मिनिटातच संपला जातो. त्यामुळे प्रवाशांना आता प्रतीक्षा यादीवरील तिकिटावर प्रवास करण्याची वेळ आली आहे. परिणामी आरक्षित डब्यांमध्ये कन्फर्म केलेल्या प्रवाशांच्या तिकिटासोबत वेटिंग लिस्टवरील प्रवासीही प्रवास करत आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी वाढली आहे. एकीकडे खाजगी बस गाड्यांचे वाढलेले दर लक्षात घेता प्रवासी रेल्वे गाड्यांवरच विसंबून आहेत.
कणकवली रेल्वे स्थानकावर सध्या दिवा पॅसेंजर गाडीला कमालीची गर्दी वाढू लागली आहे. मांडवी एक्सप्रेस असो वा जनशताब्दी एक्सप्रेस या दिवसा धावणाऱ्या गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी आहे. रात्रीच्या कोकणकन्या, मेंगलोर एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेसलाही प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढू लागली आहे. कोकणातील सर्वच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. सावंतवाडी येथून दिव्याकडे जाणाऱ्या दिवा पॅसेंजर गाडीमध्ये जेमतेम सावंतवाडीत चढणाऱ्या प्रवाशांना बसायला मिळत आहे. उर्वरित कुडाळ, कणकवली, नांदगाव, वैभववाडी, खारेपाटण, आचिर्ण या रेल्वे स्थानकांवर चढणाऱ्या प्रवाशांना गाडीत शिरायलाही वाट मिळत नाही, अशी स्थिती आहे. आज येथील रेल्वे स्थानकात दिवा पॅसेंजर गाडीसाठी प्रवाशाची प्रचंड गर्दी झाली होती. सध्या रेल्वेने जनरल अनआरक्षीत तिकट बंद केली आहे. एक्सप्रेस गाड्यांना सिंटींगच्या बोगी जोडल्या आहेत. दिवा गाडीला केवळ सहा बोही अनआरक्षित आहेत. गेल्या २ मेपासून जेष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या तिकटी मिळत आहेत; पण तत्काळसाठी जेष्ठ नागरिकांना सवलत दिली जात नाही.
तत्काळ तिकिटासाठी अतिरिक्त पैसे
दिवा पॅसेंजर गाडीमध्ये ऑनलाइन पद्धतीने तत्काळ तिकीट घेतल्यास असे तिकीट जर कन्फर्म झाले नाही, तर प्रवाशांना प्रत्येक प्रवाशा मागे तब्बल १२५ रुपये रेल्वेला द्यावे लागत आहेत. ऑनलाईन वेटींग तिकिट चार्ट कन्फर्म झाल्यानंतर रद्द केली जाते. प्रतिक्षा यादीतील तिकीट ऑनलाईन पद्धतीने काढणाऱ्या प्रवाशांना त्याचे पैसे परत केले जातात दोन ते चार दिवसात हे पैसे परत करत असताना प्रति प्रवासी १२५ रुपये कापून घेतले जात आहेत. तिकिट खिडकीवर प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द केल्यास प्रति प्रवाशी ६० रूपयांची रेल्वे कपात करीत आहे. हा नाहक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
खासगी प्रवासही महाग
खाजगी बस गाड्यांची हंगाम आणि डिझेल दरवाढीमुळे प्रवासी तिकिट यंदा वाढले आहे. टूर ऑपरेट करणारी रेड बस कंपनी गोवा ते मुंबई असे २५०० ते २७०० सिल्पर भाडे आकारत आहे. विविध तालुक्यातील व गावातून सुटनाऱ्या खाजगी गाड्या १२०० ते १५०० पर्यंत तिकीट दर आकारत आहेत. साध्या टू बाय टू गाडीला सरासरी १ हजार ते आठशे रुपये मोजावे लागत आहेत.
रेल्वे प्रशासनाकडून नियोजनाचा अभावामुळे कोकणातील प्रवाशांचे यंदा हाल झाले. तीन महीने आगाऊ बुकिंग करून सुध्दा तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांना प्रतिक्षा यादीच्या तिकीटीवर प्रवास करावा लागत आहे. कोरोनानंतर तीन वर्षांनी चाकरमानी आणि त्यांची मुले गावाला आली. रेल्वेने गणेश उत्सवासारखे नियोजन केले असते तर सोय झाली असती.
- दाजी गावकर, शिवडाव.
चाकरमान्यांना यावर्षी कोकण रेल्वे प्रशासनाने निराश केले आहे. मी परतीच्या प्रवाशासाठी तत्काळ तिकिट काढण्यासाठी सकाळी गेलो होतो; मात्र त्या ठिकाणी आधीच मध्यरात्रीपासून रांग लावण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी ही मध्यरात्री नंबर लावला. सकाळी मला सिटिंग तिकिट न मिळता एसी स्लिपरमध्ये तिकिट मिळाले. त्यासाठी जास्त पैशाबरोबर मानसिक तसेच शारिरिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रशासनाने यापुढे चाकरमान्यांसाठी योग्य नियोजन करावे.
- इजित फर्नांडीस, कांजूरमार्ग.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59621 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..