रत्नागिरी-थिबा राजवाड्यात पर्यटकांचा राबता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिल्पांची माहिती घेताना पर्यटक.
रत्नागिरी-थिबा राजवाड्यात पर्यटकांचा राबता

रत्नागिरी-थिबा राजवाड्यात पर्यटकांचा राबता

रत्नागिरी - राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांच्या अंतर्गत अभिरक्षक, प्रादेशिक वस्तुसंग्राहलय रत्नागिरीतर्फे जागतिक संग्रहालय दिवस शहरातील थिबा राजवाडा येथे साजरा करण्यात येत आहे. सहा दिवस चालणाऱ्या संग्रहालय दिवसांत विविध विषयांवर व्याख्याने व चित्रकला, शिल्पकला प्रात्यक्षिके पर्यटकांना पाहायला मिळत आहे. रांगोळ्यांनी सजलेल्या या थिबा राजवाड्यात दिवसाला ५०० पर्यटक भेट देत असून पर्यटनाचा आनंद द्विगुणित करत आहेत.

सहा दिवस चालणाऱ्या या संग्रहालय दिनात पर्यटक थिबा राजवाड्याला भेट देत आहेत. थिबा पॅलेसमधील वस्तूसंग्रहालय आहे. त्यामध्ये चार गॅलरी आहेत. गॅलरीचे वर्गीकरण त्यात समाविष्ठ असलेल्या वस्तूंच्या आधारे केले गेले आहे. तळमजल्यावर पहिली गॅलरी शिल्पकलेची आहे. त्यात कोकण प्रांतातील विविध शिल्पे आहेत. त्यामध्ये देवी पार्वती, देवी सरस्वती, देव भैरव, सूर्य, ब्रह्मदेव, विष्णू आणि इतर देवतांचा समावेश आहे. तसेच विविध महापुरुषांच्या शौर्याची कथा दर्शविणारी वीरगळे आहेत. कोकणातील पुरातन गृहोपयोगी वस्तूंचाही समावेश आहे. पहिल्या मजल्यावरची दुसरी गॅलरी थिबा राजाने वापरलेल्या वस्तूंची आहे. चौथ्या गॅलरीत १९ व्या शतकातील काही शिल्पे आणि कोकणातील विविध वस्तूंची माहितीपूर्ण छायाचित्रे असून ती समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणारी आहेत.

पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटक थिबा राजवाड्याला भेट देत आहेत. १९ ला पुण्याचे रुपेश पांगरेकर यांचे चित्रकला प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक झाले. त्यांनी थिबा राजवाड्याचे चित्र साकारुन विद्यार्थी व पर्यटकांना दाखविले.
विविध कार्यक्रम
शुक्रवारी (ता. २०) शिल्पकला प्रात्यक्षिक होणार असून शिल्पकलेबाबत रत्नागिरीचा उभरता कलाकार आशुतोष कोतवडेकर दाखविणार आहे. २१ ला मर्दानी खेळ होणार असून सामाजिक सेवा संस्था, मर्दानी आखाडा सैनिक, गिरगाव-कोल्हापूर येथील फिरंगोजी शिंदे यांचे मर्दानी खेळ व प्रात्यक्षिक होईल. २२ ला ऑनलाईन निबंध स्पर्धा, २३ ला निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर होणार आहे.