
देवगड नगरपंचायत सतर्क; मान्सूनपूर्व कामांचा धडाका
swt1911.jpg
22926
जामसंडेः येथे नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून गटारीची स्वच्छता. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
देवगड नगरपंचायत सतर्क
मान्सुनपूर्व कामेः गटार स्वच्छतेसह छोटी मोठी कामे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ः आता पावसाळा तोंडावर आल्याने संभाव्य पावसाचे पाणी साचून शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देवगड जामसंडे नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी गटार स्वच्छ करण्यास सुरूवात केली आहे. नगरपंचायतीच्या मान्सुनपूर्व कामांना सुरूवात झाली आहे. रस्त्यामधील छोट्या मोर्यांचीही स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाऊस सुरू झाला तरी रस्त्याकडेच्या गटारातून, पाईपमधून पाणी निघून जाण्याची शक्यता सध्यातरी दिसत आहे.
आता मान्सून तोंडावर आला आहे. त्यामुळे नगरपंचायतीने त्यादृष्टीने नियोजन सुरू केल्याचे दिसत आहे. शहराच्या विविध भागातील पावसाळी गटारे स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अचानक पाऊस सुरू झाल्यास पावसाचे पाणी तुंबून नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. यामध्ये पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या रस्त्याकडेच्या गटारात साचलेला कचरा, प्लास्टिक बाहेर काढले जात आहे. गटारातील माती उकरून बाहेर टाकून गटारे खोल करण्याचे काम सुरू आहे. यासाठी प्रभागनिहाय कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्त्यामधील टाकण्यात आलेले छोट्या पाईपमधील साचलेला कचरा, प्लास्टीक यांची स्वच्छता केली जात आहे. साचलेला कचरा एकत्रित करून नष्ट करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. नगरपंचायतीने मान्सुनपूर्व कामांचे नियोजन केल्याचे दिसते. त्यानुसार ठिकठिकाणी साचलेला कचरा, पालापाचोळा एकत्रित करून स्वच्छता केली जात आहे. गटारे खोल करणे, परिसरातील स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. पहिला पाऊस झाल्यावर अनेक ठिकाणी कचरा वाहून येतो. अशावेळी रस्त्यामधील छोटे पाईप बुजले जातात. त्यामुळे पावसाचे पाणी गटाराबाहेर येते; मात्र आता प्राथमिक स्वच्छता झाली असल्याने पावसाळ्यात काही प्रमाणात त्रास कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्ताधारी नगरसेवक कर्मचार्यांच्या कामाचा आढावा घेत असल्याचेही चित्र आहे. एकंदरितच नगरपंचायतीने पावसाळी कामांची सुरूवात केल्याचे दिसते.