
कुडाळ उद्यानाचे आज भूमिपूजन
L२२९६९
- कुडाळ ः पत्रकार परिषदेत बोलताना आफ्रीन करोल, मंदार शिरसाट. सोबत सई काळप, श्रुती वर्दम, संजय भोगटे आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)
कुडाळ उद्यानाचे आज भूमिपूजन
नगरपंचायतीची माहिती ः वर्षभरात काम पूर्ण करणार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १९ ः शहरात मंजूर झालेल्या उद्यानाचा भूमिपूजन सोहळा उद्या (ता. २०) सकाळी ९.३० वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. येत्या वर्षभरात हे उद्यान पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष आफ्रीन करोल व उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट यांनी दिली. शहरातील अनधिकृत, बेकायदेशीर बांधकामांवर नगरपंचायत प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
कुडाळ नगरपंचायतीतील सत्ताधारी महाविकास आघाडीच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष आफ्रीन करोल, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, नगरसेविका श्रृती वर्दम, सई काळप, अक्षता खटावकर, राजू गवंडे, राकेश वर्दम, ज्योती जळवी आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष करोल म्हणाल्या, " शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) या योजनेअंतर्गत नगरपंचायत हद्दीत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. हे उद्यान नाट्गृहानजीकच्या जागेत करण्यात येणार आहे. याचे भूमिपूजन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते उद्या करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे, आमदार दीपक केसरकर, अनिकेत तटकरे, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे उपस्थितीत राहणार आहेत."
श्री. शिरसाट म्हणाले, "उद्यानाचा अपेक्षित खर्च सुमारे दोन कोटी रुपये असून, पहिल्या टप्प्यात ७१ लाख रुपये निधी आला आहे. उर्वरित निधी पालकमंत्री उदय सामंत यांनी देऊ, असे सांगितले आहे. केंद्राकडून ठेका देण्यात आलेली ई.एस.एल. कंपनी शहरात पथदीप सेवा योग्य प्रकारे देत नाही. त्यामुळे या कंपनीच्या विरोधात तक्रार केली आहे. याची माहिती खासदार राऊत यांनाही दिली आहे. सांडपाणी व्यवस्था तसेच इतर विकासकामांसाठी मंत्री सतेज पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली आहे. भंगसाळ नदी गणेश घाट शुशोभिकरण, प्रवेशद्वार याकरिता मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निधी मागितला आहे. शहरातील २७ सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. शहरातील वाहतूक कोंडी व उपाय करण्यासाठी नगरपंचायत प्रशासन व पोलिस प्रशासन मिळून योग्य मार्ग काढणार आहेत. पोलिस ठाण्यासमोरील चौक शुशोभीकरणासाठी चार लाख व एस. एन. देसाई चौकासाठी तीन लाख रुपयांचा निधी खासदार राऊत यांनी मंजूर केला असून, लवकरच अग्नीशमन बंबही येईल. भविष्यात शहरातील मुख्य रस्ता रुंदीकरण, भुयारी गटार, भूमिगत विद्युतवाहिन्या, नळपाणी आदी प्रकल्प प्रस्तावित आहेत."
.........