
गुहागर ः शहरातील रस्त्यावरून फिरणारी उनाड गुरे
-rat19p33.jpg
L22985
ः गुहागर ः शहरातील रस्त्यावरून फिरणारी मोकाट गुरे.
-------------
मोकाट जनावरांच्या मालकांवर कारवाई करू
नगराध्यक्ष बेंडल यांचा इशारा; गुहागरातील नागरिक त्रस्त
गुहागर, ता. १९ ः मोकाट गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून समज दिली जाईल. त्यानंतरही त्यांची गुरे अन्यत्र भटकत असताना सापडली किंवा कोणी आणून दिली तर कोंडवाड्यात ठेवून दंडात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी नागरिकांना दिले.
१ मे रोजी एक गाय गुहागर पंचायत समितीच्या खड्ड्यात मृतावस्थेत सापडली होती. या गायीच्या मालकाचा तपास लागला. या मालकाने जवळपास पाच वर्ष ही गाय सांभाळली होती. तिच्यापासून झालेली वासरेही त्यांच्या गोठ्यात आहेत. तरीही अंत्यसंस्कार करावे लागतील, म्हणून ही गाय विकल्याचे संबंधित मालकाने सांगितले. अन्य मालकही पुढे न आल्याने अखेर गुहागर नगरपंचायतीच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने या गायीला खड्ड्यातून काढून अंत्यसंस्कार केले. त्यानंतर मोकाट गुरांचा प्रश्न अधिक चर्चेत आला. शहरातील सर्वेश भावे यांनी आपल्या वाडीत येणाऱ्या गुरांच्या टॅगवरून मालकांना शोधले. त्यांची भेट घेतली. आपली गुरे माझ्या वाडीत बांधून ठेवलीत तरी चालेल, असेही सांगितले. तरीही मालकांनी दुर्लक्ष केले. अखेर वैतागलेल्या भावेंनी या मोकाट गुरांचा मालकासह फोटो फेसबुकवर टाकला तरीही हा प्रश्न सुटला नाही.
या गुरांमुळे झालेल्या नुकसानीला कंटाळून अखेर गुहागर शहरातील २०-२५ नागरिकांनी आज नगराध्यक्षांची भेट घेतली. गुरांमुळे होणारे नुकसान, मालकांकडून मिळणारी अरेरावीची उत्तरे याबाबत नगराध्यक्षांना माहिती दिली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर नगरपंचायतीच्या कचरागाडीवरून गुरांबाबत उद्घोषणा केली जाईल. टॅग नसलेल्या गुरांची जबाबदारी पशुसंवर्धन खात्याकडे दिली जाईल. टॅग असलेल्या गुरांच्या मालकांना नगरपंचायतीमध्ये बोलावून ताकीद दिली जाईल. त्यानंतरही गुरे सापडल्यास अथवा नागरिकांनी आणून दिल्यास कोंडवाडासदृश्य इमारतीमध्ये गुरांना दोन दिवस ठेवले जाईल. गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई नगरपंचायत करेल, असे आश्वासन नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी दिले; मात्र गुरे सोडवण्यासाठी मालक आलाच नाही तर काय, असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला. या मुद्द्यावर नगरपंचायत कायद्यामध्ये नेमके काय सांगितले आहे, याची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी लागेल. नियमबाह्यपणे ही गुरे गोशाळेला देता येणार नाहीत, अशा गुरांचा लिलाव करण्याची तरतूद आहे का, हे पाहावे लागेल, असेही नगराध्यक्ष बेंडल यांनी सांगितले.
-------------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59708 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..