सिंधुदुर्गात पूर्वमोसमीच्या सरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rain
पान एक-सिंधुदुर्गात पुर्वमोसमीच्या सरी

सिंधुदुर्गात पुर्वमोसमीच्या सरी

वैभववाडी - मॉन्सूनपूर्व पावसाने आज सायंकाळी उशिरा वैभववाडी परिसराला झोडपून काढले. याशिवाय जिल्ह्याच्या अनेक भागात पहाटेपासून मॉन्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत आहेत. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून मॉन्सून अंदमानात आणि वातावरण सिंधुदुर्गात अशी स्थिती आहे.

मान्सून यावर्षी वेळेआधीच अंदमानात दाखल झाला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत मॉन्सूनची वाटचाल गतीने होताना दिसत आहे. मॉन्सून जरी अंदमान आणि दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात दाखल झाला असला तरी सिंधुदुर्गात पावसाळी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. आज पहाटेपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरूवात झाली आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, मालवण, कुडाळ, कणकवली, वैभववाडी यांसह विविध भागात पावसाच्या सरी अधूनमधून पडत होत्या.

वातावरणात देखील गारवा निर्माण झाला होता. पूर्णपणे पावसाळी वातावरण निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले होते. सायंकाळी उशिरा काही भागात पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. सायंकाळी साडेसात वाजल्यापासून वैभववाडीत जोरदार पावसाला सुरूवात झाली. विजांच्या लखलखाट देखील सुरू होता. वैभववाडी परिसरातील अनेक गावात जोरदार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग देखील काहीसा वाढला होता. कणकवली तालुक्यातील फोंडाघाट परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. कणकवली शहर परिसरात देखील पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. विजांच्या लखलखाटामुळे काही काळ वीजपुरवठा देखील खंडित झाला.

शेतकऱ्यांची तारांबळ
हवामान खात्याने १८ ते २२ या कालावधीत पावसाचा अंदाज दिला आहे. दरम्यान, मॉन्सून वेळेआधी दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची खरीपपूर्व कामे आटोपण्यासाठी तारांबळ सुरू आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा हंगामात व्यत्यय आला आहे.

आजही जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केलेला आहे; परंतु उद्या (ता. २०) जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कार्यक्रमांवर पावसाचे सावट
जिल्ह्यात सध्या विविध सार्वजनिक, खाजगी धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. कुडाळ येथे कृषी प्रदर्शन सुरू आहे. अजूनही विविध गावांमध्ये लग्न समारंभ, सत्यनारायण पूजा असे कार्यक्रम होत आहेत. या सर्व कार्यक्रमावर पावसाचे सावट आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59796 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top