कोकणच्या चाकरमान्यांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकणच्या चाकरमान्यांचे हाल
कोकणच्या चाकरमान्यांचे हाल

कोकणच्या चाकरमान्यांचे हाल

sakal_logo
By

एसटीने कोकणात जाणाऱ्यांचे हाल
चाकरमान्यांचा आरोप; नऊपेक्षा अधिक फेऱ्या बंद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : उन्हाळा सुटीनिमित्ताने आणि वीकेंडला कोकणात एसटीने जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे; मात्र तुलनेत फेऱ्या आणि संख्या घटल्याने चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो आहे. नियमित असलेल्या फेऱ्यांच्या तुलनेत रत्नागिरी विभागात धावणाऱ्या मुंबई विभागातील एकूण नऊपेक्षा जास्त फेऱ्या बंद आहेत; तर मुंबई विभागातून राज्यभरात धावणाऱ्या तब्बल २० फेऱ्या बंद आहेत. परिणामी चाकरमान्यांना नाईलाजास्तव खासगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत आहे.
मुंबई विभागातून जळगाव, धुळे, लातूर धावणारी प्रत्येकी एक फेरी आहे. मात्र त्याही सध्या बंद आहेत. मुंबई सेंट्रल डेपोमध्ये प्रवाशांची मोठी संख्या असताना पुरेशा तिकीट खिडक्या नसल्याने प्रवाशांच्या रांगा दिसून येत आहेत. त्यामुळे सकाळपासून येणाऱ्या प्रवाशांना तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. गेल्या २२ एप्रिलपासून नियमित सेवा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांमध्येही वाढ झाली आहे; मात्र डेपो पातळीवर अधिकाऱ्यांचे नियोजनच दिसून येत नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रारी करूनही डेपो प्रशासन तक्रारीची दखल घेत नसल्याचे एसटी प्रवासी राजेंद्र दांडेकर सांगतात.
संपात तुम्ही साथ दिली नसल्याने असे भोगावेच लागेल.
मुंबई सेंट्रल बस स्थानकावर प्रवाशांच्या तिकीट खिडकीवर रांगा लागल्याने संतप्त नागरिकांनी वाहतूक निरीक्षक कार्यालयात जाऊन जाब विचारला. मात्र, संपातून माघार घेऊन कर्तव्यावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून एसटीच्या प्रवाशांना उद्धट वागणूक दिली गेली. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावेळी एसटीच्या प्रवाशांनी साथ दिली नाही. त्यामुळे आता प्रवाशांना अशा अडचणी भोगाव्याच लागणार असल्याचे कर्मचारी प्रवाशांना उलट बोलल्याचे खेडला जाणाऱ्या रामचंद्र तांबे यांनी सांगितले.

विभागनिहाय फेऱ्या...
*विभाग - *पूर्वी - *सध्याच्या
*रायगड - *९ - *१०
*रत्नागिरी - *२९ - *२०
*पुणे - *१४ - *१२
*सातारा - *२९ - *२५
*सांगली - *३ - *१
*कोल्हापूर - *३ - *२

एकतर ऑनलाईन तिकीट आरक्षित करण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. डेपोतील खिडकीवर आरक्षणासाठी त्रास सहन करावा लागतो आहे. सकाळी अकराला येऊनही दुपारी दोनपर्यंत तिकिटासाठी नंबर लागला नाही. एकच खिडकी असल्याने रांगेत तासन्‌तास उभे राहावे लागत आहे.
- रामचंद्र तांबे, खेडला जाणारे प्रवासी
---
सकाळी ११.४५ वाजता येऊनही प्रवाशांच्या गर्दीमुळे तिकीट मिळू शकले नाही. आता कर्मचाऱ्यांचा लंचटाईम झाल्याने कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसावे लागत आहे.
- सुनील नेवरेकर, लांज्याला जाणारे प्रवासी