
-सागरतीर्थमध्ये ग्रामनिधी नुकसानाचा आरोप
सागरतीर्थमध्ये ग्रामनिधीत नुकसानाचा आरोप
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ः दोषींवर कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. २० ः सागरतीर्थ ग्रामपंचायत मालकीच्या पर्यटन सुविधा केंद्राच्या भाडे तत्त्वाच्या अटीशर्तीचे उल्लंघन करून ग्रामनिधीचे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायतीच्या मालमत्तेच्या आर्थिक व्यवहारात अपहार झाल्याचा आरोप करत दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी सागरतीर्थ ग्रामपंचायतीच्या विद्यमान ४ सदस्यांनी निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. करारापमाणे रक्कम वेळेत जमा न करता, ती रोख स्वरूपात घेऊन त्याची पावती वेळेत न करता ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून ग्रामपंचायतीचे नुकसान करणाऱ्या ग्रामसेवकांवर तसेच यास जबाबदार असणाऱ्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, २४ डिसेंबर २०१९ ला सागरतीर्थ ग्रामपंचायत येथे पर्यटन सुविधा केंद्र तत्कालीन सरपंच यांच्यामार्फत बाँण्डपेपरवर लिहून घेऊन एकास तीन वर्षे भाडेतत्त्वावर अटी घालून केंद्र चालविण्यास देण्यात आली; परंतु २४ फेब्रुवारी २०२१ च्या मासिक सभेत या हॉटेलच्या व्यवहाराबद्दल सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला असता त्यावेळी ठरलेली रक्कम जमा झाली नसल्याने निदर्शनास आले. याबद्दल सचिवांना विचारले असता त्यांनी ७५ हजार पोच झाले असल्याचे तोंडी उत्तर दिले व सरपंचांनी त्यावर योग्य कार्य़वाही करू, असे उत्तर दिले; परंतु ३० मार्च २०२१ च्या मासिक सभेत २४ फेब्रुवारी २०२१ च्या इतिवृत्ताचे वाचन केले असता हा मुद्दा नमूद केलेला ठराव न आढळून आल्यामुळे आम्ही सचिवांना विचारणा केली असता आपल्याकडून नजरचुकीने हा मुद्दा इतिवृत्तात लिहावयाचा राहिला, असे सचिवांनी तोंडी कबूल केले. २० एपिल २०२१ ला अनामत रकमेचा पावत्या व करारनामा मागितल्यावर पावती बनवण्यात आलेली नाही. आम्ही हाती रक्कम स्वीकारली आहे, असे उत्तर सचिवांनी दिले. करारनाम्यापमाणे रक्कम सागरतीर्थ ग्रामपंचायतच्या बँक खात्यात जमा होणे जरुरीचे होते किंवा त्याचवेळी पावती बनवणे क्रमपाप्त होते; परंतु तसे झाल्याचे निदर्शनास आले नसल्यामुळे आम्ही लेखी स्वरूपात अर्ज करून करारनामा व सर्व भरलेल्या पावत्या व त्यांच्या सत्यपतीची मागणी केली असता सचिवांनी आम्हाला २० एप्रिल २०२१ चा अर्ज केल्यानंतर त्याच दिवशीची तारीख घालून ७५ हजाराची सामान्य पावती बनवून आम्हास कागदपत्रे सुपूर्द केली.याची चौकशी करुन संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सदस्य प्रणय कमलाकर बागकर, स्मिता बेनतु फर्नाडिस, पांडुरंग सुरेश फोडनाईक, गायत्री स्वप्नील गोडकर यांनी केली आहे.
--------------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y59980 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..