कोळकेवाडीतील अवजल नियंत्रणासाठी अभ्यासगट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolkewadi Dam
चिपळूण ः अतिवृष्टी काळात कोळकेवाडीतील अवजल सोडण्यासाठी समिती

चिपळूण : कोळकेवाडीतील अवजल नियंत्रणासाठी अभ्यासगट

चिपळूण - पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलामुळे चिपळूण शहरास पुराची दाहकता वाढते असे काहीजणांचे म्हणणे आहे. पावसाळा तसेच अतिवृष्टीवेळी धरणातील पाणी सोडण्याकामी उपाययोजना सुचवण्याकरता शासनाने एक अभ्यासगटाची स्थापन केली आहे. त्यात प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांसह ९ जणांचा समावेश आहे. दरम्यान, चिपळूण बचाव समिती सदस्यांना या निर्णय प्रक्रियेत स्थान असावे, अशी मागणी समितीने केली होती. मात्र समितीला डावलल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

चिपळूण व महाड शहरातील पूरपरिस्थिती संबंधात उपाययोजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली १५ डिसेंबरला बैठक पार पडली होती. बैठकीमध्ये पावसाळा कालावधीत कोळकेवाडी धरणातून येणाऱ्या अवजलाच्या पाण्यामुळे चिपळूण शहरास पुराची दाहकता वाढते, असे चिपळूण बचाव समिती सदस्य यांनी नमूद केले होते. याबाबत वस्तुस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवण्याकरिता निवृत्त मुख्य अभियंता डी. एन. मोडक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची स्थापना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार विशेषतः अतिवृष्टीत कोळकेवाडी धरणातील पाणी सोडण्याचे नियोजन करण्यासंदर्भातील उपाययोजना सुचवण्याकरिता समितीला शासनाने मान्यता दिली आहे. त्याआधी आढावा बैठकीत आमदार शेखर निकम यांनी बचाव समितीतील एका सदस्याच्या नावाची शिफारस शासनाकडे केली होती. तरीही बचाव समितीच्या सदस्याला या अभ्यासगटात सामावून न घेतल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

हे आहेत सदस्य
या अभ्यासगटाच्या अध्यक्षपदी जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक, सदस्यपदी महाजेनको पोफळीचे मुख्य अभियंता संजय चोपडे, रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, केएलई इन्स्टिट्यूट हुंबळीचे स्थापत्य अभियांत्रिकी प्रमुख डॉ. शरद जोशी, चिपळूणचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश पाटणकर, संजीव अणेराव तसेच समितीच्या सदस्य सचिवपदी कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार व रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांची नियुक्ती केली आहे.

यांचा होणार अभ्यास
या अभ्यासगटामार्फत जुलै २०२१च्या महापुरामध्ये कोयना अवजल विसर्गामुळे चिपळूण शहर व परिसरावर झालेला परिणाम तसेच त्या कालावधीत कोळकेवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गाच्या परिमाणाचे दृढीकरण व विसर्ग सोडण्याची कारणमिमांसा करण्यात येणार आहे. कोळकेवाडी अवजलाचा महत्तम विसर्ग, महत्तम भरती पातळीच्यावेळी त्याचा चिपळूण शहरामध्ये वाशिष्ठी नदीमधील जलपातळीमध्ये होणाऱ्या वाढीचा अभ्यास व त्याचा चिपळूण शहर परिसरात होणारा परिणाम याचाही अभ्यास केला जाणार आहे.

यांची होणार पडताळणी
भविष्यात जलसंपदा, ऊर्जा व महसूल विभागाच्या समन्वयातून कोळकेवाडी धरण पायथा विद्युतगृहातून विद्युतनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात अथवा कोळकेवाडी (एसओपी) निश्चित करणे, कोळकेवाडी ते वाशिष्ठी नदीच्या संगमापर्यंतच्या नदीपात्रामध्ये तत्कालीन विद्युतगृहाच्या बोगद्याच्या खोदकामावेळी नदीपात्रालगत रचलेल्या खोदकाम साहित्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे का, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60313 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top