जगणं महागलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inflation
जगणं महागलं

जगणं महागलं

दिवसेंदिवस वाढत चालेल्या महागाईमुळे सिंधुदुर्गात सर्वसामान्यांचे जीवनमान अडचणीचे बनू पाहत आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने जगावे कसे, असा प्रश्‍न कष्टकऱ्यांना पडला आहे. हंगामात हाताला काम असले तरी पावसाळ्यात अशा महागाईत जीवन कसे रेटावे? याची भ्रांत त्यांच्यासमोर आहे. इंधनाचे दर कमालीचे वाढल्याने मध्यमवर्गीयही हैराण आहेत. एकूणच बजेट कोलमडत असल्याने मोठी पंचाईत झाली आहे. दरम्यान, काल केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे प्रतिलिटर ८ व ६ रुपयांची कपात केल्याने आता पेट्रोल लिटरमागे साडेनऊ रुपयांनी, तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले आहे. ‘पंतप्रधान उज्ज्वला योजने’च्या नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (एका वर्षात १२ प्रमाणे) २०० रुपयांचे अनुदान देण्याची घोषणाही झाली आहे. महागाईच्या ज्वाळांमध्ये होरपळून निघणाऱ्यांना हा दिलासा असला तरी अजूनही महागाईची तीव्रता जैसेथेच आहे.

चूल कशी पेटणार?
‘अच्छे दिन’ येणार म्हणून सर्वसामान्य आशेवर असताना महागाईचा आगडोंब बघून आता त्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. अच्छे दिन तर सोडाच, होते ते बरे, असे म्हणण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. सांगा कसे जगायचे?... असे विचारण्याची वेळ आता आली आहे. असे कुठलेही क्षेत्र नाही, जेथे महागाईची झळ बसलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता पुरती हैराण आहे. कष्टकरी कुटुंबाची चूल रोजच्या मिळकतीवर अवलंबून असते; मात्र महागाईच्या तुलनेत मजुरीचे दर वाढवल्यास आपोआपच लोक यांत्रिकीकरणाकडे वळतात. त्यामुळे कष्टकर्‍यांच्या हाताला काम मिळेनासे झाले आहे. काही कामगार बारमाही शेतकर्‍यांकडे कामाला असतात; मात्र यावेळी मजुरीच्या दरात मोठी तफावत असते. काही कष्टकरी कुटुंबे रोजच्या मिळकतीवर बाजारहाट करतात. साठवणूक करण्याची आर्थिक क्षमता नसल्यामुळे त्यांना महागाईची तीव्रता अधिक जाणवते. त्यामुळे ‘रोज कमवा आणि रोज खा’ असे चित्र काही कुटुंबांसमोर आहे.

इंधन दरवाढीने हैराण
दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याने वाहन चालक त्रस्त आहेतच; मात्र यामुळे अन्य साहित्याच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. डिझेल वाढीचा थेट परिणाम वाहतुकीच्या भाड्यावर होत असल्याने आपोआपच भाडे वाढले की वस्तूंचे दर वाढतात, हे समीकरण आहे. त्यामुळे याचा फटका जीवनावश्यक साहित्यासह अन्य क्षेत्रालाही बसला आहे. पेट्रोल वाढल्यास गाड्या फिरविणे एकवेळ कमी होईल; मात्र डिझेल वाढल्यास मोठी पंचाईत होत आहे. वाहतूक भाड्याबरोबरच प्रवाशी भाड्यातही मोठी वाढ झाली असून, एसटीची भाडेवाढ होत असल्याने त्याची झळ पुन्हा सर्वसामान्यांच्या मुळापर्यंतच येत आहे.

गॅसवाढीचाही तडाखा
सरपणासाठी लाकूड मिळण्यात मर्यादा आल्याने तसेच कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतल्याने पारंपरिक चुलींची जागा गॅस शेगडीने घेतली आहे. घरोघरी गॅस घेतला गेला आहे. केंद्र शासनाच्या योजनांमधूनही अनेक कुटुंबांनी स्वयंपाक करण्यासाठी गॅसचा आधार घेतला; मात्र आता हाच गॅस महिलांसाठी डोकेदुखी ठरली आहे. गॅस दरवाढीचा भडका उडाल्याने महिलांची मोठी पंचाईत झाली आहे. यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. ग्रामीण भागात सरपण पेटवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केरोसीनचा दरही गेल्या पाच वर्षांत सुमारे चार पटीने वाढला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचीही मोठी अडचण झाली आहे. कष्टकरी विजापुरी तसेच रस्ता, बांधकाम क्षेत्रातील कामगार कुटुंबे कातळावर झोपड्या बांधून राहतात. त्यांच्याकडे गॅसचा पत्ताच नसतो. अशावेळी केरोसीनचा दरही त्यांना परवडेनासा झाला आहे.

यांत्रिकीकरण अंगाशी?
एकेकाळी भातशेतीसाठी ग्रामीण भागात बैलजोडीचा वापर केला जात होता. पुढे शेतीसाठीची जनावरे वर्षभर पोसण्यास परवडत नसल्याने तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र माणसांची आवश्यकता भासत असल्याने काहींनी बैलजोडी विकून यांत्रिक उपकरणे घेतली. यामुळे कामे वेगात होऊ लागली खरी; मात्र आता इंधनाचे दर वाढल्याने उपकरणे चालविण्याचाही मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरीही आता अडचणीत सापडले आहेत.
बांधकाम क्षेत्रही महागले
महागाईची झळ बांधकामाशी निगडीत असलेल्या साहित्यालाही बसली आहे. घर, इमारत बांधणीसाठी लागणारे सिमेंट, स्टील यांचे दर कुठल्याकुठे पोहोचले आहेत. त्यामुळे कमी खर्चात गरिबांची होणारी घरे आता स्वप्नच बनू पाहत आहेत. गेल्या पाच वर्षांत सिमेंट, वाळू, स्टील यांच्या दरात मोठी वाढ झाल्याने घर बांधणीसाठी पैसा साठवून ठेवून नंतर घर बांधायचे म्हटल्यास वाढत्या दराचा सतत सामना करावा लागणार आहे. त्यामुळे एकीकडे रोजचे जीवन कंठावे कसे, असा प्रश्‍न असताना मोडकळीस आलेल्या घरांची डागडुजी करण्याची कुवतही काहींच्या समोर राहिली नसल्याचे चित्र आहे. निवासी संकुलात सदनिका घेण्यासाठीही आता वाढीव रक्कम मोजावी लागत असल्याने आर्थिक ओढाताण करावी लागत आहे.

आंबा व्यवस्थापनातही वाढ
हापूस आंबा बागायतदारांना आंबा व्यवस्थापन खर्चात वाढ झाल्याची जाणीव झाली आहे. आधुनिक पध्दतीने फवारणीसाठी वापरण्यात येणारे फवारणी पंप, पावसाळ्यात रान काढण्याची यंत्रे यांना लागणार्‍या इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने आपोआपच बागायतदारांच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. तसेच आंबा वाहतुकीसाठी वापरण्यात येणार्‍या वाहनांसाठी वाढीव दराचे इंधन भरावे लागत असल्याने एकूणच वाढत्या खर्चामुळे बागायतदारांचे आर्थिक नियोजन कोलमडण्याची लक्षणे आहेत. याचबरोबरच मच्छीमारांनाही वाढीव इंधनदराची डोकुदुखी सतावत आहे. मध्यंतरी मच्छीमारांना पुरवण्यात येणार्‍या डिझेलचा दर खुल्या बाजारातील पेट्रोल पंपावरील डिझेल दरापेक्षा अधिक झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. आता पुन्हा दर पेट्रोलपंपाप्रमाणे झाला आहे. तरीही उत्पादन आणि खर्च यांचा मेळ बसेनासा झाला आहे.

दुध, भाज्याही महागल्या
सिंधुदुर्गात बहुतांशी ठिकाणी कोल्हापूर येथून दुध पुरवठा केला जातो. दुधाचे दर वाढले नसले, तरीही वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक भाड्यात कमालीची वाढ झाल्याने आपोआपच दुधाचे भाव वधारले आहेत. सर्वसाधारपणे ६० रुपयांपेक्षा अधिक लिटरचा दर झाल्याने लहान मुलांच्या दृष्टीने अडचणीचे झाले आहे. याच पध्दतीने भाजीचेही झाले आहे. सिंधुदुर्गात बेळगाव, कोल्हापूर येथून भाजीचा पुरवठा होतो. वाढीव दरामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे.

पर्यटनाला झळ
वाढत्या महागाईमुळे पर्यटन व्यवसायालाही त्याची झळ बसण्याची शक्यता आहे. एकीकडे प्रवास महागला, तर दुसरीकडे हॉटेलमधील राहणीमान आणि जेवण महाग बनले आहे. भाजी, दुध, जीवनावश्यक साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने आपोआपच खद्यपदार्थांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस गावोगावच्या यात्रा-जत्राही महाग बनत चालल्याचे चित्र आहे.

इंधन दर (रूपयात -महिना मे)
वर्ष*पेट्रोल*डिझेल*केरोसीन*गॅस
२०२२*११२.८३*९७.२७*८३*१०१३
२०२१*९७*८९*३८*८२२
२०२०*९६*८८*१५*५९५
२०१९*७६*७२*३३*७१६
२०१८*८५*७२*२६*६५२

जीवनावश्यक वस्तूंचे दर (रुपयांत)

*आताचे दर*पाच वर्षांपूर्वीचे दर
तुरडाळ*१२५*७०
मुगडाळ*१३०*७०
चणाडाळ*९०*४५
गहू*४०*२८
पामतेल*१६५*६५
सूर्यफुल*२२०*११०
शेंगतेल*२१०*१००

इंधन दरवाढीचा मच्छीमार क्षेत्रावर मोठा परिणाम जाणवला. यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आणि तुलनेने उत्पन्न कमी झाले. पर्यायाने आर्थिक नियोजन कोलमडले. पूरक व्यवसायावर याचा परिणाम होऊन उलाढाल मंदावली. याचा कामगारांनाही फटका बसला. यातून उद्योग क्षेत्र सावरण्यासाठी वेळ जाईल.
-हनिफ मेमन, उद्योजक, देवगड.
महागाईमुळे सर्वसामान्यांची दमछाक होत आहे. शासनाने दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. सरकारने मोफत सुविधा पुरवण्याऐवजी त्या वस्तूंवरील किंमती कमी कराव्यात. मोफत वस्तू वाटपामुळे व्यापाऱ्याचा व्यवसाय होत नाही. जर वस्तूंच्याच किंमती कमी झाल्या, तर व्यापार वाढेल, सामान्यांना दिलासा मिळेल.
-शिवप्रसाद पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते, देवगड.
सर्वसामान्य माणसांची क्रयशक्ती महागाईने उरलेली नाही. पैशाचा तुटवडा आणि त्यात महागाईची भर अशी स्थिती आहे. माणसे व्यक्त होत नसली तरीही आतून पूर्ण हैराण आहेत. व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही महागाईचा परिणाम जाणवला.
- प्रमोद नलावडे, किराणा व्यापारी, देवगड.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वच बाबतीत अडचणीचे झाले आहे. आंबा बागेतील फवारणी खर्चात वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. किटकनाशके, खते, संजीवके यांच्या खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे आपोआपच उत्पादन खर्च वाढल्याने छोटे बागायतदार हैराण आहेत.
- श्रीकांत नाईकधुरे, आंबा बागायतदार, बापर्डे (देवगड).

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60432 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top