
वाचन हेच माझे जीवन
23603
आजगाव ः माधुरी आठल्ये यांच्यासह सभेला उपस्थित साहित्यप्रेमी.
वाचन हेच माझे जीवन
माधुरी आठल्ये ः आजगावात साहित्य प्रेरणा कट्टाची सभा
सावंतवाडी, ता. २२ ः बालपणापासून जोपासलेला पुस्तक वाचनाचा छंद आणि नोकरीला लागल्यावर त्याला दिलेली पुस्तक संग्रहाची जोड आजही अव्याहतपणे सुरू आहे. हा छंद अजून दहा वर्षे जोपासण्याची इच्छा असून, नंतर जीवापाड जपलेली ही पुस्तके चांगल्या संस्थेला भेट देईन. माहेरी लावलेले हे वाचनाचे रोपटे सासरीही चांगले बहरले असल्याचे मत माधुरी आठल्ये यांनी व्यक्त केले. वाचन हेच माझे जीवन असून त्यासाठी कधी कोणतीही तडजोड करावी लागली नसल्याचेही त्या म्हणाल्या.
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या एकोणीसाव्या सभेत प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. सुरुवातीला विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला. त्यानंतर कट्ट्याचे ज्येष्ठ सदस्य विनय फाटक यांच्या हस्ते श्रीफळ व पुस्तक भेट देऊन आठल्येंचा सन्मान करण्यात आला. आठल्ये म्हणाल्या, ‘‘प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी पुस्तक वाचनाची गोडी लावली. नंतर माझे काका अत्रेभक्त अनंत काकतकर यांनी परिसरातील वाचनालयात माझे नाव नोंदवून त्याला बळ दिले, लग्नानंतर विस्कळीत झालेले वाचन पुन्हा त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाले. यावेळी पुस्तक खरेदीची त्याला जोड दिली. पुस्तक विकत घेतल्याने ते पुन्हा पुन्हा चवीने वाचता येते. भेटवस्तू देताना नेहमी पुस्तक द्यावे. मुलांना खाऊ किंवा खेळणी द्यायच्या अगोदर वाचनाची लटकी सक्ती करावी. डॉक्टरांच्या क्लिनिकमध्ये लहान मुलांसाठी आकर्षक पुस्तके, मुलांसाठीची मासिके असावीत.’’ यावेळी झालेल्या चर्चेत महेश बोवलेकर, सोमा गावडे, सूर्यकांत आडारकर, विनायक उमर्ये आदींनी भाग घेतला. वाचनात अनुवादित पुस्तकांचे महत्त्व काय? आपल्या संग्रहात आध्यात्मिक पुस्तकांचे स्थान काय? पुस्तकात रमल्याने आपल्याला समाजापासून दूर जाण्याचा धोका वाटत नाही काय? आपली अत्यंत जवळची पुस्तके कोणती? आदी प्रश्नांना आठल्येंनी समर्पक उत्तरे दिली. आशा जोशी, सुमन मुंडले, प्रसन्ना साधले, शुभम साधले, अंकिता वाडकर, कवी विशाल उगवेकर, एकनाथ शेटकर, मीरा आपटे आणि अनिता सौदागर आदी उपस्थित होते. विनय सौदागर यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60500 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..