
‘महाविकास’ कडून राज्याची लूट
23775
देवबाग : येथील बंधाऱ्याच्या कामाचे रविवारी भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नारायण राणे.
‘महाविकास’कडून राज्याची लूट
नारायण राणे : देवबागमधील बंधाऱ्याचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. या उलट महाविकास आघाडीचे सरकार राज्याला लुटण्याचे काम करत आहे. प्रगती, दरडोई उत्पन्न, विकासात राज्याची पिछेहाट सुरू आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील सरकार जाऊन पुन्हा भाजपचे सरकार येईल. देशाबरोबर राज्यातील पुढील ५० वर्षे भाजपचीच सत्ता कायम राहील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज देवबाग येथे व्यक्त केला.
देवबाग येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी राणे यांनी खासदार निधीतून एक कोटी रुपये तत्काळ दिले. बंधारा कामाचे भूमिपूजन देवबाग येथे श्री. राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा प्रवक्ते बाबा मोंडकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, मोहन कुबल, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, दाजी सावजी, फादर संजय उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘१९९० मध्ये निवडून आल्यावर देवबाग ग्रामस्थांनी बंधाऱ्यांची मागणी केली. ती पूर्ण केली आणि गाव वाचविला. यापुढेही देवबागवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे; मात्र जनतेला फसविणारे लोकप्रतिनिधी नकोत, याचा जनतेने विचार करावा. काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या यादीत लघु, सूक्ष्म, मध्यम उद्योग मंत्रालय प्रथम क्रमांकावर आहे. स्थानिक आमदाराला गेल्या आठ वर्षांत बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. त्यामुळे जनतेचा, या भागाचा विकास करण्याची खरी धमक कोणात आहे, हे जनतेने ओळखले पाहिजे. स्थानिक आमदारात धमक, हिंमत नाही. मुख्यमंत्री केवळ बोलतात; प्रत्यक्षात काम कुठे आहे? राज्य दिवाळखोरीत जात असून विकास ठप्प आहे.’’
ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात प्रक्रिया उद्योग विशेषतः माशावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजेत. पर्यटन, काथ्या उद्योग या माध्यमातून प्रत्येक घराचा विकास झाला पाहिजे, यासाठी माझे सहकार्य राहील. जनता राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभाराला कंटाळली आहे. त्यामुळे येत्या काळात जनता त्यांना त्याची जागा निश्चितच दाखवून देईल. आत्मनिर्भर भारत बनविणाऱ्या भाजपच्या पाठीशी जनता ठामपणे उभी राहील.’’
नीलेश राणे म्हणाले, ‘‘केंद्रीय मंत्री राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. जिल्हाधिकाऱ्यांनीही एक कोटींच्या बंधाऱ्याच्या कामास तत्काळ मंजुरी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविलेली तत्परता स्थानिक आमदाराला आठ वर्षात दाखविता आली नाही. राणेंनी निधी आणल्यावर स्थानिक आमदाराला जाग आली; मात्र कमिशन घेऊन ही कामे सुरू आहेत. एवढ्या छोट्या मनाचा आमदार राज्यात पाहिला नाही. २०२४ ला राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर असेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे.’’ यावेळी राजन तेली, बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर यांची भाषणे झाली. महेश मांजरेकर सूत्रसंचालन यांनी केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60660 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..