संत कवयित्री भागूबाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत कवयित्री भागूबाई
संत कवयित्री भागूबाई

संत कवयित्री भागूबाई

sakal_logo
By

साहित्य सदर


23837
वृंदा कांबळी

संत कवयित्री भागूबाई

लीड
संत कवयित्रींच्या काव्याचा अभ्यास करत असताना आपल्याला पूर्वी माहिती नसलेल्या अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात. प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या, शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या, लौकिक जीवनातील सुखांपासून वंचित राहिलेल्या या कवयित्रींनी केलेली तेजस्वी काव्यनिर्मिती पाहिली की, आपोआपच हात जोडले जातात. कुठून आले असेल हे त्यांना ज्ञान? कुठली देवता त्यांना हे प्रतिभेचे लेणे जाता जाता ओंजळीत टाकून गेली असेल? कोणत्या प्रतिकूल परिस्थितीच्या धगधगत्या आगीतून त्यांच्या काव्याचे सोने उजळून निघाले असेल? खरोखरच अंतर्मुख होऊन विचार करण्यासारखी ही बाब आहे. आज साहित्यप्रेमींनी या साहित्याचा अभ्यास करावा. कोणत्याही अभ्यासकाला हा इतिहास मार्गदर्शक व प्रेरक होऊ शकेल.
- वृंदा कांबळी
---
मध्ययुगीन मराठी साहित्याच्या इतिहासात ‘भागूबाई’ नामक दोन कवयित्री आहेत. पहिली भागूबाई ही संत चोखामेळांच्या परिवारातील आहे. अभ्यासकांच्या मते ती चौदाव्या किंवा पंधराव्या शतकात होऊन गेली. तिचे फक्त पाचच अभंग उपलब्ध आहेत. त्यातील तिच्या आत्मोल्लेखावरून ती त्या काळातील अस्पृष्य समजल्या जाणाऱ्या जातीत जन्मलेली असावी, हे लक्षात येते. पाच अभंगांतूनही तिची योग्यता जाणवते.
"आलो तुझ्या दर्शनाला, भेट द्यावी हो आम्हासी
सर्व संत मंडळी हो राऊळी, मी रे एकटी तळमळली
देव आले हो बाहेरी, मज नेले खांद्यावरी."
सर्व संत देवळात आनंद लुटत आहेत आणि राऊळाबाहेर आपण एकटीच तळमळत आहोत, असे वर्णन आहे; पण ती एकटीच बाहेर असताना स्वप्नरंजन करतेय. विठ्ठल स्वतः बाहेर आला व त्याने खांद्यावर बसवून आपल्याला आत नेले, असे ती सांगत आहे. ‘आलो तुझ्या दर्शनासी, भेट द्यावी हो आम्हासी’, अशी विठ्ठल दर्शनाची तळमळ व्यक्त केली आहे. संत ज्ञानेश्वरांविषयीचा कृतज्ञता भाव व्यक्त केला आहे.
‘‘कृपेच्या सागरा, मायबापा ज्ञानेश्वरा, देहभाव हे सोडून, बा माझे धरा ध्यान.’’ ‘‘जेणे पाषाण तारिले, मुखे वेद पशू बोले, भिंती चालविली, ऐसी कृपाळू माऊली.’’ संत ज्ञानदेव म्हणजे विश्रांतीचे स्थान असल्याचे ती म्हणते. ‘पाषाण तारिले’ या शब्दांचा वाक्यार्थ न घेता लक्ष्यार्थ घ्यायला हवा. ‘पाषाण तारिले’ हे वर्णन सेतू बंधनाच्या प्रसंगातील रामायणातील नव्हे. ‘पाषाण तारिले’ म्हणजे मूढ, मंद, पाषाणासारखे निर्बुद्ध लोक ज्ञानदेवांच्या ज्ञानामुळे तरले, असा सूचक अर्थ घ्यायला हवा. तसेच विठ्ठलाविषयीचा आत्मभाव व्यक्त केला आहे. ‘‘मागेपुढे नाही कोणी, सख्या विठ्ठलावाचोनि.’’ विठ्ठल हेच तिचे सर्वस्व होते. ‘‘भागू म्हणे आता झाले निर्भयी.’’ आता कोणाचेच भय शिल्लक राहिले नाही, असे सांगणाऱ्या भागूबाई चौदाव्या- पंधराव्या शतकातच खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्तीचा स्वर आळवते. भयमुक्त होऊन स्वातंत्र्याचे गीत ती गाते.
दुसरी भागूबाई ही संत कवयित्री संत तुकाराम यांची कन्या म्हणून ओळखली जाते. या भागूबाईच्या नावावर फक्त दोनच अभंग उपलब्ध आहेत. त्यातील दुसरा अभंग साधुसंतांच्या संगतीचा गौरव करणारा आहे. ‘‘साधूसंग धरी रे, श्रीहरी स्मरणी रंगली वाणी, भक्ती धरी दृढ काम तजी रे, साधूसंग धरी रे. माया जाळ हे मृगजळ पाहे, गुंतसी परी गती नाही बरी रे.’’ असे अत्यंत गेय पद तिने रचले आहे. यावरून सोळाव्या शतकात होऊन गेलेल्या या भागूबाई नामक संत कवयित्रीला संगीताचे, ठेक्याचे ज्ञान असावे, असे दिसते. जीवनातील मायाजाल हे एक मृगजळ आहे. मायारुपी डोहातून तरून जाण्यासाठी ''विठ्ठलनाम'' हे तारू आहे. म्हणून कीर्तनरंगात ‘अभंग’ हो. अभंगातील एकरूपता, भंगरहितता, ऐक्य, एकतानता हे सर्वच ती एका शब्दात सूचवते. भागूबाईच्या काव्यातील गेयता पाहता तिच्या आणखीही रचना असाव्यात; पण त्या आज उपलब्ध नाहीत. शेकडो वर्षांपूर्वी या स्त्रियांनी केलेली ही काव्यरचना खरच अभंग आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60756 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top