
रत्नागिरी ः कोरोनात विधवा झालेल्या महिलांना मदतीचा हात
नीलम गोऱ्हे फोटो ः 24011
कोरोनात विधवा झालेल्या महिलांना मदत
नीलम गोऱ्हे ः निराधार बालकांच्या पुनर्वसनाच्या योजना
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ ः ‘‘कोरोना महामारीमध्ये विधवा झालेल्या महिला आणि निराधार बालकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर आहे. मुलांचे पुनर्वसन न झाल्यास विदेशात त्यांची विक्रीही होऊ शकते. हे तारांकित प्रश्न केल्यानंतर शासनाने त्यांच्या पुनर्वसनासाठी योजना जाहीर केल्या आहेत. मुलांच्या संगोपनासाठी महिन्याला अकराशे रुपये देण्यात येणार आहेत तर शहरी भागात पतीच्या नावे असलेला व्यवसाय थेट त्या विधवा महिलेच्या नावे करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागात अशा महिलांना ३ एकरवर लागवडीसाठी मोफत बियाणे देण्याची योजना राज्य शासन राबवणार आहे,’’ अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘महामारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन जाहीर केल्यानंतर अनेकजण अन्नधान्यासह अन्य जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत, या भीतीने बॅगा भरून निघाले होते. हे चित्र मी पाहिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून वस्तुस्थिती सांगितली. त्यांनी तत्काळ पत्रकार परिषद घेत नागरिकांना अन्नधान्य, औषध पुरवठा होणार असल्याची घोषणा करून मोठा दिलासा दिला. या परिस्थितीमध्ये २०० हून अधिक गावांमध्ये फोन करून मी मजुरांसह हातावर पोट असणाऱ्यांना मोफत धान्य दिले जाते की नाही याची माहिती घेतली. अडकलेल्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला; मात्र दुसऱ्या महामारीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांना जीव गमवावा लागला. आई-वडील गमावल्याने अनेक मुलं निराधार झाली. त्यांना दत्तक घेण्यासाठी जाहिराती सुरू झाल्या. एजन्सी नेमण्यात आली. त्यामुळे त्या मुलांची माहिती गोळा करून त्यांचे पुनर्वसन आणि संगोपनासाठी महिन्याला ११०० रुपये देण्यात येत आहेत. निराधार मुलं आणि विधवांचे पुनर्वसन करण्याचे काम महाविकास आघाडी करत आहे.’’
चौकट
रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या कारभाराबाबत खंत
सामाजिक उपेक्षित विषयांत लक्ष घालून त्याबाबत योग्य ते आदेश देण्यासाठी कोकण दौऱ्यावर आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे विभागाच्या धरणांची सुरक्षितता, आरोग्य आदी विषय गंभीर आहेत. यात रत्नागिरी, सिंधुदुर्गचा कारभार आदर्शवत असेल असं वाटत होतं; मात्र आढावा घेतल्यानंतर खंत वाटली. अनेक विभागांमध्ये अधिकाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे मत गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60897 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..