
खोदाईची माती ग्रामस्थांच्या घरात
23993
आरोस ः बाजार रस्त्याला आलेले नदीचे स्वरूप.
खोदाईची माती ग्रामस्थांच्या घरात
आरोसमधील प्रकार; बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे दांडेली-आरोस बाजार येथे खोदाई केलेल्या पाण्याच्या पाईपलाईनची माती ग्रामस्थांच्या घरात घुसली. संदीप माणगावकर यांच्या घरासह बाजारपेठेतील अन्य दुकानातही काही प्रमाणात पाणी शिरून मोठे नुकसान झाले; मात्र याची बांधकाम विभागाने कोणतीही दखल न घेतल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
तालुक्यात दोन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी दांडेली-आरोस बाजार बाजारपेठेत घुसले. पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने काही काळ रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते; परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने पाणी थेट माणगावकर यांच्या घरात घुसले. त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. पावसाळा सुरू होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी असताना पुढे कोणतीच कार्यवाही न झाल्यास आपल्या घरासह दुकानात माती शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन दोन दिवसांत अपेक्षित कार्यवाही करावी; अन्यथा आम्ही पावसाळ्यातच बांधकाम कार्यालयात तळ ठोकून बसणार असल्याचा इशारा त्यांनी बांधकाम विभागाला दिला आहे.
रस्त्याच्या एका बाजूने पाईपलाईनसाठी खोदाई करण्यात आलेली साईडपट्टी धोकादायक बनली आहे. आरोस बाजार या ठिकाणी दहा ते पंधरा गावातील नागरिक बाजार खरेदी करण्यासाठी येतात. त्यामुळे पावसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांधकाम विभागाने दखल घेऊन खोदाई केलेल्या साईडपट्टीवर खडीकरण करण्याची मागणीही ग्रामस्थांमधून होत आहे.
---------------
कोट
पाण्याला जाण्यासाठी मोरी पूल व गटार आवश्यक असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अशी परिस्थिती आली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत घटनास्थळी पाहणी करून कार्यवाही न केल्यास कार्यालयातच तळ ठोकू.
- संदिप माणगावकर, ग्रामस्थ
---------------
कोट
पाईपलाईन खोदाईबाबत संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यापुर्वी हे काम मार्गी लावले जाईल. घडलेल्या या प्रकाराबाबतही चौकशी केली जाईल.
- अनिल आवटी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y60944 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..