
काम न करताच चार को़टीचे बिल
काम न करताच चार कोटीचे बिल
ऐनारीतील सिंचन प्रकल्प; ग्रामस्थांचा गंभीर आरोप
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २४ ः सिमेंट ग्राऊटिंगचे काम न करताच ऐनारी लघू सिंचन प्रकल्पातून ३ कोटी ९३ लाख ९० हजार रुपयांचे बिल काढल्याचा धक्कादायक आरोप ऐनारी ग्रामस्थांनी केला आहे. त्यासंदर्भात कार्यकारी अभियंत्याकडे निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ऐनारीतील ९० हुन अधिक ग्रामस्थांनी हे निवेदन दिले आहे. ऐनारी येथे २०११ पासून लघुसिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचे काम सुरुवातीला पूर्वीची एका कंपनीमार्फत सुरू होते. या प्रकल्पाच्या जलरोधक भरावाचे काम पूर्ण केले आहे. त्या कामासाठी कंपनी आणि अधिकाऱ्यांकडून धरणाच्या सिंमेट ग्राऊटिंग कामासाठी ४१ हजार ४८८ सिंमेट बॅग वापरल्याचा दावा केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात इतका सिंमेट साठा करण्यासाठी गावात किंवा धरणकाम सुरू असलेल्या ठिकाणी गोडावूनच उपलब्ध नाही. त्यामुळे या धरणाचे सिमेंट ग्राऊटिंग केलेले नाही, असे आमचे म्हणणे आहे. या न केलेल्या कामांवर ३ कोटी ९३ लाख ९० हजार ६९५ इतकी रक्कम खर्च केल्याचे निर्दशनास आले असून, त्यासंदर्भातील पुरावे आहेत. सिमेंट ग्राऊटिंग न केल्यामुळे या धरणाच्या कामाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीच्या कामामुळे धरणाखालील लोकांची घरे, शेती कायम धोक्याखाली येण्याची शक्यता आहे. या धरणामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्याला ठेकेदार कंपनी आणि अधिकारी जबाबदार असतील, असेही निवेदनात नमूद आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी साईलवाडी विकास मंडळाच्यावतीने कार्यकारी अभियंत्याकडे केली आहे.
...............
कोट
ऐनारी प्रकल्पाची यापूर्वी अनेकदा चौकशी झाली आहे. ऐनारी ग्रामस्थांचे निवेदन अजुनही प्राप्त झालेले नाही. ते प्राप्त झाल्यानंतर ग्रामस्थांचे नेमके म्हणणे काय आहे, याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- दयासागर दामा, कार्यकारी अभियंता, मृदू जलसंधारण विभाग, कुवारबाव, रत्नागिरी
...............
कोट
ऐनारी लघुसिंचन प्रकल्पासाठी २०७४ मेट्रिक टन इतके सिमेंट वापरल्याचा कंपनी आणि अधिकाऱ्यांचा दावा पूर्णतः खोटा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गावात सिमेंट आले असेल, तर ते गावातील लोकांच्या निर्दशनास आले असते; परंतु ते कधीच दिसलेले नाही. त्यामुळे धरण कृती समितीच्या माध्यमातून या कामाच्या चौकशीची मागणी करीत आहोत.
- सतीश साईल, अध्यक्ष, धरण कृती समिती, ऐनारी प्रकल्प
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61292 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..