कृषी सदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी सदर
कृषी सदर

कृषी सदर

sakal_logo
By

24290

औषधीयुक्त
बहुगुणी फणस

लीड
फणस हे नगदी पीक म्हणून फायदेशीर ठरू शकते. दक्षिणेकडील राज्यात फणस शेती मोठ्या प्रमाणात आहे. अन्नप्रक्रिया उद्योगामध्ये या फळाला फार मोठे महत्त्व आहे. फणसाचे विविध पदार्थ बनवून चांगली कमाई होऊ शकते. कोकणात शास्त्रीय पद्धतीने फणसाची लागवड झाल्यास मोठ्या प्रक्रिया उद्योग उभा राहू शकतो. फणस हे औषधी गुणांनी भरलेले फळ आहे. फणसामध्ये विटामिन-ए, विटामिन-सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम रायबोप्लेविन, आयरन, नियासिन आणि झिंक भरपूर प्रमाणात असते. फणस हे फळ फायबरचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे फणस हे फळ अतिशय गुणकारी आहे.
- डॉ. विलास सावंत
------------------
सृष्टीमध्ये निर्माण होणाऱ्या सर्व फळांमध्ये फणस हे फळ आकाराने सर्वात मोठे असते. भारत आणि दक्षिण आशिया हे फणसाचे मूळ स्थान आहे. कोकण, गोवा व बंगळूर या ठिकाणी फणसाची झाडे जास्त आढळतात. फणसात अनेक औषधी गुणधर्म आहेत. फणस हे मोरॅसी कुळातील आहे. कापा व बरका अशा त्याच्या मूळ दोन जाती आहेत. कापा प्रकारात मधुर व चविष्ट व कडक गरे आढळतात व हे गरे पिवळ्या रंगाचे असतात. बरका फणसामध्ये गरे गोड व लिबलिबीत नरम आढळतात. फणसावर जाड काटे असतात. फणसाचे गरे व आटळे या दोन्हीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. फणसाचे वजन १० ते ४० किलोपर्यंत असते. पिकलेला फणस शितल, स्निग्ध, तृप्तीदायक, मधुर गुणात्मक, मांसवर्धक व बलदायक असतो. फणसाचा उपयोग शरीर संवर्धनासाठी व पचनशक्ती वाढवण्यासाठी होतो. फणसाच्या गऱ्यापासून तळलेले गरे, फणसपोळी, पल्प व आठळ्यापासून पावडर बनवता येते. कच्च्या गऱ्यापासून चविष्ट भाजी बनवता येते. फणसाचे गरे लहान मुलांनी खाल्याने त्यांची शारीरिक व मानसिक वाढ चांगली होते. फणसाच्या सेवनाने त्वचा तजेलदार बनते. फणसात कॅलरीज नसतात. त्यामुळे फणस खाल्ल्याने हृदयाच्या समस्यांवर फायदा होतो. फणस प्रमाणापेक्षा अधिक खाऊ नये अधिक खाल्याने काही जणांना अपचन होऊ शकते. फणस खाऊन पोट फुगल्यास लिंबू पाणी प्यावे.
फणसाच्या झाडाला उन्हाळ्यामध्ये फळे येतात. कापा फणसाला प्राधान्यक्रम दिला जातो. फणसामध्ये नर व मादी फुले वेगवेगळी असतात; पण ती एकाच झाडावर असतात. नर फुले ही गोलसर व गुळगुळीत असतात. मादी फुले लांबट असून काटेरी दिसतात. फणसाच्या खोडावर व जाड फांद्यावर फळे लागतात. फांद्या जेवढ्या जाड असतील तेवढी सशक्त फळे लागतात. साधारण नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात फुले लागतात. फलधारणे नंतर फळ तयार होण्यासाठी सुमारे १३० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो. नवीन लागवड करताना सुधारित जातींची निवड करावी. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण प्रॉलीफिक ही जात विकसित केली आहे. या जातीच्या फणसाची फळे मध्यम असून पावसाळ्यातही गर चांगला राहतो.
फणसाच्या झाडाला शक्यतो वाळवी लागत नाही. त्यामुळे फर्निचरसाठी फणसाचे लाकूड उत्कृष्ट समजले जाते. फणसाच्या लाकडाला पॉलिश केल्यावर ते आणखी उत्कृष्ट दिसते. कोकणात घरासाठी फणसाचे लाकूड वापरले जाते. फणसाचे लाकूड टिकाऊ असून या लाकडाचा वापर शेती अवजारे बनविण्यासाठी केला जातो. अंकुर कलम मृदकाष्ठ कलम व ठिगळ पद्धतीने फणसाची कलमे करता येतात. कलमांच्या लागवडीसाठी १ x १ x १ मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. फणसाची लागवड चौरस पद्धतीने करावी. दोन रोपांमधील अंतर १० x १० मीटर ठेवावे. लागवड साधारण पावसाळा सुरु झाल्यावर करावी. झाडाच्या मुळाशी जास्त पाणी साठू नये याची काळजी घ्यावी. भटक्या जनावारांपासून रोपांचे संरक्षण करावे. फणसाच्या झाडांची नियमित छाटणी आवश्यक नाही; परंतु झाडाला योग्य वळण द्यावे लागते. सुरुवातीच्या काळात अनेक खोडे वाढू नयेत म्हणून छाटणी करावी. झाडाला भरपूर सूर्यप्रकाश लागतो. पहिली दोन वर्षे झाडाला पाण्याची आवश्यकता असते.
( लेखक कृषी विज्ञान केंद्र किर्लोस येथे शास्त्रज्ञ आहेत.)

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61427 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top