
कणकवली : कळसुली ग्रामस्थ निवेदन
24359
कणकवली : प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना निवेदन देताना कळसुली, शिवडाव ग्रामस्थ.
कळसुली, शिवडावला क्रशरचा त्रास
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा; प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
कणकवली, ता. २५ : कळसुली पिंपळेश्वरनगर, उल्हासनगर आणि शिवडाव (ता. कणकवली) गावांत तब्बल नऊ क्रशर आहेत. खडीसाठी दिवसरात्र ब्लास्टिंग केले जात असल्याने अनेक घरांना तडे गेले आहेत; तसेच नागरिकांना प्रदूषणाचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे सर्व क्रशर तातडीने बंद करावेत; अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा तिन्ही गावांतील लोकांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना देण्यात आले.
कळसुली, उल्हासनगर आणि शिवडाव गावांतील ९४ नागरिकांनी प्रांताधिकारी राजमाने यांची भेट घेतली आणि क्रशर बंद करण्याबाबत निवेदन दिले. यात म्हटले आहे की, ‘तिन्ही गावांना काळ्या दगडाच्या क्रशरचा जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे. तब्बल नऊ क्रशर या गावांच्या हद्दीत सुरू आहेत. गावात स्वच्छ हवा आणि पाणी मिळेनासे झाले आहे. त्यातच ‘अमोनियम’चा वापर करून दगड फोडण्यासाठी ब्लास्टिंग केले जात असल्यामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे. येथील घरांना तडे गेले असून अनेक मातीची घरे पावसाळ्यात पडण्याचीही भीती निर्माण झालेली आहे. यासंदर्भात सातत्याने निवेदने देऊनसुद्धा जिल्हाधिकारी कोणताही निर्णय घेत नाहीत. जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासनाने पूर्णतः डोळेझाक केली आहे. ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रशासन सुद्धा या क्रशरचालकांसमोर हतबल झाले आहे. हे नऊ क्रशर तातडीने बंद करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू.’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61516 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..