
सदर ः शोभिवंत मत्स्यशेतीतील स्वयंरोजगार संधी
rat26p5.jpg
24501
- डॉ. संदेश पाटील
...
आधुनिक मत्स्यपुराण ः लोगो
...
इंट्रो
शोभिवंत मत्स्यपालन हा मत्स्यसंवर्धनातील महत्त्वाचा घटक आहे. मर्यादित जलचर प्रणालीमध्ये राहणारे शोभिवंत मासे विक्री हा एक प्रमुख व्यवसाय आहे तसेच शोभिवंत मत्स्यपालन हा जगातील सर्वात मोठा जोपासला जाणारा छंद आहे व त्यामुळे मानवी जीवन तणावमुक्त होण्यास मदत होते. घराची शोभा वाढवण्यासाठी आणि तणावमुक्त राहण्यासाठी घरोघरी मत्स्यालय ठेवले जाते आणि जगभरातून ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी शोभिवंत माशांचे संवर्धन क्षेत्र वाढत आहे. प्रजातींची समृद्ध विविधता आणि अनुकूल हवामान, स्वस्त कामगार आणि सहज वितरण यामुळे भारतामध्ये शोभिवंत मत्स्यपालनासाठी अनुकूल वातावरण आहे. शोभिवंत माशांची पैदास करून त्यांची योग्य वाढ करून मागणीनुसार विक्री करणे तसेच शोभिवंत मत्स्यपालनाशी संलग्न इतर व्यवसाय करणेदेखील शक्य आहे.
- डॉ. संदेश पाटील
-----------------------------------------
शोभिवंत मत्स्यशेतीतील स्वयंरोजगार संधी
शोभिवंत मत्स्य व्यवसायातील विविध स्वरोजगारामध्ये शोभिवंत मत्स्यपालनाकरिता खाद्यनिर्मिती हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो. मासे जगण्याचा दर, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, चांगला रंग येण्यासाठी विशेषत: दर्जेदार प्रथिनेयुक्त खाद्य महत्वाचे काम करते. माशांसाठी खाद्य दोनप्रकारे उपलब्ध करू शकतो. नैसर्गिक आणि कृत्रिम खाद्य.
नैसर्गिक खाद्य ः नैसर्गिक खाद्यामध्ये हिरवे पाणी (हरित प्लवंगयुक्त), डासांच्या अळ्या, डाफ्निया, रोटिफर, मोयना, ट्यूबिफेक्स अळ्या किंवा गळातील अळी, इन्फुझोरिया, डासांच्या अळ्या आणि चिरलेला गांडुळांचा वापर केला जातो. हे जिवंत खाद्य निसर्गातून, पाणी साचलेल्या डबक्यातून, तलावातून पकडता येते व त्याच्या संवर्धनाची योग्य पद्धत समजून घेतल्यास त्याचे संवर्धन करता येते व त्याची विक्रीही करता येऊ शकते. नैसर्गिक खाद्य फार कमी खर्चात तयार करता येणारे खाद्य आहे.
कृत्रिम खाद्य ः कृत्रिम खाद्य रेडिमेड पॅलेटमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असते. माशांच्या प्रजाती आणि गरजेनुसार वेगवेगळे आवश्यक घटक वापरून कृत्रिम खाद्य तयार करता येते. कृत्रिम खाद्यामध्ये लहान पिल्लांपासून मोठ्या माशांपर्यंत त्यांच्या वाढीनुसार प्रथिने, चरबी, कर्बोदके या घटकांचे योग्य प्रमाण वापरून आणि खाद्याचा योग्य तो आकार ठेवून कृत्रिम खाद्य तयार करता येते. कृत्रिम खाद्य तयार करण्यासाठी भाताचा कोंडा, शेंगदाणा-सोयाबीन पेंड, मत्स्यकुटी, अंडी, गव्हाचे पीठ इत्यादी घटक तसेच आवश्यक जीवनसत्वे आणि खनिज पदार्थ यांचा वापर करण्यात येतो. तयार केलेले खाद्य हे पाण्यावर जास्त काळ तरंगणारे, दीर्घकाळ टिकणारे आणि माशांना खाण्याजोगे असावे. नैसर्गिक खाद्य, कृत्रिम खाद्य यांमध्ये ट्यूबिफेक्स अळ्या, डासांच्या अळ्या, पॅलेट फीड याचा समावेश आहे.
शोभिवंत पाणवनस्पती संवर्धन आणि विक्री ः शोभिवंत मत्स्यटाकीमध्ये माशाबरोबर पाणवनस्पती लावल्याने मत्स्यटाकीची शोभा वाढते व माशांना आसरा मिळतो. पाणवनस्पती माशांच्या विष्ठेचा खत म्हणून वापरतात. त्यामुळे मत्स्यटाकी स्वच्छ होते. पानांचे विविध आकार आणि रंग असलेल्या पाणवनस्पती मत्स्यटाकी सजावटीसाठी वापरल्या जात असल्याने बाजारात त्यांची मागणी वाढत चालली आहे. त्यामुळे मत्स्यसंवर्धनाला जोडधंदा म्हणून पाणवनस्पती संवर्धन आणि विक्री हा एक चांगला व्यवसाय आहे. अमझोन स्वोर्ड, हॉर्नवॉर्ट, व्हॅलिसिनेरिया, कॅम्बोबा, एक्वारोस, लुडविगिया इत्यादी वनस्पती सजावटीसाठी वापरल्या जातात.
मत्स्यटाकीचे सजावट साहित्य विक्री आणि मत्स्यटाकीचे व्यवस्थापन ः वाढती लोकसंख्या, त्याबरोबर वाढणारे शहरीकरण व लोकांचे बदलणारे राहणीमान यामुळे घर सजावटीकरिता लोक मत्स्यालयाचा वापर करत आहेत तसेच मोठे हॉटेल, रुग्णालये, खासगी कार्यालये यांमध्येही मत्स्यालयाचा वापर केला जात आहे. त्यामुळे मत्स्यालयातील माशांची देखभाल करणे, पाणी बदलणे, टाकी स्वच्छ करणे या सुविधा पुरवणे हा बिनभांडवली असा चांगला व्यवसाय आहे. तसेच नवीन मत्स्यालय तयार करून ते सजावट करण्यासाठी सजावट साहित्य जसे की, रंगीत वाळू, दगड, कृत्रिम झाडे, खेळणी, फिल्टर, पाण्याचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हिटर इत्यादी साहित्यांची विक्री करणे हा एक चांगला व्यवसाय आहे.
(लेखक मत्स्य महाविद्यालय, शिरगांव येथे सहयोगी अधिष्ठाता आहेत.)
-----------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y61776 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..